*छत्रपती संभाजी महाराज यांना ज्वलज्ज्वलनतेजस ही बिरुदावली कोणी प्रदान केली ?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासमोर जी विशेषणे किंवा बिरुदे लावली जातात त्याविषयी एक लेखमाला लिहिण्याच मागे बोललो होतो त्यातील हा पहिला लेख.
शिवरायांच्या निधनानंतर तलवार व लेखणीच्या जोरावर गाजवलेली ९ वर्षांची झंझावाती कारकीर्द.परकीयांसहित स्वकीयांचाही विरोध असताना प्रखरपणे लढतच राहिले असे संभाजी महाराज.संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्याचा डाव आणखीन तीव्र केला.झुल्फीकारखान याने रायगडाला वेढा दिला.यावेळी छत्रपतींच्या परिवारातील सर्व मंडळी रायगडावर होती.अश्या वेळी जर रायगड पडला तर सर्व कुटुंब मुघलांच्या कैदेत जाईल पण महाराणी येसूबाई यांनी अत्यंत हुशारीने छत्रपती राजाराम महाराज यांना रायगडावरून बाहेर काढून दिले व रायगड मुघलांच्या ताब्यात दिला आणि शाहुराजे यांच्यासमवेत त्या कैद झाल्या(यामध्ये शिवरायांच्या पत्नी सकवारबाई या पण कैद झाल्या).
येथुन राजाराम महाराजांचा स्वराज्य वाचवण्यासाठीचा एक खडतर असा रायगड ते जिंजी प्रवास चालु झाला.
या प्रवासाची माहिती व छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र तत्कालीन कवी व पंडित केशवभट दामोधरभट उपाध्ये यांनी १६९० साली राजारामचरितम् या संस्कृत ग्रंथात लिहिले.सध्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय येथे आहे.या ग्रंथात एकुण पाच सर्ग आहेत यातील तिसऱ्या सर्गात संभाजी महाराज यांचे ज्वलज्ज्वलनतेजस असे वर्णन केलेला श्लोक.....
महाराजेन पित्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासननिषेदुषा || ५ ||
संभाजीकेन च भ्रात्रा "ज्वलज्ज्वलनतेजसा" |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषु च || ६ ||
*मराठी अर्थ - सिंहासन लालसेने महीपालांचा पाडाव करणारे त्यांचे पिता श्री शिवछत्रपती व जळजळीत ज्वलंत अश्या तेजाने चमकणारे भाऊ संभाजी यांच्यामुळे विरहित झालेले राजाराम महाराज.
१६९० सालीच केशवपंडित यांनी संभाजी महाराज यांच्यासाठी प्रदान केलेले बिरुद.यासाठी त्यांनी संभाजी महाराजांची संपुर्ण कारकीर्द अत्यंत जवळुन पाहिली असल्याने त्यांनी हे बिरूद फक्त आणि फक्त त्यांनाच प्रदान केले.समकालीन पुराव्यानुसार संभाजी महाराज यांची अशीच ज्वलज्ज्वलनतेजस प्रतिमा आपल्याला पहावयास मिळते.डॉ.सदाशिव शिवदे यांनी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रग्रंथाला 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' हेच नाव दिले.
*केशवपंडित कोण होते ?
केशवपंडित यांचे पुर्ण नाव केशवभट दामोधरभट उपाध्ये.हे राहणार मुळचे कोकणातले शृंगारपूरचे.तेथे ते उपाध्याय होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुर्वे यांच्याकडून शृंगारपूर ताब्यात घेतले तेव्हा ते स्वराज्याच्या चाकरीत रुजू झाले.केशवभट, गणेशभट, कवी कलश व शिवयोगी पंडित यांनी २३ मार्च १६७८ ला संभाजी महाराजांचा कलशाभिषेक केला.यांनीच संभाजी महाराजांना काली व तुळजाभवानी देवीची उपासना करण्यास सांगितले व ते शाक्त उपासक बनले.केशवभट यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना प्रयोगरुप रामायण सांगितलेले आहे.केशवभट यांनी संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथातर्गत दंडनिती हे प्रकरण लिहिले.याशिवाय त्यांनी धर्मकल्पकता, राजारामचरितम, परभूकथा याशिवाय आणखीही काही ग्रंथाचे लिखाण केले असावे असे मत वा.सी.बेंद्रे यांनी मांडले आहे.ते स्वराज्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.
*संदर्भ साहित्य :
१) केशवपंडितकृत श्री छत्रपति राजाराम महाराज यांचे चरित्र जिंजीचा प्रवास - संपादक वासुदेव सीताराम बेंद्रे
२) परमानंदकाव्यम् - संपादक डॉ.सदाशिव शिवदे अनुवादक डॉ.स.मो.अयाचित
३) शिवपुत्र संभाजी - डॉ.सौ.कमल गोखले
४) छत्रपति संभाजी महाराज संस्कृतसाहित्य - संपादन प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम
५) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार
६) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे
लेखन - सुशांत संजय उदावंत
'तुळजाई'नाथापुर,बीड
दि२४/०३/२०२१
No comments:
Post a Comment