सातारा हे शहराचे नाव नसून किल्ल्यावरून त्याच्या नजीकच्या वसाहतीस पडलेले नाव आहे.
( किल्ल्याचा इतिहास आणि शहराचा इतिहास भिन्न आहे)
( इथे सातारचा किल्ला असे जाणीवपूर्वक म्हंटले आहे).
पन्हाळगडावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजा पैकी दुसरा भोज याने 15 किल्ले बांधले त्यात सातारा किल्ल्याची नोंद मिळते. हे पंधरा किल्ले कोणते हे निश्चितपणे सांगता येत नाही. चंदन-वंदन, पांडवगड, वैराटगड त्यापैकी होत. सातारा हे शहराचे नाव नसून किल्ल्यावरून त्याच्या नजीकच्या वसाहतीस पडलेले नाव आहे. सातारा किल्ल्यास मंगळाई, सप्तर्शी, सतारे, उका बैन, शहागड व अजिम तारा अशी नावे आहेत. त्यापैकी पहिली तीन नावे प्रचलित असून उका बैंन नाव बहामनी राज्यातील व त्यानंतरच्या आदिलशहातील आहे. इसमतआरा अहमदनगरचा बादशाह हुसेन निजामशहा यांची मुलगी व विजापूरचा बादशाह आली आदिलशहा यांची राणी चांदबीबी हिला तिचा वजीर किशवर खान याने इसवी सन १५८२ साली सातारा किल्ल्यात कैद करून ठेवले होते त्या वेळी मिळाले. अजिमतारा नाव इसवी सन १७०० मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला त्यावेळी त्याचा मुलगा अजीमशहा याच्यावरून नाव दिले होते.
या किल्ल्याचे नाव सप्तर्षी असण्यामागे अशी धारणा आहे की फार प्राचीन काळी आर्यवतात अनेक ऋषी होऊन गेले अशा ऋषी पैकी कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ या ऋषींची नोंद होते. आकाशात दिसणाऱ्या या सात ताऱ्यांच्या पुंजक्यास त्याचे सप्तर्षी नाव देण्यात आले आहे. याच ऋषींच्या सप्तर्षी देवालयावरून सप्तर्षी हे नाव पडले असावे. सातारा किल्ल्याचे सतारे नाव शाहूकालीन पत्रे व्यवहारा पर्यंत सापडते. किल्ल्यावर देवीचे मंदिर असून तीच गड देवता आहे. शीलाहार राजे आपल्या नावासह "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद" ही पदवी जोडीत. त्यावरून ते देवीचे उपासक होते. शिलाहार राजा दुसरा भोज याने या वेळी हा किल्ला बांधला त्या वेळी मंगळाईदेवीची स्थापना केली असावी. सातारा किल्ल्यावर दूधबावी, सागरी सुलतानपीर, मंगळाई, शिवसागर, सप्तर्शी, कोटी व भवानी नामक सात तळी आहेत त्यांचाही साताऱ्याच्या व्युत्पत्तीशी संबंध असू शकतो. साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख चौथा बहामनी राजा मोहम्मद शहा (इसवी सन १३५८ ते १३७५) च्या काळात येत असून त्याने इतर किल्ल्या बरोबरच बहुदा हा किल्ला पुन्हा बांधला किंवा दुरुस्त केला असावा. नंतरच्या काळात या किल्ल्यावर अनेक घटना घडल्या त्या सर्वांची माहिती देणे शक्य नसले तरी काही महत्त्वाच्या घटनांची माहिती खाली दिली आहे इसवीसन १५७९ मध्ये बिजापूर सरदार किषावर खानाने विजापूरची राणी चांदबीबी वर आरोप ठेवून तिला सातारा किल्ल्यावर कैद करून ठेवले, परंतू त्याच वर्षी कीशवर खान चा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. १५९२ मध्ये विजापूर सरकारचा एक वकील दिलावरखान यास सातारा किल्ल्यावर बंदी म्हणून पाठवण्यात आले होते. काही कालावधीतच तो तिथे मरण पावला. विजापूरच्या ताब्यात असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी 27 जुलै 1673 रोजी आपल्या ताब्यात घेतला. कर्नाटक मोहिमेच्या आधी शिवाजी महाराज डिसेंबर 1675 , जानेवारी 1675 ते आजारी पडले असताना त्यांचा मुक्काम सातारा किल्ल्यावर होता.
तेथूनच त्यांनी देशसेवा, अनुष्ठाने व दानधर्म केला.
या किल्ल्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान राजाराम महाराजांनी दिला त्यांनी जून 1698 मध्ये विशालगडा हून आपली राजधानी येथे आणली. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्लाही मुगल साम्राज्य जोडला. दिनांक 8 डिसेंबर 16 99 ते 21 एप्रिल 1700 या काळात औरंगजेबाने किल्ल्यास वेढा देऊन तो काबीज केला. हा किल्ला घेतेवेळी औरंगजेबाने विजापूर किल्ल्यातील लुंड कसाब या बुरुजावरील मुल्क शब्त नामक तोप आणून वापरली.
रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी औरंगजेबाने हा किल्ला घेतला त्याबाबत मनोरंजक इतिहास सांगितला आहे तो खालील प्रमाणे,
सातारा हस्तगत करण्याची जबाबदारी रुस्तम खानवर सोपवली होती. खान साताऱ्याकडे येवून लागला तेव्हा रामचंद्रपंत, शंकररावजी नारायण, संताजी आणि धनाजी असे चौघे त्यांच्यावर चालून गेले. खानाने आघाडीवर असलेला आपला मुलगा घलीब खान यास पाठवले. तो तावातावाने मराठ्यांच्या अंगावर तुटून पडला. मराठ्यांनी आपल्या लहान बंदुकीच्या माऱ्याने त्यास हैरान केले. घलीब खानाच्या फौजेत हत्ती होते ते आपलेच लोक तुडवत पळत सुटले हे पाहून स्वतः रुस्तम खान मराठ्यांवर चालून गेला. त्यावेळी संताजी व धनाजी घाबरल्यासारखे दाखवून पळवून लावले त्यांच्या मागोमाग खान आला तेव्हा दोघांनी परत फिरून गोळ्यांचा जोरदार वर्षाव सुरु केला त्यामुळे खाण्याच्या सैन्य गोंधळून त्याच्या पंधराशे सैनिकांचे मुडदे पाडले. रुस्तम खान स्वतःची जखमी होऊन हत्तीवरून खाली पडला तेव्हा त्यास बाबाजी मोरेने पकडले त्याची आई व त्या सर्वांना सातारा किल्ल्यावर ठेवले. पुढे एक लाख रुपये देण्याचे कबूल करून खानाने स्वतःची सुटका करून घेतली. दंडाची रक्कम पूर्ण देईपर्यंत रुस्तम खान ची आई व बायको मराठ्यांकडे ओलीस राहिली. रुस्तम खानाची फजिती ऐकून औरंगजेबाने फिरोजजंग ला सोडवून आणण्यासाठी पाठवले सोबत सिद्धी अब्दुल कादिर या सरदारास दिले. रुपजी भोसले याने या सिद्धी अब्दुल कादिरास जखमी केले. म्हणून सातारा प्रांत कब्जात आणण्यासाठी औरंगजेबाने फुल्फुल्लाखानास मोठी फौज देऊन रवाना केले परंतु संताजी, धनाजी,डफळे,मोरे वगैरे सरदारांनी त्यांचा पराभव केला. सातारा किल्ल्याभोवती औरंगजेबाचा वेडा होताच या वेड्या च्या कालावधीत सातारा किल्ला मराठ्यांचा हवलदार प्रयागजी आनंताने लढवला. आतील बंदोबस्त चांगला नव्हता. धान्य व सामग्री फार दिवस पुरण्याजोगी नव्हती. औरंगजेबाच्या छावणीत उत्तरेस करंजे गावाजवळ व मुघल सरदार अझमशाह पश्चिमेस होता. त्याच्यापुढे शहापूर हे नाव पडले दुसया दोन बाजूस तरबियतखान, सर्जाखान हे मोर्चे लावुन बसले होते. याप्रमाणे मोठ्या बंदोबस्ताने किल्ल्याची नाकेबंदी करण्यात आली सुभानजी भांडवल कर व त्याच्या हाताखालील प्रयागजी प्रभू(प्रयागजी अनंत ) नावाचा हवालदार किल्ल्यावर होता. हा प्रयागजी शिवाजी महाराजांचे वेळेपासून नावाजलेला असून प्रसंगी किल्ल्याचे संरक्षणाचे काम तो चतुराईने चालवले. किल्ल्यावरून खाली शत्रूच्या अंगावर मोठमोठे दगड व गोळ्यांचा वर्षाव करून त्याने मुघल सैन्यात जेरीस आणले. धनाजी जाधव, हनुमंतराव निंबाळकर, रानोजी घोरपडे इत्यादी सरदारांनीही मुलांना जेरीस आणले होते. ते बादशहाच्या छावणीत धान्य पुरवठा होऊ देत नसत. दिनांक 27 डिसेंबर 1699 रोजी हणमंतराव निंबाळकर याने साताऱ्याचे बाहेर 5.5 किमी इकलासखान व त्याच्या पुत्रास एकाच वेळी ठार मारले. त्यानंतर लगेच 10 जानेवारीला रहिमतपुर जवळ मराठी सरदार व जुल्फिकारखान यांच्या रणसंग्राम होऊन उभय पक्षांचे असंख्य लोक मारले गेले. अशा रीतीने सातारा किल्ल्याचे सभोवतालच्या 20 कोस पर्यंत म्हणजेच 65 किमी पर्यंतचा सर्व प्रदेश मराठ्यांनी जाळून उध्वस्त केला. त्यातूनही जी सामग्री मोगल छावणीत जाईल ती मराठी सरदार केव्हाच लुटून नाहीशी करत. परशुराम त्र्यंबक परळीचे किल्ल्यावरून सातारचे किल्ल्यावरील लोकांस बाहेरून धान्याचा थोडाबहुत पुरवठा करत असे. तीन-चार महिने गेले औरंगजेब विचार पडला की तबीयत खानाने ईशान्येच्या मंगळाचे बुरुजाखाली दोन मोठे तुरुंग तयार केले ही बातमी किल्ल्यातील लोकांना माहीत नव्हती. सुरुंग उडतात कसे ते पाहण्यासाठी औरंगजेबाची स्वारी मोठ्या थाटाने बाहेर पडली आणि औरंगजेब बादशाह यास पाहण्यासाठी किल्ल्यावरील लोक बुरुजावर एका ठिकाणी जमले गेल्यावर भयंकर कल्लोळ होऊन बुरुजावरील डोंगराचा कडा एकदम आकाशात उडवून बुरूजावर पडला व मराठ्यांची शेकडो लोक प्राणास मुकले ते पाहून मोगल फौज किल्ल्यात जाण्यासाठी जोराने पुढे घुसली पुढे दुसरा सुरुंग पहिल्या भागाप्रमाणेच उडेल असा त्यांचा कयास होता परंतु मोगल फौज नजीक येताच दुसरा सुरुंग महा वेगाने उडाला पण त्याचा कल्लोळ (दगड माती) किल्ल्यात व बुरुजावर पडण्याऐवजी किल्ल्यावर कूच करणाऱ्या मुघल सैन्यावर येउन पडला व त्यात दोन हजार मुघल सैनिक मारले गेले. औरंगजेब दुःखी झाला. किल्ल्याचा हवालदार प्रयागजी प्रभू हा पहिल्या बुरुजतील दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता परंतु काही इजा न होता नशिबाने वाचला. बाजी बिन सटवाजी डफळे औरंगजेबाचे नोकरीस होता त्याने पुढे होऊन मुघलांना किल्ल्यात घुसण्याचा उद्युक्त केले तरी मोगल सैन्याचे धैर्य खचून गेले होते तेव्हा बादशाहने स्वतः सर्व फौजेच्या पुढे येऊन धीर दिला पुन्हा लढण्यास प्रवृत्त केले त्यानंतर मात्र मराठ्यांचा टीकाव फार दिवस लागणे शक्य नव्हते. तशातच राजाराम महाराज मृत्यू पावले. लढवणारा हवलदार अगदी जेरीस आला किल्ल्याचा एक तट पडून त्याचे अनेक लोक मेले. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने परशुराम त्र्यंबक ने आपण होऊन किल्ला स्वाधीन करतो असे मुगल सरदार मार्फत औरंगजेबास कळवले. औरंगाजेबाने किल्ल्याचे नाव अझमतारा ठेवले.
सन 1706 मध्ये किल्ला मराठा प्रतिनिधी परशुराम त्र्यंबकने पुन्हा काबीज केला. राजारामाच्या मृत्यू नंतर शाहू व ताराबाई यांच्यात संघर्ष निर्माण झाला. सातारा गादीवर ताराबाईची हुकुमत असताना संभाजी पुत्र शाहू मोगलांच्या कैदेतून 8 मे 1707 रोजी सुटका झाली. तो ऑक्टोबर १७०७ मध्ये शिरवळ वरून सातारा जवळील चंदन-वंदन किल्ल्यात दाखल झाला. त्याने सातारा हवाली करण्याची पत्रे प्रतिनिधीना पाठवली. शाहूचा जम बसलेला पाहून सातारा लढण्याची कामगिरी प्रतिनिधी वर सोपवून ताराबाई मुलांसोबत पन्हाळ्याकडे निघून गेली त्यामुळे शाहुचे काम सुलभ झाले. किल्ल्याचा हवलदार वाई जवळील शेख मीरा होता तो निकराने लडू लागला. किल्ला त्याच्या स्वाधीन करण्याचा हुकूम केला तो शेखमिरा याने मोडल्याने शाहूने वाईहून त्याच्या मुलांना पकडून आणून तोफेने उडवण्याची धमकी दिली तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीस किल्ला शाहूचे स्वाधीन करण्याचा सल्ला दिला. प्रतिनिधीने न मानल्यामुळे शेख मीराने पकडून किल्ला स्वाधीन केला अशाप्रकारे राजधानी सातारा कब्जात घेऊन शाहू मराठा साम्राज्याचा अधिपती बांधला व लगेच सोमवारचा मुहूर्त पाहून सोमवार दिनांक 12 जानेवारी 1708 रोजी त्यांनी आपला राज्याभिषेक समारंभ उरकला. आणि सातारा ही मराठ्यांची राजधानी झाली त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी किल्ल्याखाली अनेक वस्त्या वसवल्या त्यास किल्ल्याच्या नावावरून सातारा हे नाव रूढ झाले.सातारा किल्ल्याचे नाव अजिंक्यतारा कधी झाले? कसे झाले? याचे इतिहासात दाखले मिळत नाहीत.
साभार संकेत बाबर किकलिकर
No comments:
Post a Comment