दक्षिणेचे राजकारण करताना शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी मित्रत्वाचे संबंध राखले होते. विजापूर दरबाराची सूत्रे हाती आल्यावर बहलोलखानाने आक्रमक धोरण स्वीकारले. कुतुबशहाच्या प्रदेशात धुडगूस घालण्यासाठी पठाणांची तुकडी पाठविली. चंदीचंदावरकडे कुतुबशाही प्रदेशात पठाणांनी बंडखोरी सुरू केली होती तेव्हा दक्षिणेत आदिलशाहीबरोबर कुतुबशाहीलाही पठाणांच्या घुसखोरीचा धोका निर्माण झाला होता. अर्थात हा धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही निर्माण झाला होता. हा धोका नाहीसा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका नव्या राजकीय सूत्राची मांडणी केली. ते सूत्र म्हणजे दक्षिण देश दक्षिण्यांच्याच स्वामित्वाखाली असला पाहिजे. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे सूत्र त्यांनी आपल्या भावी राजकारणासाठी निश्चित केले. 'दक्षिण पातशाही तो राखली पाहिजे' हे शिवाजी महाराजांच्या मुघलविषयक धोरणाचे आता मुख्य सुत्र झाले होते. मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यास जे पत्र लिहिले त्या पत्रात या सूत्राचे स्पष्टीकरण महाराजांनी केलेले आहे. ‘दक्षणचे पादशाहीस पठाण जाला, ही गोष्ट बरी नव्हे! ...आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणांची नेस्तनाबूद करणे; दक्षणची पादशाही आम्हा दक्षणियांच्या हाती आहे ते करावे.
शिवाजी महाराजांचे नेमके धोरण या पत्रावरून स्पष्ट होते आणि या धोरणाला अनुसरून मार्च १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्यास जाऊन कुतुबशहाची भेट घेतली. प्रत्यक्ष भेटीमध्ये दक्षिण भागात पठाणांचा धोका कसा निर्माण झाला आहे याची जाणीव महाराजांनी कुतुबशहास आणि मादण्णा प्रधानास करून दिली. त्यानंतर कर्नाटक मोहिमेची कडेकोट तयारी करण्याचे त्यांनी ठरविले. तंजावरचा राजा व्यंकोजी भोसले हा आपला सावत्र भाऊ असून शक्य झाल्यास त्यालाही स्वराज्यकार्यात ओढून घ्यावयाचे; शक्य न झाल्यास आपल्या पित्याच्या कर्नाटकातील जहागिरीचा वाटा त्याच्याकडे मागावयाचा म्हणजे काहीतरी युक्तीप्रयुक्ती होऊन व्यंकोजीला आपल्याकडे वळवायचे असाही एक हेतु शिवाजी महाराजांनी मनात बाळगला होता. ।
कर्नाटकसारख्या दूरवरच्या प्रदेशात मोहीम काढावयाची असल्यामुळे समर्थ शत्रूना काहीकाळ तरी स्वस्थ बसवावे म्हणजे त्यांच्याकडून आक्रमण होणार नाही असा दूरगामी विचार शिवाजी महाराजांनी केला. विशेषतः मुघलांचा धोका उद्भवण्याची अधिक शक्यता होती. म्हणून डिसेंबर १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याचेबरोबर सलोख्याचा तह केला.
कर्नाटक मोहीम प्रदिर्घ काळ चालणार असल्यामुळे स्वराज्याची कडेकोट व्यवस्था महाराजांनी लावली. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि युवराज संभाजी महाराज यांच्यावर स्वराज्यामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली.
क्रमशः ....!!!
No comments:
Post a Comment