शके १७३९ च्या माघ शु. १४ रोजी गोपाळ-अष्टी येथे इंग्रज-मराठे यांची लढाई होऊन मराठ्यांचे शेवटचे सेनापति बापू गोखले यांचे निधन झाले.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रज-मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत अष्टीच्या लढाईचे महत्त्व विशेष आहे. या लढाईमुळे दक्षिणेतील मुख्य युद्ध संपले, आणि बाजीराव वऱ्हाड-चांद्याकडे निघून गेल्यामुळे अनायासे त्यांचे प्रांत इंग्रजांस मिळाले. दोन-तीन महिने सारखी पळापळ चालली असल्यामुळे मराठी फौज कंटाळून गेली होती. बाजीरावांचा पाय कोठेच स्थिर होत नव्हता. माघ शु. १४ रोजी त्याचा मुक्काम पंढरपूर जवळचे अष्टी येथे असतांना स्मिथची फौज त्याचा पाठलाग करून आली. बापू गोखले श्रीमंताजवळ होते. ते बोलले, " इंग्रज जवळ आले, आतां आपण पळू नये" त्यानंतर लढण्याच्या निमित्ताने गोखले सामन्यास निघून गेले. "रणांगणी स्वामीकार्यावर आल्यानेच बहुमान आहे; या उपरी चरणदर्शन होईल तर उत्तम, नाहीपेक्षा हेच शेवटचे." असे बोलून, नमस्कार करून इंग्रजांचे सन्मुख जाऊन उभे राहिले. इंग्रजांची पहिली तुकडी माघारी हटली. ते पाहून दुसऱ्या तुकडीने गोखल्यावर चाल केली. गोखले यांस गोळी लागली. घोडा मोकळा झाला. गोखले गर्दीत मिसळून काटले गेले..... गोविंदराव घोरपडे, आनंदराव बाबर वगैरे प्रमुख सरदार लढाईत मारले गेले. इंग्रजांचेंहि पुष्कळ नुकसान झाले. खुद्द स्मिथच्या डोक्यास तरवारीची जखम झाली. बापू गोखल्यांना पिस्तूलाच्या तीन गोळ्या व तरवारीच्या दोन जखमा लागल्या.
बापू गोखले यांचे नांव नरहर गणेश असे असून त्यांचा जन्म शके १६९९ मध्ये झाला होता. गोखले हे स्वामीनिष्ठ सेनापति असून कोणत्याहि लढाईतून त्यांनी कधी पाय काढला नाही. गणेश खिंडीच्या लढाईत त्यांचा घोडा ठार झाला, तरी ते पायउतार होऊन लढत होते. यापू प्रथम बदामीच्या लढाईत स्वपराक्रमाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर बऱ्याच मोहिमांतून बापूंची कामगिरी प्रामुख्याची आहे.
२० फेब्रुवारी १८१८
पंढरपूर तालुक्यातील रोपळे आष्टी होय! नरवीर बापू गोखल्यांची समाधी आहे.
रणांगणाच्या ठिकाणी मोठा पाझर तलाव आहे. पावसाळ्यात समाधी पाण्याखाली जाते.
एरव्ही दर्शन होऊ शकते असं गांवकरी सांगतात. पण एकंदर नाही चिरा नाही पणती
अशीच परिस्थिती आहे!
No comments:
Post a Comment