व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
विजरई कोंदि द आल्व्होर हा दुर्भाट बंदर सोडून गोव्यास परतला. दि.१२-११-१६८३ या दिवशी सकाळचे आठ वाजले होते. विजरई निराश होऊन जुन्या गोव्यातील ‘बों जेजूस’ (Bom Jesus Basilica) या चर्चच्या शेजारी असलेल्या मठात जाऊन ४ दिवस राहिला. या चार दिवसात त्याने कोणाचीच भेट घेतली नाही. फोंडा किल्ल्यावर पोर्तुगीजांनी केलेल्या सततच्या मा-यामुळे किल्ल्याची अवस्था जिर्ण झाली होती. परत असा काही हल्ला झाला तर अथवा परत ही वेळ नको या विचाराने संभाजी महाराजांनी फोंड्याचा कोट पाडून जवळच एक नवीन किल्ला बांधला. त्यास त्यांनी किल्ले “मर्दनगड” हे नाव दिले.(पो.म.सं-१०२) फोंड्याचा संग्राम संपला तरी चौलचा वेढा सुरु होताच. निळोपंत पेशवे चौल येथे वेढा चालवीत होते. फोंड्यावरून संभाजी महाराज परत जातील असे विजरई कोंदि द आल्व्होर याचा समज होता, पण झाले उलटेच. संभाजी महाराजांनी तर आता थेट गोव्यातच शिरून निकाली हल्ला करण्याचे ठरवले. धर्मांध पोर्तुगीजांबद्दल संभाजी महाराजांना राग किती होता हे यावरून दिसून येते. मराठ्यांचे लक्ष होते आता ‘जुवे’ बेटाकडे. यास पोर्तुगीज ‘सांत इस्तेव्हांव’ असे म्हणत असत. गोव्याच्या ईशान्येला दोन मैलावर जुवे बेट आहे. हे बेट धावजी ह्या तीसवाडीतील गावाच्या पैल तीरास आहे. त्या बेटातून ओहटीच्या वेळी पायवाटेने गोवे शहरात येणे-जाणे कठीण नसे. म्हणून या पायवाटेस पोर्तुगीज Passo Seco असे म्हणत असत. पूर्वी दि.२५ नोव्हेंबर (साल उपलब्ध नाही) या दिवशी गोवा हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात आले होते. या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी ‘सांत इस्तेव्हांव’ येथे ‘सेंट कॅथेरीन’ नावाचे चर्च बांधले होते. या बेटावर एक छोटेखानी किल्ला देखील होता. इतर काही कारणांमुळे विजरईने तिथे सैनिक ठेवले नव्हते.(अ.हो.मो-२१९)
No comments:
Post a Comment