साभार : दै. सकाळ
माणदेश हा कायम दुष्काळी पट्टयातला प्रदेश, माण नदीच्या आसपासचा परिसर मिळून जो प्रदेश येतो तो माणदेश. खटाव, माण, खानापूर, सांगोला तालुक्यांच्या काही भाग मिळून आज माणदेशाची ओळख आहे. या दुष्काळी भागाला इतिहास मात्र मोठा लाभला आहे. शिवकालीन इतिहासातील अशाच एका घटनेबाबत माहिती या लेखात वाचायला मिळणार आहे. काबूलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा शहेनशहा औरंगजेबापूढे अनेक राजे महाराजांनी आपल्या समशेरी म्यान करत त्याची चाकरी पत्करली. मात्र त्याच्या समोर धिप्पाडपणे उभे होते रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज... त्यांचे स्वराज्य.. स्वराज्यावर मोगलांनी अनेक हल्ले केले. मात्र औरंगजेबला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मोगल बादशहा औरंगजेब याला स्वराज्यावर विजय मिळविणे सहज शक्य होईल असे वाटले होते. मात्र त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांसह इतर शत्रूंना जोराची टक्कर देत स्वराज्यापासून दूर ठेवले. त्यामुळे औरंगजेब दिल्ली सोडून मोठ्या फौजफाट्यासह स्वतः स्वराज्यावर चालून आला. त्याने संभाजी महाराजांना पकडून हाल हाल करुन मारले. औरंगजेबाला वाटले आता तरी आपण स्वराज्य सहज काबीज करु, मात्र संभाजीराजांच्या मृत्यूचा अंगार मावळ्यांच्या रक्तात फुलत होता. मावळे चौताळून उठले होते. छ. संभाजींच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी दक्षिणेतील जींजी किल्ल्यावरून राज्यकारभार सुरु करत मोगलांशी लढा सुरू ठेवला. मात्र 2 मार्च 1700 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सुत्रे हाती घेतली. ताराबाई यांनी मोठ्या जिद्दीने मोगलांना तोंड देत होत्या. मावळे गनिमी काव्याने डाव साधून ते मोगल सैन्यावर हल्ला करत अन वाऱ्याच्या वेगाने गायब होत. मुठभर मावळे कधी येत कधी हल्ला करत अन निघून जात, याचा थांगपत्ताही मोगलांना लागत नसे. संताजी-धनाजीच्या भितीने तर मोगलांना झोपही लागत नव्हती.
औरंगजेबही मोठ्या त्वेशाने मराठा सैन्याशी लढत होता. तोरणा, सिंहगड, विशाळगड, अजिक्यतारा, परळीचा सज्जनगड असे महत्वाचे किल्ले मोगलांनी ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात पाऊस, नद्यांना आलेले पुर यामुळे मोगल सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते. तरीही औरंगजेब एक एक किल्ला ताब्यात घेत होता. पावसामुळे औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले होते. सैन्य, जनावरे यांची अतोनात हानी झाली होती. खजिना रिकामा होत चालला होता. सैन्याचा पगारही वेळेत होत नव्हता. त्यामुळे सैन्यावर उपासमारीची वेळ आली होती.
असे असताना 21 जून 1700 रोजी सध्याच्या सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील भुषणगडाकडे औरंगजेबाच्या सैन्याने कूच केली. पावसामुळे बादशाही फौजेचे मोठे नुकसान झाले होते. अनेक जनावरे दगावली होती. जी शिल्लक होती ती म्हणायलाच जिंवत होती अशी त्यांची अवस्था होती. बादशहाच्या अनेक उमरावांना मुसळधार पावसात सोसाट्याच्या वाऱ्यात पायी चिखल तुडवित प्रवास करावा लागत होता. मौगल सैन्यावर निसर्गाचे एक प्रकारे आस्मानी संकटच कोसळले होते. दिवसाकाठी केवळ तीन मैलाचा प्रवास मोगल सैन्य करत असे.
●अचानक माण नदीला पूर आला●
परळीवरुन भुषणगडाचे साधारण 45 मैलाचे अंतर कापायला 35दिवस लागले. भुषणगड ताब्यात घ्यायला मोगलांना 1 महिना गेला. महिनाभरानंतर मोगल सैन्य भूषण गडाकडून 36 मैलाचे अंतर कापून 30 ऑगस्ट रोजी माण नदीजवळील खवासपूर येथे आले. तेथे कोरड्या नदीत मोगल फौजांनी छावणी टाकली. मोगल सैन्याची महिनाभर खवासपूरजवळ नदीत छावणी होती. 1 ऑक्टोंबर 1700 रोजी रात्री आजूबाच्या परिसरात अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे अचानक माण नदीला पूर आला. या पुरात मौगलांचे अनेक सैन्य, खजीना, जनावरे, वाहून गेली. मध्यरात्री काळोखात पुराचे पाणी अचानक छावणीत घुसल्यामुळे मोगल छावणीत हाहाकार माजला. अचानक छावणीत गोंधळ सुरू झाल्यामुळे औरंगजेबाला जाग आली. मराठ्यांनी छावणीवर हल्ला केल्याचा त्याचा समज झाला. दचकुन बिछाण्यातून औरंगजेब पळायला लागला, मात्र अडखळून त्याचा तोल गेल्याने तो जोरात आपटला. यात त्याचा गुडघा निखळला. कसाबसा स्वत:ला सावरत तो सुरक्षित ठिकाणी गेला.
मराठ्यां सोबतच या महाराष्ट्राच्या सह्याद्रीने
(महाराष्ट्राच्या मातीने) सुद्धा औरंग्याचा अक्षरशः छळ छळ केला.
पुढे वैद्य, हकिमांनी अनेक उपचार करुनही औरंगजेबाचा पाय सरळ झाला नाही. तो कायमचाच आदू झाला. या घटनेनंतर बादशहाचे खुशमस्करे बादशहाला बरे वाटावे म्हणून त्याची तुलना तैमुर लंग याच्याशी करू लागले. या पुरात मोगली सैन्याची मोठी हानी झाली. त्यानंतर औंरंगजेबाला नवीन घोडे, सैन्य भरती करावी लागली. मात्र पायला आलेले अपंगत्व अखेरपर्यंत राहिले.
No comments:
Post a Comment