छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ज्या 27 लढायांमध्ये भाग घेतला त्यापैकी ही एक लढाई. शक्तीपेक्षा चातुर्याने युद्ध करून स्वतःची कमीतकमी हानी होऊ देत, महाराजांनी ज्या प्रकारे हे युध्द जिंकलं, तो इतिहास ऐकताना खरोखर रोमांच उभे राहतात. या युद्धाच्या वर्णनात एक नाव वारंवार कानावर पडत होते… पंडिता रायबाघन.
माहूरचे जहागिरदार उदाजीराम देशमुख यांची पत्नी , सावित्रीबाई देशमुख. पती आणि पुत्र औरंगजेबाचे मांडलिक. औरंगजेबाच्या दरबारात त्यांना फार मान होता. बहुतेक कामगिऱ्या आलमगीर त्यांना सोपवत असे. त्यामुळे देशमुख बहुतांश काळ बाहेरच असत. अशाच एका मोहिमेत उदाजीराम कामी आले. पुत्राने काही काळ जहागिरी सांभाळली पण तोही अशा एका मोहिमेत गेला. सावित्रीबाई एकट्या पडल्या आणि निराश झाल्या. हळूहळू जहागिरीची कामे सांभाळू लागल्या. मूळ स्वभाव अतिशय धाडशी आणि शूर. एकटीने वाघ मारला होता. या शूर स्वभावामुळे औरंगजेब त्यांना मोहिमेवर पाठवू लागला. बाई रणांगणात उतरली. भल्याभल्यांना चकित करू लागली. औरंगजेबाचा बागी हरचंदरायला युद्धात हरवून त्याचा कडेलोट केला. ह्या वार्ता आलमगीरच्या कानावर गेल्या. औरंगजेबाच्या वाढदिवसाला बाईंनी दरबारात नजराणा पेश केला. स्वतः औरंगजेब अत्यंत स्त्रीद्वेष्टा, पण त्याने सावित्रीबाईंचे, त्यांच्या शौर्याचे भर दरबारात भरभरून कौतुक केले आणि त्यांना किताब दिला,’ पंडिता रायबाघन.’ म्हणजे royal वाघीण म्हणजे शाही वाघीण.
पुढचीच कामगिरी रायबाघनना सोपवली ती म्हणजे दक्षिणेतील शिवाजीराजे भोसले यांचा बीमोड करण्याची. स्वतः रायबाघन या मोहिमेस अत्यंत नाखूष होत्या. कारण शिवाजी महाराजांची चांगली कीर्ती त्या ऐकून होत्या. पण निष्ठा बादशहाच्या चरणी असल्याने त्या हिंदवी स्वराज्याच्या कार्यात सहभागी होऊ शकत नव्हत्या. नाईलाजाने त्या युद्धास तयार झाल्या.
उझबेकिस्तानातून एक सरदार आला होता कारतलबखान. त्याच्यावर या मोहिमेची मुख्य जबाबदारी सोपवली गेली. लोणावळ्यातून खाली उतरल्यानंतर एक गाव आहे चावणी. या गावाजवळच आहे उंबरखिंड. लढाईला या गावात तोंड फुटले. अवघ्या एक हजार मावळ्यांच्या साथीने महाराजांनी खानाची तीस हजाराची फौज जेरीस आणली. खानाची पळता भुई थोडी झाली. त्याला खिंडीतून रस्ताच सापडेना. अखेर रायबाघनने खानाला सल्ला दिला की आता रस्ता फक्त शरण वा मरण. खान हो ना करता तयार झाला. रायबाघन पुरुषाचा वेष धारण करून महाराजांसमोर गेली, खानाची वकील म्हणून. तरीही महाराजांनी तिला ओळखले. तिलाच तिची इत्यंभूत माहिती सांगून चकित केलं. रायबाघन शरण होती. महाराजांनी तिचा साडी चोळी आणि भेटवस्तू देऊन प्रत्यक्ष आपल्या मातेप्रमाणे वागणूक दिली आणि सत्कार केला. तिला स्वराज्यात येण्याचे निमंत्रणही दिले. रायबाघनने नम्रपणे नकार दिला. ती स्वाभिमानाने पराभव स्वीकारून निघून गेली. माहूरला परतल्यावर रायबाघनची तब्येत बिघडली. उंबरखिंडची मोहीम तिची अखेरची ठरली. तिने लवकरच जगाचा निरोप घेतला.
ही होती पंडिता रायबाघनची कहाणी.
No comments:
Post a Comment