व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
भाग 9
दि.२४-११-१६८३ रोजी सुमारे रात्री ८ वा. मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. विजरईचे तर धाबेच दणाणले. जुवे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेधे शकवालीत मिळते – ” मार्गशीर्ष मासी फिरंगी याचे कुंभारजुवे घेतले, साष्टी व बारदेश मारिला “
मनुची लिहितो – ” संभाजीने ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक(तोफेचे)गोळे (गोव्याच्या दिशेने) सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्याने माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटे सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे पळत गेले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला. केवळ सुदैवाने तो बचावला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले. (पो.म.सं-१०५) त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला. तिथे झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली. कसाबसा जिव वाचवत तो मांडवी नदीच्या तीरावर आला. आता विजरई कोंदि द आल्व्होर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता.
बांध फोडून स्वताच्याच हाताने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही जाता येत नव्हते आणि पाठीमागून त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते. आपण संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित हे त्यास चांगलेच उमगले होते. संभाजी राजे किती इरेला पेटले होते हे यावरून दिसते. विजरई कोंदि द आल्व्होर तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले विजरई कोंदि द आल्व्होर याला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला ! आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत सोबत होते. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले. दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली. (म.स्वा-१४४) वर्षभरापूर्वीच संभाजी राजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना (बाळाजी आवजी चिटणीस) देहदंड दिला होता. मनात कुठल्याही प्रकारची द्वेष न ठेवता स्वराज्याच्या छत्रपती साठी ही स्वामीनिष्ठा आणखी कुठे पहावयास मिळणार ? हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे ऋण आहे ! खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संभाजी महाराजांनी त्यांचा सत्कार केला. त्याचा उल्लेख असा मिळतो – ” महाराजांनी खासा घोडीयावरून जिनास पाणी लागे तो घोडा घातला. त्याजबरोबर खंडो बल्लाळ यांनी घोडा घालून तरवार मारिली, शिपाई गिरी केली.पाणी चढले तेव्हा घोडा पोहणीला लागला, खंडो बल्लाळ यांनी उडी टाकून महाराजांचा घोडा धरून पोहून बाहेर निघाले. ते समयी संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले, घोडा बक्षिस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा दिल्या. सोबत पालखीचा मान दिला. ” (म.रा.चि.ब)
विजरई कोंदि द आल्व्होर हा पुरता घाबरला होता. मांडवी नदी पार करून कसाबसा जिव वाचवत तो थेट सेंट झेविअर कडे आश्रयास गेला. त्याने झेविअरची करुणा भाकली. सर्व मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची शवपेटी उघडली. त्याने आपला राजदंड आणि राजचिन्हे, स्वलिखित अर्ज झेविअरच्या पायथ्याशी ठेवला आणि प्रार्थना केली – ” हे राज्य तूच निर्माण केलेस आता तूच ह्याचा सांभाळ कर”. विजरई पूर्णपणे हवालदिल झाला होता. मराठ्यांचा मोर्चा आता साष्टी आणी बारदेश कडे वळला. संभाजी महाराज २०००० शिपाई, ५००० स्वार, आणि १० हत्ती घेऊन स्वारी केली. मराठे साष्टी आणि बारदेशात शिरल्यापासून जिकडे तिकडे जाळपोळ आणि लुटालूट करत होते. साष्टी आणि बारदेश मधील आग्वाद, रेइशमागुश, रायतूर, मुरगाव हे किल्ले सोडून सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकला. रायतूरच्या किल्ल्यास मराठ्यांचा सहा दिवस वेढा सुरु होता. साष्टी आणी बारदेश मधे मराठे २६ दिवस धुमाकूळ घालत होते. यावेळी संभाजी महाराजांनी ४६ तोफा बारदेश येथील किल्ल्यातून काढून नेल्या (पो.म.सं-१०८) विजरई कोंदि द आल्व्होर हा आता मुघलांच्या मदतीची वाट बघत बसला होता..आणि चमत्कार व्हावा असेच घडले. जणू सेंट झेविअरने त्याला कौल दिला. पोर्तुगीजांच्या मदतीसाठी निघालेला शहा आलम रामघाट उतरून गोव्यानाजिक दाखल झाला. या प्रवासात त्यालाही फार कष्ट झाले होते. बरेच मुघल सैन्य मृत्युमुखी पडले होते. या भागात घनदाट अरण्ये होती. नाईलाजाने शहा आलम यास घाटाच्या तोंडाशी चार मुक्काम करावे लागले. सैन्य आणि बुणगे यास घाट ओलांडण्यास फार कष्ट पडले. (फु.आ-१८)
No comments:
Post a Comment