विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

अळकुटी गावाचे सरदार कदमबांडे

 

#साक्ष इतिहासाची
इतिहासाचे शाश्वत स्वरूप म्हणजे काळाच्या ओघातही निसर्गाचे घाव झेलत उभ्या असलेल्या महाराष्ट्रातील भक्कम गढ्या आणि वैभवसंपन्न वाडे होत. इतिहासाच्या साधनांमधे याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. या गढ्या आणि वाडे इतिहासाच्या पाऊलखुणा जोपासत आजही उभे आहेत.काळाच्या जुलमी आघातांचा सामना करत आपली ओळख सांगणारे हे वाडे आणि गढ्या मला एका अर्थी जणू मुक साक्षीदार असणारे अव्यक्त कालपुरूष भासतात.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील अळकुटी हे गाव अशीच इतिहासाची मूर्तीमंत साक्ष जोपासणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथे इतिहासाचे अनेक दाखले मिळतात. या गावातील अनेक वास्तू या आजही इतिहासाचे मूर्त दर्शन घडविण्यात जागोजागी आपुल्या पाऊलखुणा जोपासत कालप्रहरी बनून उभ्या असलेल्या दिसतात.
इ.स. पूर्व ते इ.स.च्या प्रारंभीच्या काळात














अळकुटी एक वैभवसंपन्न गाव म्हणून सुपरिचित होतं. सातवहन साम्राज्याची या काळात मुहूर्तमेढ रोवली गेली .या साम्राज्याच्या प्रथम शासकाने पैठण (मुळ नाव प्रतिष्ठान) येथे आपली राजधानी निर्माण केली. त्याकाळी हिंद महासागर आणि अरबी समुद्रामार्गाने व्यापारास येणार्या परकीय व्यापार्यांना देशावर व्यापार करण्यासाठी जुन्नर जवळच्या नाणेघाटातून यावे लागत असे. नाणे घाटाच्या मुखावर व्यापारासाठी आणलेल्या जिन्नसांवर कर घेतला जाई. नाणेघाटातून जुन्नर - अळकुटी- पैठण असा व्यापारी मार्ग त्याकाळी असल्याने अळकुटी हे व्यापारी राजमार्गावरील एक महत्वाचे ठाणे म्हणून प्रसिद्धीस आले होते.
जुन्नर (मुळ नाव जीर्ण नगर,अपभ्रंशित नाव जुना नगर आणि सध्याचे सुपरिचित जुन्नर) हे या व्यापारी मार्गावरील पहिले महत्वाचे शहर होते.
तेथून पुढचा टप्पा म्हणजे अळकुटी हे शहर वजा गाव होय.
सातवहन काळानंतर अनेक शाह्यांनी देशावर म्हणजे महाराष्ट्रात सत्ता प्रस्तापित केली यामधे यादव साम्राज्य,निजामशाही,अदिलशाही,मोघल साम्राज्य आणि छत्रपती शिवरायांचे स्वराज्य या महत्वाच्या शाह्या होत. स्वराज्यात या भागावर एकहाती सत्ता ही छत्रपती संभाजी राजांचे पुत्र सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या काळात प्राप्त झाली.
या अळकुटी गावास अधिक महत्व प्राप्त झाले ते येथील सरदार कदमबांडे च्या ऐतिहासिक पराक्रमामुळे.
कदमबांडे हे मुळचे सातार्याचे पण वेगवेगळ्या शाह्यांमधे अळकुटी हे वतन स्वरूपात या परिवारास प्राप्त झाल्याने या परिवारातील एक शाखा इथे स्थिरावली आणि त्यामुळे गेली शेकडो वर्षे अळकुटीचा इतिहास या परिवारा भोवती गुंफला गेल्याचे येथील नागरिक सांगतात.
इथे कदमबांडे परिवाराची साधारणपणे चार एकरात विस्तारलेली एक भली मोठी गढी आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे. गेल्या काही वर्षात या गढीची मोठ्याप्रमाणावर पडझड गढीतील झाल्याने अनेक अवशेष आता पुर्णतः नष्ट झालेले आहेत.गढीचे प्रवेशद्वार आजही भक्कम स्वरूपात दिमाखात जरी उभे असले तरी या प्रवेशद्वाराचा दरवाजा नष्ट झाला आहे.प्रवेशद्वारावरील दगडी बांधकामात मराठी सत्तेचा मानबिंदू ठरणारे दोन शरभ कोरलेले दृष्टीस पडतात.साधारणपणे तीस एक वर्षापूर्वी पर्यंत या गढीचा एक दरवाजा अस्तित्वात होता खरा परंतू गढीच्या मालकांचे दुर्लक्ष झाल्याने तेथील दरवाजा आणि गढीच्या बुरूजांमधील असलेल्या सागाच्या तुळया चोरीस गेल्याचे दिसून येते.
या गढीत पूर्वी एक सिंहासन होते जे आता पहावयास मिळत नाही.गढीमधून जवळपास पाचशे ते सातशे मीटर लांबीचे भुयार ही अस्तित्वात आहे परंतू ते धोकादायक स्थितीत आल्याने गढीतील भुयाराचे तोंड पूर्णपणे बंद करून झाकण्यात आल्याचे गावकर्यांनी सांगितले.
गढीच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच कापडाचे व्यापारी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सांकला परिवाराचे वास्तव्य आहे. श्री.अतुलशेट सांकला हे सध्या तो व्यवसाय सांभाळत असताना या गढीच्या डागडुजीसाठी तन,मन,धनाने प्रयत्नशील असल्याचे जाणवते. अर्थातच गढीतील सध्याचे कदमबांडे परिवाराचे वारस श्री.अमोल कदमबांडे यांना ते सहकार्य करत असल्याचे तिथे भेट दिल्यावर कळाले. श्री.अमोल हे जमेल तशी या गढीची निगा राखण्याचा प्रयत्न करत असतात.
गढीच्या आतील भागात बांधकामासाठी चुनखडीचे मिश्रण करण्यासाठी बनवलेले जाते आणि त्याच्या खुणा स्पष्ट दिसतात.याच बरोबर मुख्य इमारतीचा काही अंश ही शाबूत असल्याचे दृष्टीक्षेपात येते. या उरलेल्या बांधकामासह दोन घरे गढीत पहायला मिळतात. या तीनही वास्तुमधे कदमबांडे परिवाराचे सध्याचे वंशज राहात आहेत.मोडकळीस आलेल्या या वास्तूंचे विदिर्ण करणारे दृष्य मनाला चटका लावून जाते.
अळकुटी गावातील एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात महादेवाची चक्क दोन मंदिरे आढळतात. त्यापैकी एक मंदिर हे गढीचा भाग असलेले आणि कदमबांडे परिवाराच्या मालकीचे मंदिर आहे. इथे एक शिलालेख मंदिरातील गाभार्याच्या प्रवेशद्वारावर श्रीगणेशाच्या प्रतिमेच्या वरील भागावर ठळक स्वरूपात कोरला असल्याचे आढळते. या शिलालेखास रंगरंगोटी केली गेली असल्याने इतिहासाचे हे ठोस पुरावे कसे जतन करावेत याबद्दल येथील गावकरी अनभिग्न आहेत.काही वर्षांपूर्वी इतिहास अभ्यासक श्री सतिश कदम यांनी या शिलालेखाच्या ट्रेसिंग्स घेऊन हा शिलालेख प्रसिद्ध केला आहे हे अवर्जून सांगावे लागेल.
येथील गावकर्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजमाता जिजाऊ आईसाहेब या छत्रपती शिवरायांच्या जन्माआधी गरोदर असताना शहाजीराज्यांसोबत शिवनेरीकडे कूच करत असताना या गढीत थांबल्या असल्याचे सांगतात. कदमबांडे यांनी राजमाता जिजाऊंनी अशा अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करणे टाळून इथेच मुक्काम करावा अशी गळ शहाजीराजे यांना घातली होती पण शत्रू मागावर असल्याने मुक्काम संभवत नाही असे सांगून काही वेळ विश्रांती घेऊन त्यांनी घोडदौड सुरू ठेवली असे ही सांगितले.
आमचे स्नेही श्री.कापसे साहेब आणि श्री.अतुलशेट सांकला यांनी ही संपुर्ण गढी आणि शिवमंदीर मला फिरून दाखवले. त्यांचा अपरिमित उत्साह आणि इतिहासाप्रती असलेली काळजी त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक मला जाणवली.
या गढीस अचानक भेट देण्याचा योग आल्याने इतिहासाच्या पानामधून डोकावणारा काही अंश प्रत्यक्ष नजरेतून अनुभवता आला याचे समाधान आहे. इतिहास अभ्यासक निलेश गावडे यांच्याशी देखील यावेळी सखोल चर्चा केल्याने गढी पहायला अधिक सुस्पष्टता आली हे अधोरेखित करावेसे वाटते. एक दिवस इतिहासाची उजळणी करण्यात मोलाचा आनंद देऊन गेला हे ही नसे थोडके....!
आपला
श्री. संतोष घुले
पिंपरी चिंचवड शहर ,पुणे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...