साधारण १७ वर्षापूर्वी ची गोष्ट आहे मी. वेळ मिळेल तसा फिरायचो. फक्त जय भवानी जय शिवाजी एवढ्याच इतिहासावर अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेलो होतो. साधारण २०१५ मध्ये साताऱ्यातल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि दक्षिणेतल्या भटकंतीला एक वेगळी दिशा मिळाली. अर्थातच तो तरुण म्हणजे अनिकेत वाघ. त्यानंतर आम्ही बरेच भटकलो बरेचसे जुने नवे किल्ले शोधले. दक्षिणेतल्या बऱ्याच किल्ल्यांचे रहस्य लोकांसमोर मांडू लागलो. त्यादरम्यान अनिकेतने मला राजा शिवछत्रपती ही मालिका डाऊनलोड करून दिली. मोकळ्या वेळात मी ती पाहायचो. पण ती मालिका पाहताना एक कॅरेक्टर अगदी मनापासून आवडलं आणि ते कॅरेक्टर म्हणजे महाराजसाहेब शहाजीराजे.
अगदी चौथीपासून इतिहासाचे धडे आम्ही गिरवले पण महाराज साहेब शहाजी राजे यांची ओळख केवळ आदिलशाहीचा नोकर यापलीकडे काहीच नव्हती. मी कदाचित त्यावेळी एखादा भावनिक व्यक्ती असेल. परंतु शहाजीराजांची ची छाप माझ्या मनावर अशी काही पडली की मी आणि अनिकेत ने ठरवले की तामिळनाडू पासून महाराज साहेबांची समाधी साधारण ६०० किलोमीटर आहे, आपण काहीही करून तिथे जायच. आमच्या दोघांची तयारी झाली अगदी आम्ही दोघांनी बॅगा सुद्धा पॅक केल्या. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होतं. अनिकेतला त्याच्या कंपनीतून परदेशी जाण्याची ऑफर आली. हा त्याच्यासाठी खूप चांगला चान्स होता. नाईलाजाने का होईना त्याला परदेशी जावे लागले. आता मी एकटा पडलो होतो. भटकंती पूर्णपणे स्थिरावली होती.
पण मग जिंजीच्या किल्ल्यांचं मनावर आरूढ झालेले गारुड काही स्वस्थ बसू देईना. माझा कंपनीतला मित्र बाळकृष्ण येवले आणि मी दोघांनी मिळून जिंजीचा सहावा आणि सातवा किल्ला शोधला आणि अथांग कष्ट करून तो सर केला. अर्थातच याचे सर्व श्रेय हे माझा मित्र बाळकृष्ण येवले याचे आहे. कारण तो जर सोबत नसता तर हे सर्व शक्यच नव्हते.
कालांतराने माझ्यातला इतिहास प्रेमी अगदी पेटून उठलेला होता. मी माझी बदली बेंगलोरला करून घेतली. बेंगलोर म्हणजे महाराज साहेब शहाजी राजे यांचे निवासस्थान. बेंगलोर ला आल्यापासून माझी जी निरंतर भटकंती चालू झाली ती अशी की दोन वर्षात किमान दीडशे किलोमीटर परिसरात माझ्यासाठी फिरण्या सारखे काहीच उरले नाही. पाच वर्षानंतर दुचाकीवर २५० किलोमीटरचा प्रवास करून होदीगेरे येथील महाराज साहेबांच्या समाधीवर मस्तक टेकण्याचे भाग्य लाभले.
________________________________________
खरतर यामागे प्रेरणा होती ती महाराज साहेब शहाजी राजे यांची. सुरुवातीला बेंगलोर, होस्कोटे, कोलार, चिकबाळापुर, सिरा, चनपटना, अरसिकेरे अश्या ठिकाण मी आपल्या बापजाद्यांची बलस्थाने म्हणून फिरू लागलो. त्यासोबत मला इतिहासाचीही साथ लाभली. लोकल इतिहास असूद्या नाहीतर वा सी बेंद्रे यांसारख्या इतिहासाचाऱ्यानी ससंदर्भ मांडलेला इतिहास असो, मी तो आवडीने वाचू लागलो.
विशेष म्हणजे मला शहाजी राजा विषयी इतकं कौतुक वाटू लागलं की शहाजीराजे विषयी मिळेल ते पुस्तक मी वाचू लागलो.
इतिहास वाचन करताना एक गोष्ट लक्षात आली की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा प्रपंच मांडला तो शहाजी महाराजांच्या कल्पनेतलाच प्रत्यक्ष रूपधारण केलेला एक भाग होता.
शहाजीराजे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील मिस्टर इंडिया. हा माणूस कधी कोणाला दिसला नाही किंवा कुणी त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला नाही. हा माणूस कदाचित आमच्या इतिहासकारांच्या नाकर्तेपणामुळे अंधारात खितपत पडला. शिवाजी महाराजांना इतिहासात इतकं मोठं स्थान मिळालं की त्या मानाने इतिहासात करते पुरुष असे कोणीच उरले नाही अशी सर्वांची धारणा झाली. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे इतिहासात कर्तुत्व नव्हते असा मुळीच नाही परंतू मंदिर पाहताना आपण पाया मात्र विसरलो.
परिस्थितीशी दोन हात करताना या स्वाभिमानी आणि मुत्सद्दी माणसाने स्वधर्म आणि स्वराज्य ह्या दोन गोष्टींशी कायम निष्ठा ठेवली. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या माय भुला स्वातंत्र्याची पहिली झलक जर कोणी दाखवले असेल तर ती महाराज साहेब शहाजीराजांनी. दक्षिणेतील राजकारणात समतोल साधायचा असेल आणि राष्ट्राचे भले करायचे असेल तर दिल्लीच्या बादशाही कडून निजामशाही कुतुबशाही व आदिलशाही यांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे हे महाराज साहेब शहाजीराजांनी पुरते ओळखले होते.
त्यामुळे मूर्तुझा सारखा लहान बालक त्यांनी मांडीवर घेऊन निजामशाही ला पुनर्जीवन देण्याचे काम केले. दुर्दैवाने निजामशाही टिकली नाही आणि मुर्तुजाला दिल्लीच्या बादशहाच्या स्वाधीन करण्यात आले व महाराज साहेब शहाजीराजांना आदिलशाहीत नोकरी पत्करावी लागली.
आदिलशाही दरबारात महाराज साहेबांचे वजन एवढे की त्यांनी मराठी सरदारांना वजीरीही देवविल्या. मराठे सरदार हे शहाजी राजांकडे आशेने पाहू लागले. शहाजी महाराजांसाठी अख्खा दक्षिण भारत मोकळा होता. शहाजी महाराजांनी जिकडे जावे तिकडचा भूभाग आणि त्या भागातले नायक राजे महाराज साहेबांना शरण येऊ लागले. महाराज साहेबांनी त्यांना समाप्त किंवा नष्ट करण्या ऐवजी त्यांना अंकित राजे म्हणून ठेवलं. हे सर्व पाळेकर राजे अंकित राहिल्यामुळे त्यांची राज्यही वाचली व महाराज साहेबांविषयी या पाळेगारांच्या मनात आदर निर्माण झाला. आदिलशहा पेक्षा हे सर्व पाळेगार महाराज साहेबांना मानू लागले. महाराज साहेबांच्या मुत्सद्देगिरीने व तलवारीच्या धाकाने आदिलशाहीच्या सीमा चार पटीने वाढल्या.
महाराज साहेब ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची होणारी प्रगती अर्थातच आदिलशाहीच्या काही सरदारांना खुपू लागली होती. अफजल खान, मुस्तफा खान, बाजी घोरपडे, बडी बेगम यांसारखा एक गट महाराज साहेबांना कायम पाण्यात पाहू लागला होता. त्यांनी आदिलशहाला महाराज साहेबांविषयी भडक वले व आदिलशहाच्या मनात महाराज साहेबांविषयी घृणा निर्माण करू लागले. महाराज साहेबांवर कित्येकदा कटकारस्थाने रचण्यात आली परंतु बुद्धीच्या आणि शौर्याच्या बळावर त्यांनी ती सर्व कटकारस्थाने मोडीत काढली.
__________________________________________
महाराज साहेब फक्त प्रदेश जिंकत राहिले नाहीत तर त्यांनी दक्षिण भारतात आपले राजकीय संबंध इतके मजबूत करून घेतले की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी राणीसरकार, शाहू महाराज या मराठ्यांच्या पुढच्या पिढीला ते पावलोपावली कामी आले.
महाराज साहेब हे उत्तम संस्कृतचे जाणकार होते. त्यांनी अनेक काव्य रचली. काव्य संवाद हा त्यांचा आवडीचा विषय. संगीत नाटक हा नाटकाचा प्रकार आहे त्या नाटक प्रकाराचे जनक शहाजीराजे आहेत.
_______________________________________
शहाजी महाराज यांचे काल आणि कर्तृत्व पाहताना एक गोष्ट मात्र नक्की दृष्टीआड करता येत नाही ती म्हणजे त्यांचे दोन कर्तृत्ववान पुत्र, एक संभाजी महाराज आणि दुसरे शिवाजी महाराज. दोघेही एकमेकांपेक्षा पराक्रमी आणि सरस. राजाधिराज संभाजीराजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे यांची प्रतिकृती होय. राजाधिराज संभाजी राजे ह्या शब्दाचा इतिहास पुन्हा कधीतरी सांगेन. महाराज साहेब शहाजीराजे यांनी आपले दोन्ही पुत्र इतके कर्तृत्ववान आणि मुत्सद्दी घडवले की नियतीला ही त्याचा हेवा वाटावा. आणि कदाचित त्यामुळेच कि काय नियतीने महाराज साहेबा पासून संभाजी महाराजांना वेगळं केलं. कनकगिरीच्या एका लढाईत थोरले संभाजी महाराज धारातीर्थी पडले. एक पिता आपली स्वप्न आपल्या पुत्रामध्ये बघत असतो. महाराज साहेबांनीही आपली स्वप्न संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांमध्ये बघितली असतील यात शंका नाही. स्वतःचा पराक्रमी पुत्र गमावल्यावर त्या महान पुरुषाला काय यातना झाल्या असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत.
त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच होदीगेरे या ठिकाणी शिकार करत असताना महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय एका विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्याच्या रिकिबीत पाय अडकून फरफटले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
शहाजीराजे यांच्या मृत्यूने स्वराज्याला फार मोठा धक्का बसला होता. स्वराज्या बरोबरच दक्षिण भारताचाही फार मोठा आधार नाहीसा झाला होता. व्यंकोजी राजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज ही स्वराज्याची आधार श्रंखला महाराज साहेबांना कधीच विसरली नाही. कारण शहाजीराजे केवळ त्यांचे पूर्वज न्हवते तर उभे राहिलेल्या स्वराज्यरुपी वटवृक्षाचे मुळाधार शहाजीराजे होते. छत्रपती शाहू महाराज म्हणजे शहाजीराजांचा पणतू हा पणतू आपल्या खापरपणजोबाच्या
समाधीला दिवाबत्तीची सोय करतो यावरून शहाजी महाराजांचे स्वराज्यातील स्थान व त्यांच्या वंशजांच्या प्रती महाराज साहेबांविषयी असलेली कृतज्ञता प्रकट होते. जगाच्या पाठीवर असं दुसरं उदाहरण सापडायच नाही.
होदिगेरे या छोट्याशा खेड्यात चिरविश्रांती घेणारा हा राष्ट्रपुरुष आमच्या हृदयात कायम प्रेरणा ज्योतीच्या रुपाने चिरंजीव राहील.
फर्जंद महाराज साहेब शहाजीराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पोस्ट साभार : Amar Salunkhe Bhau Maratha
No comments:
Post a Comment