विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ५

 


कर्नाटक स्वारी : भाग ५
अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. प्रथम भागानगरला जाऊन कुतुबशहाची भेट घेतली आणि आपल्या मोहिमेस त्याचा पाठिंबा मिळविला. कुतूबशहाचा सेनापती मिझ महंमद हाही ससैन्य महाराजांच्या मोहिमेत सामील झाला. कर्नाटककडे जाताना श्रीशैल याठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे महाराजांनी दर्शन घेतले. त्यानंतर अनंतपूर, मंदियाळ, कडप्पा, तिरूपती या मार्गाने मे १६७७च्या पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज मद्रासजवळ पोहोचले. तेथून त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याचे एक पथक पाठविले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला अतिशय अभेद्य असून सहजासहजी जिंकण्यासारखा नाही.
परंतु जिंजीचा किल्लेदार नसीर महंमदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात १३ मे १६७७ रोजी जिजीचा किल्ला मराठ्यांना देऊन टाकला. जिंजी जिंकल्यानंतर वेलोरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकण्याचे ठरविले. हा किल्लाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. किल्ल्याच्या खंदकात खोलवर पाणी असून त्या पाण्यात सुसरी आणि इतर जलचर प्राणी फिरत होते.'या तोडीचा गड पृथ्वीवर दुसरा नाही अशी याची ख्याती होती. अशा या अवघड किल्ल्याला मराठ्यांनी चिवटपणे वेढा घातला. परंतु किल्ला लवकर हाती येण्याची शक्यता वाटेना. तेव्हा या वेढ्याची जबाबदारी महाराजांनी रघुनाथराव व आनंदराव यांच्यावर सोपविली आणि स्वतः शेरखान लोदी या सरदाराच्या पाठलागावर निघाले. २६ जून १६७७ रोजी शेरखानाचा सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती लागला. स्वत: शेरखान शिवाजी महाराजांना शरण गेला. त्यानंतर महाराजांनी मदुरेपर्यंत जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
🚩व्यंकोजीचा प्रश्न 🚩
व्यंकोजीला आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याची शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु महाराज कर्नाटक मोहिमेवर निघाल्यापासून व्यंकोजीला त्यांच्या हेतूविषयी शंका वाटत होती. मोहिमेत ज्यावेळी तंजावरपासून नऊ मैल अंतरावर कावेरीच्या काठी महाराजांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांनी व्यंकोजीला मुद्दाम भेटीसाठी बोलावले. महाराजांच्या मुक्कामापासून तंजावर छत्रपती शिवाजी महाराज केवळ ८-९ मैल दूर होते. तेव्हा आपल्या राजधानीपासून सुरक्षित अंतर असलेल्या महाराजांच्या तळापर्यंत जाणे व्यंकोजीला अवघड नव्हते. व्यंकोजीने शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्याच्याशी दिलखुलासपणे बातचीत केली. शहाजीच्या कर्नाटक जहागिरीतील वाटाही मागितला. त्यापूर्वीही वकीलामार्फत व्यंकोजीशी महाराजांचे बोलणे झाले होते. ही सर्व बोलणी सामोपचारपद्धतीने झाली होती. बोलणी चालू असताना अचानकपणे महाराजांना न सांगताच व्यंकोजी पळून गेला, याचे फारच दु:ख महाराजांना झाले.
'व्यंकोजीला पकडण्याचा किंवा त्याची बिरूदे हिसकावून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असे असताना न सांगता व्यंकोजी राजे का पळाले?"म्हणून महाराज व्यथित होऊन बोलले ,‘उगी उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटेपणास योग्य केली.'
व्यंकोजी पळून गेल्याचे दु:ख शिवाजी महाराजांना अतोनात झाले. परंतु स्वतः व्यंकोजीने मात्र मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची तयारी केली. कावेरीच्या परिसरात संताजी भोसले याचे लष्कर होते. त्याच्यावर १५ नोव्हेंबर १६७७ रोजी व्यंकोजीने हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. संताजी त्यावेळी बेसावध होता. यशस्वी माघार घेतल्यानंतर त्याने पुन्हा तयारी केली आणि वलीगंडपूर येथे झालेल्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केला. अशाप्रकारे व्यंकोजीचा पराभव झालेला असला तरी शिवाजी महाराजांना त्याचेबद्दल माया वाटत होती आणि म्हणून एक सविस्तर पत्र लिहून शिवाजीने व्यंकोजीला लिहिले, ‘दुर्योधनासारखी बुद्धी करून, तुम्ही युद्ध केले...... झाले ते झाले आता हट्ट न करणे' दरम्यान मराठ्यांनी व्यंकोजीची अनेक ठाणी जिंकून घेतली. शेवटी व्यंकोजीने रघुनाथपंत हणमंते याचेमार्फत शिवाजी महाराजां बरोबर तह केला.
ऐन पावसाळ्यातही शिवाजीची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७च्या सुमारास शिवाजी महाराज तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पटनोव्हा या ठिकाणी आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्कटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर १६७७ मध्ये आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे
ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची सांगता केली.
जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था ।
शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो प्रदेश जिकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लाऊन दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी प्रथम केले.
संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांची निवड केली. जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली होती, परंतु महाराजांनी कारागिर लावून किल्ल्याची उत्तम डागडुजी केली. एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. ‘अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नसत. रयतेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिका-यांना, सैनिकांना ते सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगत.
जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजी महाराजां विरूद्ध युद्ध पुकारले. ही देसाई स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस लढविला. शेवटी शिवाजी महाराजां पुढे तिला माघार घ्यावी लागली.महाराजांनी या देसाई स्त्रीचे मोठे कौतुक केले. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावर
आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागेल. ही मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजी महाराजांचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला. पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार करून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली.
🚩संभाजी महाराज मुघलांना मिळाले🚩
कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना संगमेश्वरास पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत ते संगमेश्वरलाच राहिले होते. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते. युवराज संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांचा विश्वासहीं होता कारण कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी इंग्रज सरवखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी संभाजी महाराजांवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे मन संभाजीमहाराजां विषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि संभाजी महाराजांचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिका-यांनी महाराजांजवळ संभाजी महाराजांविषयी कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वत: संभाजीमहाराजांच्याही काही तक्रारी होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही. थोडक्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे मात्र निश्चित.
कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीमहाराजांना सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीमहाराजांची चित्तवृत्ती शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजीमहाराज जेव्हा सज्जनगडाकडे गेले तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्दिग्न झालेल्या संभाजीमहाराजांचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीमहाराजांच्या या मन:स्थितीचा अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक संभाजीमहाराजांकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला.
शिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे संभाजीमहाराजांनी मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले. संभाजीमहाराज १६७९च्या प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाले. संभाजीमहाराज आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला. त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण आदिलशाहीविरूद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी दिलेरखान संभाजीमहाराजांना बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन केला. भूपाळगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरूद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजीमहाराज दिलेरखानाबरोबर होते अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीमहाराजांनी मदत केली. या सर्व वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजीमहाराज आपणास सोडून गेले याचे त्यांना विलक्षण दु:ख झाले होते. परंतु संभाजीमहाराजांच्या मानी स्वभावास मुघलांची चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीमहाराजांना पटेनासे झाले.दिलेरखान आणि संभाजीमहाराज यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीमहाराजांना कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजीमहाराज पूर्णपणे विटले. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीमहाराजांच्या मागावर ठेवलेली होती. गुपचूपपणे संभाजीमहाराजांना ती भेटतही होती. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती.अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडले आणि पन्हाळ्यास परत आले. त्यांना भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले. १३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीमहाराजांना अधिकार दिला.
🚩मुघलांविरूद्ध आघाडी🚩
कर्नाटकाची मोहीम हाती घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी ‘दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधिशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे' असे धोरण निश्चित केले होते. “दक्षिण्यांची दक्षिण' हे त्यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने मुघलांविरूद्ध कुतुबशहा आणि आदिलशहा यांना मदत करण्याचे धोरण महाराजांनी स्विकारले होते. संभाजी राजे मध्यंतरी मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे विलक्षण पेच महाराजांपुढे निर्माण झाला होता. परंतु संभाजीमहाराज मुघलांकडे फार काळ राहू शकले नाही. ते परत येताच शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध नवी आघाडी उभारली. आदिलशहाला मदत करण्यासाठी थेट विजापूरपर्यंत जाऊन मुघली फौजांची दाणादाण उडवली. त्यानंतर मराठवाड्यात थेट जालन्यापर्यंत जाऊन तेथील पेठ लुटली. आणि मुघलांमध्ये दहशत निर्माण केली. याच काळात शिवाजीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे मोरोपंत पेशव्याने खानदेशात शिरून धरणगाव, चोपडा ही शहरे लुटली. मलकापूर पर्यंतचा प्रदेश काबीज करून बागलाणामध्ये मुघलांचा पुरता बिमोड केला. अहिवंतसारखे किल्ले जिंकून घेतले आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर हुकूमत निर्माण केली. या नव्या मोहिमेमुळे दिलेरखान मोठ्या पेचात सापडला होता. कारण मराठ्यांनी त्याची रसद तोडून पूर्ण नाकेबंदी केलेली होती. औरंगजेबाच्या आदेशानुसार
रणमस्तखान हा सरदार मोठी फौज घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी निघाला होता. परंतु वाटेतच मराठ्यांनी रणमस्तखानास गाठले आणि त्याच्या फौजेवर असा काही चौफेर हल्ला केली की त्यामुळे त्याला औरंगाबादकडे पळून जावे लागले अशाप्रकारे मुघलांच्या पदरात नामुष्की आली. शेवटी मुघलांनी आदिलशाहीविरूद्ध मोहिम थांबविली आणि फेब्रुवारी १६८० मध्ये विजापूरचा वेढा उठविला. मुघलांसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराज रायगडकडे परतले. काही घरगुती मंगलकार्ये त्यांना उरकायची होती म्हणून राजधानी रायगडवरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी तर महाराजांचे सख्य झाले होते. १६८० च्या प्रारंभी क्रमांक एकचा शत्रू मुघल नामोहरम झाला होता आणि १६८० च्या प्रारंभापर्यंत पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्त्य वखारवाले यांनाही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले होते.
समाप्त....
🚩जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...