शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला.
बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी या वेळी चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते. सुरजमल जाटाचा नातु रणजितसिंग हा या वेळी भरतपूरच्या गादीवर होता. यशवंतराव होळकरास इंग्रजावर विजय मिळतात हे पाहून रणजितसिंगासहि अवसान चढले. यशवंतराव व जाट एक झालेसे पाहून इंग्रजांनी आपला मोर्चा भरतपुरावर वळविला. २ जानेवारी १८०५ रोजी भरतपूरच्या किल्ल्यासमोर इंग्रजांचा तळ पडला. भरतपूरचा किल्ला उंच डोंगरावर असून त्याच्याभोवती पाण्याचे विस्तिर्ण खंदक होते. जाट आणि मराठे यांच्यासारखे खंदे वीर हाती शस्त्र घेऊन इंग्रजांविरुद्ध उठले. पहिल्याने इंग्रजांचा पराभव झाला. नंतर पौष व.६ रोजी त्यांनी दुसरा हल्ला चढविला. खंदकांच्या लांबी-रुंदीची मापे घेऊन इंग्रजांनी जोराची तयारी चालविली होती. खंदकाच्या एका काठावरून पलीकडच्या काठापर्यंत पोचतील अशा शिड्या तयार झाल्या. सर्व सिद्धता झाल्यानंतर ले. कर्नल मॅकराय, कॅ. लिंडसे या इंग्रज अधिकान्यांच्या नेतृत्वाखाली सैन्य खंदकांतून पार होऊ लागले. होळकरांचे घोडेस्वार तटाच्या बाहेर असून पायदळ मात्र आंत गेले होते. किल्ल्यांत येण्याबद्दल भरतपूरच्या राजाकडून आग्रह झाल्यावर यशवंतराव बोलले, "माझी गादी माझ्या घोड्याच्या पाठीवर आहे." इंग्रज सैन्य पार होत असतांना होळकरांच्या घोडेस्वारांनी त्यांना अगदी बेजार करून सोडले. इंग्रजांची अगदी दुर्दशा उडाली. हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत भरतपूरचे नांव अजरामर आहे. या किल्ल्याने इंग्रजांचा चार वेळां पराभव केला. सर्व किल्ले भराभर इंग्रजांच्या हवाली झाले. पण भरतपूरचा किल्ला मात्र भोवतालच्या पाण्यांत आपली मर्दुमकीर्ची प्रतिबिंबे दाखवीत अभिमानाने त्या वेळी उभा होता.
२१ जानेवारी १८०५
No comments:
Post a Comment