विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 March 2021

नगरचा भुईकोट किल्ला म्हणजे "कोट बाग निजाम" अहमदनगर ची ओळख.

 













नगरचा भुईकोट किल्ला म्हणजे "कोट बाग निजाम" अहमदनगर ची ओळख.
१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला अभेद्य ,अजिंक्य असा किल्ला आहे. 1 मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, त्यात पाणी आणि त्यात मगरी आणि सुसरी. खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या आहेत. ह्या सगळ्यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी केलेली आहे. टेकड्यांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य असल्याने किल्ला सुस्थितीत आहे. वर्तुळाकार असलेल्या या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान-सेनापतींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. त्या बुरुजांची पण रचना अशी आहे की तोफगोळा चुकून पोहचला तरी बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला गोळा पडेल बुरुजाच्या मुख्य बांधकामाला धक्का लागणार नाही. तटबंदीच्या आतील बाजूस एकेकाळी सहा राजमहाल आणि 4 बारव होत्या.
इथे दरवाज्याजवळ हत्तीच्यावरती वाघ असे कोरलेले शिल्प खूप छान आहे. "तुम्ही कितीही ताकदवान असले तरी आम्ही राजे आहोत. आम्ही राज्य करणार." असा काहीसा संदेश या शिल्पातुन देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे काल कोठरी आणि तुरुंग आहेत. तिथे असणारे गज अजूनही शाबूत आहेत. त्यांना अजूनही गंज लागलेला नाही, ह्यावरून त्याकाळी धातू शास्र किती समृद्ध होते ह्याची कल्पना आपण करू शकतो.
पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह बारा मोठे राजकीय नेते बत्तीस महिन्यांसाठी या किल्ल्याच्या बंदिवासात होते. पंडित नेहरूंनी इथेच "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" या ग्रंथाचे लेखन केले आणि मौलाना आझाद यांनी "गुब्बारे खातीर" ह्या उर्दूतील अतिशय श्रेष्ठ कलाकृतीचे लिखाणही ह्याच किल्ल्यात केले. युवराज्ञी येसूबाई आणि त्यांचे युवराजांना औरंगजेबाने याच किल्ल्यात बंदी बनवून ठेवले होते. औरंगजेब जेव्हा नगरला मुक्कामी होता तेव्हा किल्ल्याचा दरवाजा पाहून त्याने "आमच्या पूर्वजांना नगरचा किल्ला माहीत नसावा नाहीतर आगऱ्याच्या किल्ल्याचे दार असे समोर नसते ठेवले." असे उद्गार काढले होते. इतके नगरच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण जागी आहे .
या किल्ल्यावर फडकणार्या ध्वजाचा एक इतिहास आहे. ह्याची size अगदी लाल किल्ल्याच्या खालोखाल आहे. त्यामागचा इतिहास असा की इथल्या बुरुजावर इंग्रजांनी लोखंडी युनियन जॅक लावला होता कारण त्यांना खात्री होती की तो उतरवायची वेळ कधीच येणार नाही. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर तिरंग्याची size त्या युनियन जॅकपेक्षा लहान असूच शकत नाही म्हणून तेव्हा पासून इथला ध्वज हा भारतातील सर्वात मोठ्या ध्वजांपैकी एक आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या ह्या किल्ल्याचे महत्त्व असे की लढाई मध्ये तो एकदाही जिंकता आला नाहीये. फंदफितुरी करूनच किल्ला मिळवावा लागला आहे. स्वराज्यामध्येही हा किल्ला कधीच येऊ शकला नाही. पेशव्यांच्या काळात जेव्हा हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला तेव्हासुद्धा फंदफितुरीनेच मिळवला होता.
सुरुवातीपासूनच मोठी कुमक किल्ल्यात होती, त्यानंतर इंग्रजांचे हे सैन्यतळ होते आणि त्यानंतर भारतीय लष्कराच्या ताब्यात राहिल्यामुळे हा किल्ला बर्यापैकी सुस्थितीत आहे. कोणी बांधला यापेक्षा तो एक ऐतिहासिक वारसा आहे म्हणून त्याची एकदा नक्कीच सफर करायला हवी.
दिपाली विजय

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...