संगीत, वाद्य आणि साहित्यप्रेमी असलेला इब्राहिम आदिलशाह द्वितीय स्वतःला सरस्वती आणि गणपती पुत्र मानत असे. आपल्या फर्मानाची सुरुवात देखील "अज पूजा श्री सरस्वती” अशी करत असे. इब्राहिम आदिलशाह द्वितीय याने किताब ए नवरस हा ग्रंथ देखील लिहला असून तो स्वतः उत्तम संगीताचा जाणकार आणि गायक देखील होता. याच आदिलशाहने विजापूरजवळ अतिशय सुंदर असे गाव वसवले होते, त्या शहरात अनेक महाल,बागा इतर देखील वास्तू होत्या. हे शहर इतके सुंदर होते की मुल्ला जहुरी नावाचा समकालीन ग्रंथकार लिहतो " शोभेमध्ये हे त्या शहरापुढे चंद्र देखील लज्जायमान होईल " तर इब्राहिम आदिलशाही द्वितीय याने वसवलेल्या या शहराचे नाव " नवरसपूर " या शहराचे नाव आदिलशहाने नवरसपूर कशामुळे ठेवले याची एक घटनात्मक नोंद आहे, ती घटना अशी की-
" ज्या दिवशी या शहराचे काम संपले त्या दिवशी विजापूर हद्दीत तोरवी नावाच्या गावातील एका इसमाने दारूचा भरलेला शिसा इब्राहिम आदिलशाह द्वितीय याच्यासमोर नजर केला. इब्राहिम आदिलशाह याने या शिशातील मद्य प्राशन केले. तेंव्हा त्या मद्यासारखी गोडी चमत्कारिक आणि अतिउत्तम होती ती आदिलशाहने यापूर्वी कधी पहिली नव्हती. दारूच्या प्रत्येक घोटागणिस वेगवेगळ्या तऱ्हेची चव लागत होती, त्या मद्याचा खुमार म्हणजे धुंदी मनास संतोष व आनंद देणारी होती. आदिलशाहने नंतर हे मद्य कुठून आणले व कोठे तयार केले याची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ज्या इसमाने आदिलशाहला दारूचा शिसा नजर केला होता त्याने सांगतीले की हि दारू याच शहरात तयार केली आहे. हे ऐकून आदिलशहाला खूप आनंद झाला आणि त्याने आज्ञा केली की आज मला " नवरसीद " म्हणजे नवीन सुखप्राप्ती झाली. तेंव्हा शकुन अपशकुन पाहून पाहून त्या नवीन वसवलेल्या शहराचे नाव नवरसपूर ठेवण्यात आले. "
इब्राहिम आदिलशाह द्वितीय याला नवरस हे नाव इतकं आवडलं की त्याने आपल्या शिक्का, झेंडे तसेच महाल इतकेच काय आपल्या ग्रंथाला देखील नवरस हे नाव दिले होते. संगीत तसेच साहित्य आणि मद्याची रसिक माणसे ही अशी अवलिया असतात हे मात्र खरे !!
- राज दादा जाधव
No comments:
Post a Comment