विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 March 2021

राघोबादादांचा वाडा, कोपरगाव

 














राघोबादादांचा वाडा, कोपरगाव
अहमदनगर जिल्यात असणारे कोपरगांव शहर गोदावरीच्या काठी वसलेलं असून दक्षिण गंगा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदावरीमुळेच त्याला तीर्थस्थानाचं महत्त्व आलं आहे. देवगुरूपुत्र कचेश्वर, दानवांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते ऋषी शुक्राचार्य आणि देवयानी यांच्या समाध्या गोदातटी कोपरगावच्या बेटातच आहेत. त्यामुळेच कोपरगाव आणि आसपासचा परिसर पूर्वापार पुराणकथांनी समृध्द आहे. पण हे गाव नावारुपाला आलं ते तिथे राघोबादादा पेशवे यांना नजरकैदेत ठेवल्यामुळे. मात्र नजरकैदेत असले तरी राघोबादादांनी तिथे आपल्या वास्तव्यासाठी भव्य असे वाडे बांधले. त्यातील एक वाडा शहरात असून दुसरा अपूर्ण स्वरूपात असून तो जवळच असलेल्या हिंगणी गावात आहे. एक वाडा बेटात होता पण तो वाडा आज अस्तित्वात नाही.
शहरातील वाडा गोदावरीच्या उत्तर काठावर आहे. हा वाडा अठराव्या शतकाच्या मध्यावधीत बांधण्यात आला. वाड्याच्या नक्षीदार जाळीवजा महिरपी खिडक्या आपले लक्ष वेधून घेतात. वाडा सुमारे २५ फूट उंचीच्या भक्कम दगडी चौथऱ्यावर आहे. नदीच्या संभाव्य पुराच्या धोक्यामुळे त्याची उंची प्रचंड घेतलेली असावी. वाड्यात उत्तर बाजूने पायऱ्यांनी प्रवेश करता येतो. आत एक पूर्वाभिमुख द्वार दिसते त्यातून मुख्य वाड्यात प्रवेश करता येतो. आत गेल्यावर दिसतो तो दिवाणखाना. त्याच्या छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे. पुढे गेल्यावर एक मोठा चौक दिसतो. वाड्यात दिवाणखान्यात सोबतच सदर, मुदपाकखाना, कोठीघर, खलबतखाना इत्यादी असावे. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे बालपण गेले तो हाच वाडा. पुढे पेशवेपदी असतानाही अनेकदा ते कोपरगावी येत. १८१८ ला मराठेशाहीच्या पतानानंतर वाडा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी तेथे अनेक प्रशासकीय कार्यालये सुरू केली. मधल्या काळात वाड्यात अनेक फेरबदल व दुरुस्त्या झाल्याने तसेच वाड्याची बरीच पडझड झाल्याने वाड्याची अंतर्गत रचना पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर तेथे मामलेदार कचेरी सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात वाडा पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. पेशवेकालीन वैभवाचा मुक साक्षीदार असणारा हा वाडा काष्टकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
- रोहन गाडेकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...