विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 March 2021

राणोजी घोरपडे

 

छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या युद्धनीती, वेगवान हालचाली तसेच पराक्रमाच्या जोरावर मोगल सैन्याला जेरीस आणले होते हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. सेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू हि मराठा इतिहासातील अतिशय दुर्देवी घटना आहे. संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र

राणोजी घोरपडे यांनी देखील मोठा पराक्रम गाजवला होता, राणोजी घोरपडे यांच्या हालचाली देखील संताजी घोरपडे यांच्याप्रमाणेच अतिशय वेगवान होत्या हे इतिहासातील अनेक नोंदीवरून दिसून येते. इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या राणोजी घोरपडे यांच्या पराक्रमाचा आपण मोगल दरबाराची बातमीपत्रे अर्थात अखबरात या साधनातून थोडक्यात आढावा घेऊ..
११ मे १७०१ – लक्ष्मेश्वरजवळ राणोजी घोरपडे व शहाजादा बेदार बख्त यांचे प्रखर युद्ध.
२५ नोव्हेंबर १७०१ – संताजीचा मुलगा राणोजी घोरपडे आंब्याचे ठाणे उध्वस्त करतो आणि मिरजेकडे जातो.
७ डिसेंबर १७०१ – राणोजी घोरपडे याचा हल्ला. मलकापूर येथे मोगल सैन्याच्या पिछाडीवर राणोजी घोरपडे याचा जबरदस्त हल्ला.
२३ डिसेंबर १७०१ बातमी, राणोजी हा कऱ्हाड भागात धामधूम करीत आहे. धान्याची रसद त्याने घेतली आहे.
२४ डिसेंबरची १७०१ बातमी- राणोजी घोरपडे हा औरंगजेबाच्या छावणीपासून चार कोसावर मलकापूरच्या दिशेने चालून आला. मलकापूरचा ठाणेदार जमशीदखान विजापुरी याच्यावर हल्ला. प्रखर युद्ध. जमशीदखानाच्या कुमकेला सवाई जयसिंग, अवधूतसिंग (उदितसिंग) मुहंमद अमीनखान.
२६ डिसेंबर १७०१ बातमी
काल रात्रीची बातमी – राणोजी घोरपडे याने बादशाहीच्या छावणीपासून एक कोसावर वंजाऱ्याचे बैल लुटून नेले.
३१ डिसेंबर १७०१ ची बातमी - कऱ्हाडचा ठाणेदार यासीनखान याजकडून ‘राणोजी याने दहा हजार सैन्यासहित चाल करून येऊन बादशहापूर जाळून फस्त केले. यानंतर त्याने दोन किल्ल्यांमधील गढीला वेढा घातला. तेथील किल्लेदार (साताऱ्याचा) समसाल हा तोफांचा मारा करीत आहे.
मुहंमद अमीनखानाची रवानगी. १७०१ च्या शेवटच्या दोन चार महिन्यात राणोजी घोरपड्याच्या पराक्रमाने मोगल हादरुन गेले.
१ जानेवारी १७०२ - साताऱ्याचा फौजदार यासीनखान व राणोजी यांचे साताऱ्याजवळ युद्ध, राणोजी वाईकडे
२६ जानेवारी १७०२- राणोजी घोरपडे पराडा (बार्शीजवळ) भागात. फीरोजजंगाचा सरदार नाहरखान याच्याशी युद्ध.
१५ फेब्रुवारी १७०२ – मोगल सेनापती फतेहुल्लाखान जबर जखमी. राणोजी घोरपडे विजापूर प्रांतात. मुजाहिदखानाबरोबर युद्धे. विशाळगड किल्ल्यासमोर मराठ्यांचा ख्वाजाखानाच्या मोर्च्यावर हल्ला. निकराची लढाई. संगमनेर प्रांतात नेमाजी शिंदे. संगमनेरचा ठाणेदार मुबारिजखान याच्या बरोबर युद्ध. राणोजी घोरपडे, घारुर (मराठवाडा) प्रांतात. रुहूल्लापूर लुटून फस्त.
२१ मार्च १७०२ ची बातमी - संताजीचा मुलगा राणोजी घोरपडे याने वाकिणरवेडा तालुक्यातील (बेडरांचा प्रदेश, भीमा काठ, सुरपूर तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक), चंदनगढीला वेढा घातला होता. तो स्वार होऊन निघाला. बेडरांशी त्याचे युद्ध झाले. त्यात त्याला बंदुकीची गोळी लागली. तो मरण पावला. राणोजीच्या मृत्यूने मराठ्यांची जबर हानी झाली. त्याने आपल्या बापाचे, संताजीचे नाव राखले..
संदर्भ -सेतुमाधवराव पगडी, मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड २
पोस्ट आभार :- राज जाधव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...