विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

शिलाहार घराणे : एक मध्ययुगीन राजघराणे.

 




शिलाहार घराणे : एक मध्ययुगीन राजघराणे.
शिलाहारांची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. एक, उत्तर कोकणात ठाणे व कुलाबा ह्या जिल्ह्यांवर राज्य करीत होते. त्यात १,४०० गावांचा समावेश होता, अशी सांप्रदायिक समजूत होती. या घराण्याला उत्तर कोकणचे शिलाहार म्हणतात. त्यांची राजधानी पुरी (सध्याची कुलाबा जिल्ह्यातील राजपुरी किंवा दंडा राजपुरी) येथे होती. अरबी समुद्रावर या घराण्याचे वर्चस्व होते. त्यातील काहींनी ‘पश्चिम समुद्र चक्रवर्ती’ ही पदवी धारण केली होती.
शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात (याला सप्तकोकण म्हणत) राज्य करीत होते. त्यांची राजधानी बलिपत्तन (सध्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण) येथे होती.
शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव ह्या जिल्ह्यांचा काही भाग ह्या प्रदेशांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी वळिवाड येथे होती. हे कोल्हापूच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी. वर असलेले वळवडे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे आता राधानगरीत रूपांतर झाले आहे. काही जुन्या लेखांत कोल्हापूर आणि प्रणालक (पन्हाळा किल्ला) यांचाही राजधानी म्हणून उल्लेख येतो, तर काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेकडील वळिवडे हे विद्यमान खेडे त्यांच्या राजशिबिराचे स्थान असण्याची शक्यता आहे.
ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वतःचा देह एका शिलेवर बसून गरुडाला अर्पण केला होता म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.
उत्तर कोकण आणि कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणारे शिलाहार आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे करतात. तेव्हा ते मूळचे तगरनगराहून आले होते, हे उघड आहे. हे तगर मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर होय, हे आता निश्चित झाले आहे. ह्याचा उल्लेख महत्त्वाची बाजारपेठ म्हणून टॉलेमी याच्या ग्रंथात आणि पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या प्राचीन ग्रीक ग्रंथात येतो. शिलाहार कानडी-भाषी होते असे दिसते कारण त्यांच्या ताम्रपटात राजांनी धारण केलेली ‘मलगलण्ड’, ‘गण्डरगण्ड’, ‘विल्लविडेङ्ग’ यांसारखी कानडी बिरुदे आढळतात.
उत्तर कोकणच्या शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष पहिला कपर्दी (कार. सु. ८००–८२५) याने राष्ट्रकूट सम्राट तिसरा गोविंद याला उत्तर कोकणात राष्ट्रकुटांची सत्ता पसरविण्यास मदत केली असावी म्हणून गोविंदाने तो प्रदेश जिंकल्यावर येथे मांडलिक म्हणून कपर्दीची नेमणूक केली. उत्तर कोकणाला त्याच्या नावावरून ‘कपर्दिद्वीप’ किंवा ‘कवडीद्वीप’ म्हणत. हे घराणे उत्तर कोकणात सु. ८०० पासून १२६५ पर्यंत म्हणजे सु. साडेचारशे वर्षे राज्य करीत होते. तेथे यांच्या सोळा पिढ्या झाल्या.
कपर्दीनंतर तिसऱ्या पिढीतल्या वप्पुवन्न राजाच्या (कार. सु. ८८०–९१०) काळात राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याने ठाणे जिल्ह्याचा उत्तर भाग मधुमती (मुहम्मद) या मुसलमान सामंताच्या ताब्यात दिला. तेथे त्याच्या तीन पिढ्या राज्य करीत होत्या. त्यांची राजधानी संयान (डहाणू तालुक्यातील संजान) येथे होती. ही दोन्ही घराणी राष्ट्रकूट सम्राटांचीच मांडलिक होती पण त्यांच्यात वारंवार खटके उडत, असे दिसते. इ. स. ९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजिताने त्यांचा उच्छेद करून त्यांचा प्रदेश खालसा केला.
हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पतनानंतर अपराजिताने (कार. सु. ९७५–१०१०) उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा ‘पश्चिमसमुद्राधिपति’ आणि ‘मांडलिकत्रिनेत्र’ अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने माळव्याचा परमार नृपती सिंधुराज याच्या च्छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.
चालुक्यांना अपराजिताचे सामर्थ्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय ह्याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून त्याला त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. कर्नाटक कवी रन्न म्हणतो, ‘एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसऱ्या बाजूस समुद्र यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली’. नंतर शिलाहारांना चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले पण ते परमार भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. त्यानिमित्त त्याने इ. स. १०२० मध्ये दिलेले दोन ताम्रपट सापडले आहेत.
अपराजितानंतर त्याचे छित्तराज, नागार्जुन व मुम्मुणिराज असे तीन पुत्र एकामागून एक गादीवर आले. छित्तराजाच्या कारकिर्दीत कदंब नृपती षष्ठदेव याने कवडीद्वीप जिंकले. तसेच कोल्हापूरच्या गोंक राजानेही अपराजिताचा पराभव करून ‘कोंकणाधिपति’ अशी पदवी धारण केली. छित्तराजाने अंबरनाथ येथील शिवालय बांधण्यास प्रारंभ केला. ते मुम्मुणीने पूर्ण केले. तेथे त्याचा सन १०६० चा शिलालेख सापडला आहे.
मुम्मुणीच्या कारकिर्दीत शिलाहार आणि कदंब यांचा वैवाहिक संबंध जळून आला. मुम्मुणीने (कार. सु. १०४५–७०) कदंब द्वितीय षष्ठदेव याचे स्वागत करून त्याला आपली कन्या अर्पण केली. मुम्मुणीच्या नंतर गूहल्लाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यात त्याला कोणा एका मुसलमान अधिपतीचे साहाय्य झालेले दिसते. त्याने देश उद्ध्वस्त करून देवब्राह्मणांचा छळ केला पण पुढे नागार्जुनाचा मुलगा अनंतदेव याने यवन आक्रमकांना हाकून लावले.
अम्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील शिलाहारकालीन शिल्पे, अंबरनाथ, जि. ठाणे.
अम्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील शिलाहारकालीन शिल्पे, अंबरनाथ, जि. ठाणे.
अनंतदेव (सु. १०७०–१११०) ह्याच्या कारकिर्दीत अखेरीस कदंब दुसरा जयकेशी याने पुन्हा उत्तर कोकणावर स्वारी करून तेथील राजाला ठार केले आणि तो प्रदेश आपल्या राज्यात सामील केला. इ. स. ११२५–२६ च्या नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा ‘कवडीद्वीपाधिपति’ म्हणून उल्लेख आहे पण पहिल्या अपरादित्याने लवकरच आपल्या देशाला कदंबांच्या मगरमिठीतून सोडविले.
अपरादित्याने दूरच्या काश्मिरातही तेजःकंठ यास आपला वकील नेमले. तेथे त्याने याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरादित्याच्या अपरार्कानामक टीकेचा प्रचार केला.
यानंतरचा उल्लेखनीय शिलाहार नृपती मल्लिकार्जुन (कार. सु. ११५५–७०) हा होय. याच्या कारकिर्दीत गुजरातच्या चालुक्य कुमारपालाने कोकणावर स्वारी करून मल्लिकार्जुनाला ठार मारले आणि कोकण प्रदेश आपल्या राज्यास जोडला पण दुसऱ्या अपरादित्याने (कार. सु. ११७०–९५) तो परत मिळवून ‘महाराजाधिराज’ व ‘कोंकणचक्रवर्ती’ अशा स्वातंत्र्यनिदर्शक पदव्या धारण केल्या.
शेवटचा शिलाहार नृपती सोमेश्वर (कार. सु. १२५५–६५) यानेही याच पदव्या घेतल्या होत्या. त्याच्या काळी देवगिरीच्या यादवांची सत्ता वृद्धिंगत होत होती. त्यांना शिलाहारांच्या या पदव्या सहन होणे शक्य नव्हते. यादव सम्राट कृष्ण याने आपला सेनापती मल्ल यास कोकणावर स्वारी करण्यास पाठविले होते. त्याने विजय मिळविला असे म्हणतात पण यादवांचा फायदा झालेला दिसत नाही. नंतर कृष्णाचा भाऊ महादेव याने पुन्हा युद्धास सुरुवात करून गजसेनेसह कोंकणावर स्वारी केली. सोमेश्वराने जमिनीवर पराभव पावल्यावर समुद्राचा आश्रय घेतला पण तेथेही महादेवाने त्याचा पाठलाग करून त्याला जलसमाधी दिली. या प्रसंगाचे शिल्प बृहन्मुंबईत बोरिवली येथे सापडले आहे. हे युद्ध सु. १२६५ मध्ये झाले असावे. यानंतर यादवांनी आपला अधिकारी अच्युत यास कोंकणावर राज्यपाल म्हणून नेमले. त्याचा इ. स. १२७२ चा लेख मिळाला आहे.
शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात कार्यरत होते. आठव्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण जिंकून तेथे शिलाहारवंशी सणफुल्ल (कार. सु. ७६५–८५) याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. या घरण्याच्या अकरा पिढ्या या प्रदेशावर राज्य करीत होत्या. प्रथम त्यांची राजधानी चंद्रपूर (दक्षिण गोवे प्रांतातील चांदोर) येथे होती. सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने बहुधा चंद्रपुरावर शत्रूचे आक्रमण झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बलिपत्तन नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. यातील काही राजांनी उत्तर कोकणच्या शिलाहारांशी व गोव्यातील कदंबांशी युद्ध करून विजय मिळविले होते.
हे शिलाहार आपले सम्राट राष्ट्रकूट यांच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले पण उत्तरकालीन चालुक्य सत्याश्रय याच्या कारकिर्दीत या घराण्याचा शेवटचा ज्ञात पुरुष रट्टराज (कार. सु. ९९५–१०२४) याला चालुक्यांचे स्वामित्व मान्य करावे लागले. पुढे चालुक्यांची सत्ता दुर्बल होताच त्याने त्यांचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. नंतर गादीवर आलेल्या चालुक्य सम्राट जयसिंहाने या बंडखोर मांडलिकाचा उच्छेद करून त्याचे राज्य खालसा केले. दक्षिण कोकण जिंकल्यावर कोल्हापूर येथे तळ असताना जयसिंहाने दिलेला ताम्रपट १०२४ सालचा आहे. तेव्हा हे घराणे इ. स. सु. ७६५ ते १०२४ पर्यंत म्हणजे सु. अडीचशे वर्षे राज्य करीत होते.
शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांतील काही प्रदेशांवर राज्य करीत होते. काही जुन्या लेखांत कोल्हापूरचे ‘क्षुल्लकपुर’ असे नाव येते. या शाखेची इष्टदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी ही होती. तिचा वरप्रसाद आपणास प्राप्त झाला आहे, असे या शाखेचे राजे आपल्या ताम्रपटांत अभिमानाने सांगतात. हे घराणे राष्ट्रकुटांच्या पडत्या काळात उदयास आले म्हणून इतर शाखांप्रमाणे ते आपल्या आरंभीच्या ताम्रपटांत त्यांची वंशावळ देत नाहीत.
या शाखेचा मूळ पुरुष पहिला जगित हा इ. स. ९४० च्या सुमारास उदयास आला असावा पण तो व त्याचे दोन वंशज यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. या राजांपैकी काहींनी पांड्य राजांप्रमाणे आपल्या भावांस राजपदवीसह प्रांताधिपती केलेले दिसते. तेव्हा वंशवळीत त्यांची नावे आलेली असली, तरी ते एकाच काळी राज्य करीत होते.
सहावा विक्रमादित्य (कार. १०७६–११२६) याच्या काळात या घराण्याचा चालुक्य सम्राटांशी वैवाहिक संबंध जुळून आला. काश्मिरी राजकवी ⇨ बिल्हणाने विक्रमांकदेवचरितात विद्याधर (शिलाहार) राजकन्या चंद्रलेखा हिने करहाट (कऱ्हाड) येथे स्वयंवरात सहाव्या विक्रमादित्याला वरले असे वर्णन केले आहे. ते ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय नाही. सौंदर्याबद्दल तिची ख्याती दूरच्या काश्मीरपर्यंत पसरली होती. काश्मीरनृपती हर्ष याने कर्णाट राजा पर्मांडी (सहावा विक्रमादित्य) याच्या चंदला (चंद्रलेखा) राणीचे चित्र पाहिले, तेव्हा तो तिच्या सौंदर्याने वेडा झाला असे काश्मिरी कवी ⇨ कल्हणाने वर्णिले आहे. तिच्या पित्याचे नाव राजतरंगिणीत दिले नाही पण तो शिलाहार नृपती मारसिंह (कार. सु. १०५०–७५) असावा.
यानंतर या वंशातील उल्लेखनीय राजा गंडरादित्य (कार. सु. ११०५–४०) हा होता. विक्रमादित्याने त्याला ‘निःशंकमल्ल’ अशी पदवी दिली होती. याचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. त्याने इरुकुडी गावाजवळ गण्डसमुद्रनामक विशाल तलाव बांधून त्याच्या काठावर हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मांची देवळे बांधली होती. त्याचा पुत्र विजयादित्य (कार. सु. ११४०–७५) याने उत्तर कोकणचा राजा पहिला अपरादित्य याला त्याची गादी मिळवून देण्यास साहाय्य केले होते. विजयादित्याने कलचुरी बिज्जल यालाही चालुक्यांचा पराभव करून त्यांचे राज्य बळकाविण्यात मदत केली होती.
विजयादित्याचा पुत्र दुसरा भोज (कार. सु. ११७५–१२१२) हा या शाखेचा शेवटचा राजा होय. याला त्याच्या शौर्यामुळे ‘वीरभोज’ असे म्हणत. याने ‘राजाधिराज’, ‘परमेश्वर’, ‘पश्चिमचक्रवर्ती’ अशा सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. हे त्या काळी प्रबळ झालेल्या देवगिरीच्या यादवांना सहण होणे शक्य नव्हते. यादव नृपती ⇨ सिंघण (कार. १२१०–४६) याने त्याच्या राज्यावर स्वारी करून प्रणालक दुर्गाला (पन्हाळा किल्ल्याला) वेढा घातला आणि तो काबीज करून भोजाला त्याच किल्ल्यावर बंदीत टाकले. भोजाचा पराभव १२१२ च्या सुमारास झाला असावा. यानंतर यादवांच्या अधिकाऱ्यांचे लेख कोल्हापूर प्रदेशात मिळू लागतात. [→ भोज, दुसरा शिलाहार].
मिराशी, वा. वि.
सेविकांसह विष्णुप्रतिमा, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
सेविकांसह विष्णुप्रतिमा, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
इतर प्राचीन भारतीय राजांप्रमाणे शिलाहारांनी धर्म, विद्या व कला यांना आश्रय दिला होता. दक्षिण कोकणच्या रट्टराजाने मध्य भारतातून आलेल्या मत्तमयूर पंथाच्या शैव आचार्यास ग्रामदान दिले होते. इतर शाखेच्या राजांचाही हिंदू व जैन धर्मास आश्रय होता. त्यांनी अनेक देवळे बांधली होती. त्यांतील काही अंबरनाथ, पेल्हार, कोल्हापूर व वाळकेश्वर येथे अद्यापि विद्यमान आहेत. कोल्हापूरच्या शिलाहारांनी महालक्ष्मीच्या पूजेअर्चेकरिता काही दाने दिली होती. तसेच जैन तीर्थंकरांच्या बस्तीकरिताही आणि जैन मुनींच्या योगक्षेमाकरिताही काही भूमी दिली होती.
शिलाहारांचा विद्येसही आश्रय होता. शिलाहार नृपती पहिल्या अपरादित्याने याज्ञवल्क्यस्मृतीवर अपरार्का टीका लिहिली होती. तिचा दूरच्या काश्मिरातही प्रसार झाला. छित्तराजाच्या व त्याच्या भावांच्या आश्रयास असलेल्या सोड्ढलाने उदयसुन्दरीकथा लिहिली होती. तीत शिलाहारांच्या दरबारी असलेल्या जैन व इतर अनेक कवींची नावे उदा., चंदनाचार्य, विजयसिंहाचार्य, महाकीर्ती, इंद्र इ. आली आहेत. जैनेंद्र व्याकरणातील शब्दार्णवचन्द्रिका ग्रंथाचा कर्ता सोमदेव हा कोल्हापूरच्या भोजाच्या आश्रयास होता.
कोल्हापूरच्या शिलाहारांनी बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी खिद्रापूर (कोप्पेश्वर व ऋषभनाथ) आणि अंबरनाथ (शिव-अम्रेश्वर) येथील मंदिरे वास्तुशिल्पदृष्ट्या प्रसिद्ध आहेत. अंबरनाथ येथील शिवमंदिर हे तारकाकृती विधानाचे असून नागरशैलीतील भूमिज उपशैलीत बांधले आहे. गर्भगृह, अंतराल व सभागृह हे मंदिराचे तीन भाग असून शिखर पडले आहे. कीर्तिमुखे, गजरथ व नरथर हे अधिष्ठानात प्रतीकात्मक दर्शविले आहेत. सभामंडप व अंतराल यांची विताने (छत) समताल व करोटक पद्धतीची कलाकुसरयुक्त असून मधोमध कमळाकृती रचनाबंध आहे. बाहेरील भिंतीवर पूर्वेकडील कोनाड्यात उभी त्रिमूर्ती, उत्तरेकडे महाकाली, दक्षिणेकडे अष्टभुजानृत्या चंडिकादेवी या प्रमुख मूर्ती असून इतरत्र ब्रह्मा, तांडवनृत्यातील शिव, शिवपार्वती, गरुडारूढ विष्णू यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथील विलोभनीय शालभंजिका, यक्षी व सुरसुंदरी यांची संभ्रमविभ्रम अवस्थांतील शिल्पे रेखीव, प्रमाणबद्ध आणि कमनीय आहेत.
भिंतीवरील (पश्चिम बाजू) स्त्री-शिल्पे, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
भिंतीवरील (पश्चिम बाजू) स्त्री-शिल्पे, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
कोल्हापूरच्या आग्नेयीकडील खिद्रापूर गावात असलेले कोप्पेश्वर मंदिर बाराव्या शतकातील असून चालुक्य वास्तुशैलीत बांधले असून त्याचे विधान तारकाकृती आहे. शिखराचे बांधकाम अपुरेच आहे. याच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा ९५ हत्तींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर शिल्पपट्टांत व तीरशिल्पांत अनेक मूर्ती आढळतात. त्यांत शैवमूर्तींचे प्रमाण जास्त आहे. मूर्ती रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. अष्टदिक्पालांच्या दांपत्य-मूर्ती स्वर्गमंडपात आढळतात. मंदिराच्या भिंतीवरील विविध आकर्षक अवस्थांतील मदनिकांच्या रेखीव शिल्पांतून तत्कालीन केश-वेषभूषा आणि अलंकार यांचे मनोज्ञ दर्शन घडते. या मूर्तिसंभारात आलिंगन-चुंबनापासून संभोगापर्यंतची काही दृश्ये आहेत. त्यामुळे दक्षिणेचे ‘छोटे खजुराहो’ असा त्याचा उल्लेख करतात. दुसऱ्या ऋषभनाथ मंदिरातील श्रुतदेवता लक्षवेधक आहे.
संदर्भ : १. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.
२. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.
देशपांडे, सु. र.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...