सासवडपासून साधारण ५ किमी असणाऱ्या सोनोरी गावातील मराठा साम्राज्याचे तोफखानाप्रमुख, सोनोरी आणि आसपासच्या प्रदेशाचे जहागीरदार, सरदार भिवराव पानसे यांचे निवासस्थान व कार्यालय असणारा भव्य वाडा.
वाड्याकडे येताना बरीच मंदिरे पाहायला मिळतात. पुढे भव्य दगडी कमान आपले स्वागत करते.
वाडयाचे मुख्य सागवानी दरवाजातून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण पाहायला मिळते.
पूर्वीच्या काली ३ मजले असणाऱ्या या उत्तुंग वास्तूचे सध्या एकच मजली बांधकाम शिल्लक असून पानसे कुटुंबाची आजची पिढी येथे राहत आहे.
आतमध्ये एक मोठा सभामंडप आहे. सभामंडपाचे काम सागवानी लाकडाचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. समोरील बाजूला देवघर पाहायला मिळते. याच देवघरात गोकुळाष्टमीचा उत्सव पूर्वीपासून चालत आलेला असून आजही उत्साहात साजरा होतो. या १० दिवसात येथे श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली जाते आणि दूरदूरहून समस्त पानसे कुटुंब या उत्सवासाठी एकत्र येते. सागवानी बांधकाम वाड्याचे वैभव दाखवतो. मोजक्या ठिकाणी असणारे लाकडी नक्षीकाम आजही पाहायला मिळते. मातीपासून बनवलेल्या या भेंड्याच्या भिंतींना मजबुती मिळण्यासाठी त्यात चुना, दोऱ्या, मानवी केसाबरोबर, लाकडाचा, ज्वारीचा किंवा गव्हाचा भुसा कालवलेला दिसून येतो. छताची केलेली डागडुजी दिसून येते.
कालौघात ३०० वर्षांपूर्वीचा हा वाडा नष्ट होत चालला आहे. आता फक्त वाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या, काही ठिकाणी कोसळलेल्या भिंती व सुरक्षिततेसाठी असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. वाड्याच्या प्रेमापोटी आजही पानसे कुटुंबीय तेथे राहत आहेत.
टीप:- देखभाल नसल्यामुळे गवत झाडांचे जंगल वाढले आहे. यामुळे वास्तु पाहण्यास अडचन होते
:- शंकर हवलदार
No comments:
Post a Comment