विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

सरदार पुरंदरे वाडा, सासवड

 


सरदार पुरंदरे वाडा, सासवड
------------------------------------------------------------
सासवडात सरदार पुरंदरे घराण्याचे एकाला लागून एक असे दोन वाडे आहेत, पैकी मुख्य पुरातन वाड्याचा फक्त कोट आणि हा दरवाजाच आज शिल्लक असून दुसरा वाडा यालाच लागून मध्ये एक लहानसा बोळ सोडून आहे.
मुख्य वाड्यात आत्ता सध्या केवळ जोती असली तरी पुरंदरे घराण्याचे सासवडातील मूळ येथेच सापडते. वाडा केव्हा बांधला ते मात्र सांगणे अवघड आहे, कारण प्रत्यक्ष तसे उल्लेख मिळत नाहीत. पण छत्रपतींच्या काळापासून पुरंदरे घराणे हे सासवड आणि पुणे येथे कार्यरत आहे. शिवाजी महाराजांनी महाद्भट पुरंदरेंना दिलेल्या पर्वतीच्या जमिनीची वतनपत्रे आजही उपलब्ध आहेत.
१६९२-९३ मध्ये राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात असताना धनाजी जाधवरावांच्या फौजेतील तुकदेव त्र्यंबक पुरंदरे यांनी मोठे साहस केल्याने सुप्याला त्यांना जमिनी देण्यात आल्या. पुढे १७०३ मध्ये सिंहगडला वेढा पडला तेव्हा धनाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ सरसुभेदार यांनी अंबाजीपंतांना लिहीलेल्या पत्रात "मर्हाठा आज कुल रक्षिता तरच तुमचे राहणे या मुलकात होऊन सर्वही आनुकूल होते" असं म्हटलं आहे. यावेळेपर्यंत अंबाजीपंत ही सातारा दरबारातील मातबर असामी बनली होती. यामूळे हा पहिला मुख्य वाडा याच सुमारास मध्यंतरी उभारला असला पाहिजे.
सासवडचे कुलकर्ण्य आणि देशकुलकर्ण्य याबद्दल अत्रे-पुरंदरे घराण्यात वाद होते. पण हा वाडा त्यापुर्वीचा असावा एवढे नक्की.. पुरंदरे घराण्यातील तुकदेव त्रिंबक आणि अंबाजी त्रिंबक या बंधूंपासून पुडहचे सारे सासवडचे मोठे वतनदार आणि तालेवार सरदार दिसतात त्यावरून संभाजीराजांच्या काळात अथवआ राजाराम महाराजांच्या काळात हा वाडा उभारला असावा. दुसरा वाडा हा पेशवाईतील नंतरच्या काळातील असून या मूळ वाड्यातच खुद्द बाळाजी विश्वनाथ कोकणातून घाटावर आले तेव्हा त्यांचे वास्तव्य होते.
मल्हार तुकदेव हा अंबाजीपंतांचा पुतण्या, तुको त्रिंबकांचा मुलगा हा शाहू महाराजांना प्रथम मिळालेला सरदार होता. यामूळे धनाजी जाधवरावसुद्धा सहज शाहूराजांच्या पक्षाला मिळाले.
- कौस्तुभ कस्तुरे
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...