वाकाटक घराणे :
पोस्टसांभार :मराठी विश्वकोश
महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.
प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.
पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता. दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत. नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली. विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंधनामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.
द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावलेआणि आपली सत्ता मध्यभारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.
वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजयनामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ च्या सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.
सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्याठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे. वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.
अजिंठ्याच्या क्रमांक सोळा, सतरा, व एकोणीस या गुहात स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने असून गुहा क्रमांकसोळा या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने आपल्या मातापित्यांच्या पुण्योपचयाकरिता खोदविले आणि शिल्पचित्रांनी सुशोभित करून ते बौद्ध भिक्षुंना दान केले, असा मजकूर आहे. या लेखात वत्सगुल्मच्या वाकाटकांची पूर्ण वंशावळ आली आहे. या लेण्यातील सर्व भित्तींवर गौतम बुद्धाच्या जन्मातील अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. त्यांतील काही कालौघात खराब झाली असली, तरी अनेक सुस्थितीत आहेत.
या लेण्यातील प्रलंबपाद आसनातील बुद्धाची भव्य मूर्ती, मकरवाहन, गंगेची मूर्ती, गंधर्व-अप्सरांची मिथुन शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण असून गौतम बुद्धाच्या चरित्रातील घटनांना अनुलक्षून क्रमाने ती काढली आहेत. चित्रांतील गौतमाची ज्ञानप्राप्ती, अवकाशगामी अप्सरा,नंदाचा धर्मप्रवेश इ. चित्रे लक्षणीय असून त्यांची स्तुती अनेक कलाकोविदांनी मुक्त कंठाने केली आहे. बुद्धाचा मावसभाऊ नंद याने भिक्षू होण्याचे ठरविल्यावर त्याचा सेवक त्याचा मुकुट घेऊन त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे येतो. तेव्हा सुंदरी हताश होऊन मरणोन्मुख होते. या ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र कला इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती आहे. याशिवाय येथे हस्तिजातक, महाउग्मगजातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्त्रियांच्या गळ्यांतील अलंकार, बोटांतील अंगठ्या, हातांतील बांगड्या आणि केशरचनेचे विविध प्रकार ह्यांतून तत्कालीन दागिन्यांचे नमुने आणि सौंदर्यप्रसाधनांची साधने दृग्गोचर होतात.
लेणे क्रमांक सतरा हे ॠषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. हे लेणे प्रामुख्याने बौद्ध भिक्षुंच्या निवासासाठी खोदलेला विहार असून हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यात मुख्यत्वे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या जातककथांतील सुंदर चित्रे आहेत. त्यात मानवी सद्गुणांच्या कथांवर अधिकतर भर दिला असून ओवरीच्या छतांवर पुष्पालंकाररचना चितारलेल्या आहेत. ओवरीच्या मागील बाजूस भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चित्रित केली आहे. या ठिकाणी विश्वंतर भिक्षा देत असून ती स्वीकारण्यासाठी अनेक याचकांनी गर्दी केली आहे, असे दाखवून चित्रकाराने त्याचे व त्याच्या पत्नीचे वनवासगमन, आकाशातून उडत येणारा इंद्र व त्याच्या अप्सरा यांची अत्यंत मनोवेधक चित्रे चितारलेली आहेत. पडवीच्या प्रवेशद्वाराजवळ छद्दंत जातककथेतील चित्रे असून त्यांत कोचावरील राणी, तिच्या दास-दासी, जवळचे प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती, व त्याच्या पाठीवरील लांडगा इ. चित्रे आहेत. या लेण्यात महाकपी, हंस, विश्वंतर, सुत्तसोम इ. जातककथांतील प्रसंग चित्रित केले आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्तीनंतरचे चित्र त्यांतील शांत, तेजस्वी भावांमुळे उठून दिसते, तर बुद्धाचे स्वागत करणारी पत्नीयशोधरा व मुलगा राहुल हे चित्र त्यांतील करूणरसांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
गुहा क्रमांक एकोणीस ही येथील चार चैत्यलेण्यांपैकी एक चैत्य असून तेथे प्रामुख्याने कोरीवकाम आढळते. या गंधकुटीतील स्तूपात दोन स्तंभांवरील कमानींत बुद्धाची उभी मूर्ती खोदली आहे. या चैत्यात दोन लहान मंदिरे असून उजव्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असेल, तरी त्यांची स्तंभशीर्षे चौकोनी आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनातील एक बुद्धाची मूर्ती आहे. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती खोदल्या असून भिंतींवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत. येथे अनेक मिथुन मूर्तीही आहेत. क्रमांक सतराप्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा व राहुल यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे भिक्षा मागणारा बुद्ध, नागराज, त्याची राणी इत्यादींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे. यातील सर्व कोरीवकाम दगडात आहे. तज्ञांच्या मते हे लेणे भारतातील बौद्ध कलेचा सर्वागपूर्ण असा अत्युत्कृष्ट आविष्कार आहे.
अजिंठ्याच्या पश्चिमेस सु. सोळा किमी. वर जंजाल गावाजवळ घटोत्कच या नावाने प्रसिद्ध असलेली तीन विहार-लेणी होती. त्यांपैकी दोन अवशिष्ट आहेत. हरिषेणाचा मंत्री वराहदेव याने ती खोदून घेतली, असे तेथील लेखात म्हटले आहे. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला एक खंडित लेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवातीपासूनची वंशावळ दिली आहे. मोठ्या लेण्याच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आहे. तीत उभ्या बुद्धमूर्ती, मिथुने कोरलेली असून छावणीच्या उंचीवर दोन्ही बाजूस एक-एक देवता आहे. आतील मंडपात चैत्य मंदिर आहे. अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ‘ये धर्मा हेतुप्रभवः’ असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही.
वरील लेण्यांव्यतिरिक्त वाकाटकांनी काही मंदिरे बांधली. त्यांपैकी रामटेक येथील श्रीरामचंद्राचे, प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे, अश्वत्थखेटकातील विष्णूचे आणि दुसऱ्या प्रवरसेनाने बांधलेले श्रीरामचंद्राचे उत्तुंग मंदिर ही प्रसिद्ध आहेत. ही बहुतेक सर्व मंदिरे अभिलेखशेष झाली आहेत मात्र त्यांचे भग्न अवशेष आढळतात. या अवशेषांत रामटेक येथील वराह दरवाज्याच्या ईशान्येस एक भग्न अवस्थेत मंदिर आहे. तेथे फक्त जीर्ण लहान मंडप असून त्याचे छत सपाट आहे. त्याला सहा स्तंभ असून चारांवर पद्मबंधक खोदलेले आहेत. त्याच्या शेजारी चतुर्भुज त्रिविक्रमाची सुंदर मूर्ती भग्नावस्थेत आहे. तिच्या शिरावर किरीटमुकूट असून सभोवती तेजोवलय दाखविले आहे. कानात कुंडले आणि गळ्यात पदकासहीत मुक्ताहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दाखवली असून अधोवस्त्र रशनेने बांधले आहे. त्रिविक्रमाची उभी राहण्याची ढब आणि त्याच्या मुद्रेवरील निश्चय यांतून या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होते.
प्रवरपुर (पवनार) येथील भग्नावशेष विनोबाजींच्या आश्रमाच्या आवारात एका झोपडीत (भरतभेट) ठेवले असून त्यांमध्ये रामजन्म, वनवासगमन, भरतभेट, सुग्रीव-वालियुद्ध, वालिवध असे रामायणातील कथाप्रसंग विशद करणारे काही शिल्पपट्ट आहे. यांशिवाय येथे एक अतिशय गतिमान अंधकासुर वध मूर्तीचा शिल्पपट्ट आहे. भरतभेट या शिल्पपट्टात राम-सीता, लक्ष्मण, भरत यांच्या लक्षणीय मूर्ती असून त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव प्रसंगानुरूप दर्शविले आहेत. रामाची मुद्रा गंभीर असून लक्ष्मणाने मात्र उदासीन होऊन तोंड फिरविले आहे. वालिवध या दुसऱ्या शिल्पपट्टात रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली रक्तस्त्रावाने व्याकुळ झाला आहे. राम प्रत्यालीढ आसनात उभा आहे. त्याच्या मुद्रेवर तिरस्कारयुक्त अभिमान दिसतो.
यांव्यतिरिक्त वाकाटकांची अन्य मंदिरे वा अवशेष आज अस्तित्वात नाहीत परंतु त्यांच्या मांडलिकांच्या प्रदेशातील एक-दोन मंदिरे अद्यापि विद्यमान आहेत. पहिले कंकाळी देवीचे मंदिर जबलपूर जिल्ह्यात बाहूरिबंदजवळ तिगवा या गावी आहे. हा प्रदेश वाकाटकांचे मांडलिक पांडववंशी राजे यांच्या राज्यात मोडत असावा. हे राजे इ. स. पाचव्या शतकात प्रबळ होते, असे बहमनी ताम्रपटावरून दिसते. पांडववंशी भरतबल आपल्या ताम्रपटात वाकाटक नृपती नरेंद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती करताना दिसतो. त्यांवरून वाकाटकांचे स्वामित्व त्यांनी मान्य केले होते, असे अनुमान करता येते. त्यामुळेच हे मंदिर वाकाटककालीन स्थापत्य शैलीचा नमुना समजण्यास हरकत नाही, असे मत वा. वि. मिराशी मांडतात. कंकाली देवीचे मंदिर वाकाटक-गुप्तशैलीप्रमाणे सपाट छपराचे व चौरस असून त्यातील गर्भगृह अडीच मीटर लांबी-रुंदीचे चौरसच आहे. द्वारशाखा पाकळ्यांमध्ये कोरलेल्या सिताफळांच्या आकृत्यांनी सुशोभित केली आहे. गणेशपट्टीच्या दोन्ही बाजू वाढवून तिच्या खाली डावीकडे गंगा व उजवीकडे यमुना या नदीदेवतांचे सुंदर शिल्पपट्ट बसविले आहेत. गंगा-यमुनांच्या मूर्ती हे गुप्तकालीन मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गंगादेवी एका मकरावर त्रिभंगात उभी आहे. तिच्या डाव्या बाजूस एक स्त्री व उजव्या बाजूस चामरधारी सेवक उभा आहे. मूर्तीच्या वरील भागात सीताफळाच्या झाडाची कमान आहे. गंगा उजव्या हाताने सीताफळ तोडीत आहे. गंगेने बहुविध अलंकार धारण केलेले असून तिच्या केशपाशात मुक्तायुक्त ललाटीका, कानात वर्तुळाकार कुंडले, गळ्यात मुक्ताफलकहार, बाहूंवर केयूर, मणिबंधात वलये, कमरेला रशना व पायात नूपुर आहेत. शिवाय गळ्यातील वैजयंतीमाला गुडघ्यापर्यंत लोंबकळत आहे. तिची त्रिभंग अवस्था आणि मुखावरील प्रसन्नता यांमुळे हे शिल्प लक्षणीय ठरले आहे. यमुनेची मूर्तीही अशाच प्रकारची आहे. यमुना कुर्मावर त्रिभंगात आम्रवृक्षाखाली उभी असून डाव्या हातानी तिने वृक्षाची फांदी धरली आहे.
दुसरे मंदिर विंध्यप्रदेशात नाचना कुठारा या गावी आहे. येथे वाकाटक नृपती दुसरा पृथिवीषेण याचा मांडलिक उच्चकल्पवंशी व्याघ्रदेव याचा शिलालेख मिळाला. त्यावरून तो भाग वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता, असे अनुमान वा. वि मिराशी काढतात. साहजिकच येथील पार्वतीचे मंदिर वाकाटककालीन असावे. त्याप्रमाणे हेही मंदिर सपाट छपराचे असून गर्भगृहद्वाराच्या चौकटीच्या आतील पट्टीवर नक्षीकाम असून बाहेरील शिल्पपट्टात दंपतिशिल्पे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूंस तिगव्याप्रमाणेच गंगा-यमुनांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणापथाच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूंस सिंह, अस्वल, हरिणे, मोर,माकडे इ. पशु-पक्षी आणि यक्षगण, सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती खोदल्या आहेत. एका ठिकाणी गोवर्धन पर्वत-उद्धाराचा शिल्पपट्ट दिसतो. मागील भिंतींवर नाग-नागी आणि नाग बालक यांच्या मूर्ती आहेत.तिगवा व नाचना कुठारा येथील मंदिरे ही प्रामुख्याने उत्तरेकडील वाकाटक-गुप्तकालीन वास्तुशैलीतील वाकाटक साम्राज्याबाहेरील मंदिरे आहेत मात्र बाकाटकांच्या कलेचे वस्तुनिष्ठ दर्शन अजिंठ्याच्या गुहा क्र. सोळा, सतरा व एकोणीस तसेच विदर्भातील अवशिष्ट भग्न अवशेषांतुन घडते.
संस्कृत व प्राकृत वाङ्मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय बहर आला होता. तत्कालीन संस्कृत काव्यांवरून वैदर्भीनामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्धीस आली. दंडी, वामन वगैरे आलंकारिकांनी तिची सर्वगुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे. तिच्या गुणांमुळे कालिदासादी अन्य देशीय कवींनीही त्याच शैलीत आपली काव्ये रचली. कालिदासाचे मेघदूत हे सुधामधुर काव्य या काळात विदर्भात रचले गेले. स्वतः वाकाटक नृपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना केली. दुसऱ्या प्रवरसेनाचे सेतुबंध हे काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचलेले अद्यापी उपलब्ध आहे. त्यात सेतुबंधापासून रावणवधापर्यंतचे रामचरित पंधरा आश्वासांत (सर्गांत) वर्णिले आहे. या काव्याची बाणभट्ट, दंडी, आनंदवर्धन इत्यादिकांनी अत्यंत स्तुती केली आहे. या काव्याच्या रचनेत महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेने कालिदासाने प्रवरसेनास मदत केली, अशी आख्यायिका एका प्राचीन टीकाकाराने उल्लेखिली आहे. ती अंतस्थ पुराव्यावरून खरी वाटते. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय नामक उत्कृष्ट काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचले होते, असे संस्कृत काव्यालंकार ग्रंथातील अनेक उल्लेखांवरून आता ज्ञात झाले आहे. त्यामध्ये कृष्णाच्या पारिजातहरणाचे कथानक घेतले होते. याचीही अनेक आलंकारिकांनी स्तुती केली आहे. याशिवाय प्रवरसेन, सर्वसेन इ. वाकाटक नृपतींनी कित्येक सुंदर प्राकृत सुभाषिते रचली होती. त्यांपैकी काही नंतर गाथासप्तशतीत घालण्यात आली.
पहा : अजिंठा गुप्तकाल प्रभावती-गुप्ता.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
2. Yazdani, Gulam, Ed, TheEarly History of the Deccan, London, 1960.
३. मिराशी, वा. वि. वाकाटक नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५७.
४. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६.
मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.
No comments:
Post a Comment