राजगड मराठ्यांची राजधानी, गडांचा राजा राजियांचा गड राजगड. मोगल इतिहासकार साकी मुस्तैदखान लिहतो " राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही "
तर असा हा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मोगलाचा रजपूत अधिकारी किशोरसिंह हाडा याने जून १६८९ मध्ये जिंकून घेतला. औरंगजेब याने या किल्ल्यावर अबुल्खैरखान याची नेमणूक केली होती. १६८९ नंतर राजाराम महाराज जिंजीस गेले त्यावेळी औरंगजेब याने आपली अर्धी फौज दक्षिणेकडे पाठवल्याने स्वराज्यावरील मोगल सेनेचा दबाव कमी होऊन मराठ्यांचे बळ वाढू लागले, मराठ्यांच्या नुसत्या धमकीने हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतला.
मराठ्यांनी राजगड घेतला याबद्दल मोगल इतिहासकार खाफिखान एक हकीकत नोंदवून ठेवतो, खाफिखान लिहतो " अबुल्खैरखान यास राजगडाची किल्लेदारी देण्यात आली होती. मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली, त्यांनी आपल्या बळाचे प्रदर्शन करून अबुल्खैरखान यास किल्ला खाली करून देण्यास सांगितले. फिरोजजंगाचे सैन्य जवळपास होते तरी तो नालायक आणि हलका माणूस घाबरला. मराठ्यांच्या तावडीतून सुटणे कठीण आहे असे त्याला वाटले, म्हणून त्याने आपले आणि बायकामुले यांचे जीवनदान मागितले. रात्रीच्या वेळी तो किल्ल्याबाहेर आला. काही बायका दोन तीन डोल्यातून होत्या. काही पायी चालत होत्या, त्यांच्या बरोबर जडजवाहिर, कपडेलत्ते इत्यादीच्या संदुका आणि पेटारे होते. मराठे चोहीकडे होते. त्यांनी वाटेत अबुल्खैरखान घेरले आणि लुबाडले, मोठी फजिती केली. अशा स्थितीत तो मध्यरात्रीच्या सुमारास फिरोजजंगाच्या छावणीत पोहचला. आपल्या नादानपणाचा पश्चाताप होऊन तो दुःख करू लागला. बादशहाला हे कळताच त्याने त्याला बडतर्फ करून जबरदस्तीने मक्केच्या यात्रेला पाठवले "
आपल्या शत्रुच्या मराठयांच्या विजयामुळे आणि आपल्या पराभवाने मक्केची यात्री करायला मिळणारा असा हा किल्लेदार, मनातल्या मनात किती खुश झाला कोणास ठाऊक. अशी ही या मोगल किल्लेदाराची मजेदार हकीकत.. !!
- राज जाधव
No comments:
Post a Comment