१४ एप्रिल २०२१ रोजी लंडनमध्ये काही नाणी आणि मेडल्सची विक्री / लिलाव होणार आहे. त्याचा कॅटलॉग चाळताना हे एक इंटरेस्टिंग मेडल पहायला मिळालं. हे मेडल आहे १६७० चं. त्यावर एका बाजूला एक डबल पोर्टेट आहे - इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि त्याची बायको कॅथरिन ऑफ ब्रिगॅंझाचं. कॅथरिनच्या वडिलांकडून - म्हणजे पोर्तुगालचा राजा चौथ्या जॉनकडून - मुंबईची बेटं चार्ल्सला लग्नात आंदण मिळाली आणि त्याने ती पुढे ‘ईस्ट इंडीया कंपनी’ला भाडेतत्वावर दिली वगैरे गोष्टी सुप्रसिध्द आहेतच. (“मुंबई माझ्या बापाची आहे” - असं म्हणायचा ‘आद्य’ अधिकार कॅथरिनला होता असे आपण नक्कीच म्हणू शकतो - नाही का!)
पुन्हा मेडलकडे वळूयात. जिथे पोर्टेटस आहेत तिथे लॅटीनमध्ये लिहीलंय ‘Carolus Et Catharina Rex Et Regina’ म्हणजे ‘चार्ल्स आणि कॅथरीन - राजा आणि राणी’. ह्या मेडलची दुसरी बाजू जास्त इंटरेस्टींग आहे. ह्यावर एक पृथ्वीगोल आहे. ज्यात युरोप, आफ्रीका, भारतीय उपखंड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा वगैरे दाखवलेला आहे. ह्यात काय दाखवलंय त्यापेक्षा मेडलच्या ह्या बाजूवर जे काही लिहीलंय ते जास्त महत्वाचं आहे. त्यावर लॅटीनमधे लिहीलंय - “Diffusus in orbe Brittanus”. ह्याचा शब्दश: अर्थ होतो ‘ब्रिटनचा प्रचार (किंवा प्रभाव)’ आणि खरा अर्थ होतो ‘ब्रिटनच्या वसाहती’!
तसं बघितलं तर १६७० मध्ये ब्रिटन ही कोणत्याही प्रकारे प्रबळ सागरी सत्ता नव्हती. २-३ वर्षांपूर्वी - म्हणजे १६६५ ते १६६७ मध्ये झालेल्या - दुसऱ्या ॲंग्लो-डच युध्दात तर डच जहाजं सरळ लंडनमध्ये घुसून इंग्लिश आरमाराची नाचक्की झाली होती. (आपलीच जहाजं थेम्समध्ये बुडवून इंग्लिश आरमाराला डच आरमार लंडनमध्ये आत घुसण्यापासून वाचवावं लागलं होतं!) स्पेन आणि पोर्तुगालने इंग्रजांच्या आधी शंभर सव्वाशे वर्ष जगभर साम्राज्यविस्तार आणि वसाहती बसवायला सुरुवात केली होती. व्यापाराचं म्हणाल तर ‘डच ईस्ट इंडीया कंपनी’ ही इंग्लिश कंपनीपेक्षा खूप श्रीमंत आणि अमाप पैशाचे स्त्रोत असणारी होती. मग १६७० मध्ये हे मेडल बनवण्याचा काय अर्थ? तर हे मेडल ब्रिटीशांची साम्राज्यविस्ताराची इच्छा दाखवत होतं. आपण पुढे जाऊन संपूर्ण जगभर सत्ता गाजवू ही त्यांची अपेक्षा ह्यातून व्यक्त होत होती. ही असली नुसती मेडल्स बनवून इंग्रज थांबले नाहीत तर ही इच्छा वास्तवात उतरण्यासाठी जे काही साम-दाम-दंड-भेद इत्यादी उपाय (आणि सोबत अविरत कष्ट!) त्यांना करावे लागले ते त्यांनी केले. हे स्वप्न खरं करून दाखवलं.
पण हे भारतात शक्य कसं झालं? बरेचदा हा आरोप होतो की भारतीय राजे दुर्बल आणि सारासार विचार न करणारे होते त्यामुळे फक्त व्यापार करायला आलेले इंग्रज शिरजोर होऊन बसले. पण आपल्याकडे हे कोणालाच त्यांचे ‘खरे रंग’ वेळीच कळले नाहीत? कुणीच त्यांचं हे साम्राज्यविस्ताराचं कारस्थान ओळखलं नाही? असं अजिबात नाही. आपल्याकडे इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला समकालीन एक द्रष्टा राज्यकर्ता होऊन गेला ज्याने हा कावा खूप आधीच ओळखला होता - त्याचं नाव? छत्रपती शिवाजी महाराज!
पुरावा काय पण ह्याला? ‘आज्ञापत्रां’त छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवले आहेत त्यात महाराजांनी स्पष्ट म्हटले आहे - “...टोपीकर हेही लोक साहुकारी (व्यापार) करितात, परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्यक राज्यच करितात. त्यांचे हुकूमाने त्याचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसें काय घडों पाहतें? तथापि टोपीकरांचा ह्या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळीं कृतकार्याहि जाले आहेत. त्याहिवरि हट्टी जात, हातास आलें स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत...”
(‘आज्ञापत्र’ - रामचंद्रपंत अमात्य. संपादन - सबनीस, पृष्ठ २००-२०१)
हे उत्तम उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचूक निरीक्षण, सुयोग्य आकलन, आणि उपजत दूरदृष्टी ह्या गुणांचं!
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन!
- संकेत कुलकर्णी (लंडन)
No comments:
Post a Comment