विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 February 2021

देशपांडे या आडनावाचा अर्थ काय

 


देशपांडे या आडनावाचा अर्थ काय?
देशपांडे हे खरतर आडनाव नसून पूर्वी राजेशाही कलमधले एक प्रशासनिक पद होते.
पूर्वी खेडी म्हणजे मौजे आणि अश्या अनेक खेड्यांचा मिळून एक परगणा व्हायचा. या परगण्याचा प्रमुख तो देशमुख्य/देशमुख आणि त्याच्या नंतर परगण्यातला वरिष्ठ अधिकारी म्हणजे देशपांडे. यांनाच देशकुलकर्णी किंवा देशस्वामी/देसाई असेही म्हणण्याचा प्रघात होता. कोकणात प्रभू हुद्दाही यांच्याच पर्यायी असे.
थोडक्यात हे एक वतनदार अथवा देशक होते. वतनदार म्हणजे पिढीजात एखादे काम करणारा ज्याला थेट सामान्य जनतेकडून कर वगैरे गोळा करून त्याच्या अधिकार क्षेत्रात राजाकडून प्रतिनिधी म्हणून संरक्षण वगैरे वेगवेगळ्या सुविधा पुरवाव्या लागायच्या. त्याला जनतेकडून गोळा केलेल्या करातूनच विशिष्ट टक्क्यात आपला वाटा किंवा वेतन/मोबदला मिळायचा.
परगण्यात गोळा होणाऱ्या एकूण शेतसाऱ्याच्या २-५ % वाटा यांचा असायचा तर धान्यावर ३% आणि रोख पैशांवर शेंकडा ७%. शिवाय बक्षीस/इनाम जमिनी वेगळ्या मिळत. जसे अधिकार गावात कुलकर्णी लोकांचे असत तेच अधिकार परगण्यात देशपांडे लोकांना मिळत. भेट, तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल इत्यादी वस्तू बलुत्याप्रमाणेंच त्यांनाहि मिळत मात्र प्रमाण जास्त असत.
परगण्याचे पूर्ण दप्तर अर्थात सर्व जमाबंदीचे कागदपत्र देशपांड्याच्या ताब्यांत असायचे आणि त्यांना सहाय्यक म्हणून मोहरीर नामक कारकुनांची नेमणूक केली जायची. निरनिराळ्या वहीतदारांचे, वतनदारीचे हक्क, अधिकार, जमिनीचें बारीक सारीक वर्णन या हिशोबांत दिलें जात.
हे देशपांडे सैन्यही बाळगत आणि यांना वेळप्रसंगी युद्धात वगैरे पराक्रम गाजवायची संधी मिळत. हे लोकही देशमुख, जहागिरदारांप्रमाणे गढी, कोट बांधून रहात असल्याने स्वतंत्र वागत. म्हणून या सर्वांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी यांचे महत्त्व कमी करून यांच्या गढ्या वगैरे उध्वस्त करून टाकल्या आणि त्यांना आपल्या सेनेत घेतले.
शिवशाहीत अनेक परगण्यांच्या देशपांड्यांनी सफाईदार लेखणीप्रमाणे शिलेदारी करून शत्रूस पाणी चारल्याची उदाहरणे आहेत.
माहिती स्रोत:
पंडित महादेवशास्त्री जोशी संकलित भारतीय संस्कृती कोश
डॉ. श्रीधर वेंकटेश केतकर संकलित महाराष्ट्रीय ज्ञानकोश
त्रिंबक नारायण अत्रे लिखित गावगाडा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...