ब्रिटीश राजवटीला 'सळो की पळो' करून सोडणाऱ्या एका महान धनगराचे नाव होते 'संगोळी रायन्ना'!
बंगलोर रेलवे स्टेशनच नाव KSR Bangalore म्हणजे क्रांतिवीर सांगरोळी रायन्ना आहे।
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ब्रिटीशांशी निकराची झुंज देऊन, ब्रिटीश राजवटीविरुद्ध सलग ६ वर्षे लढून ब्रिटीश राजवटीला 'सळो की पळो' करून सोडणाऱ्या एका महान धनगराचे नाव होते 'रायान्ना'! रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा, अनेक गावाचा पाठींबा मिळाल्याने ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती. रायान्नाने पोर्तुगीझाकडून (गोवा), कोल्हापूर संस्थानकडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी पाठींबा मिळण्याचा प्रयत्नही केला होता.
हे सगळं बघून ब्रिटिशांनी रायान्ना नायकाला पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, अमिषे जाहीर केली. ब्रिटिशांची खेळी समजताच रायान्नाने १ जानेवारी १८२९ रोजी आपल्या ३०० साथीदार आणि बिचगुत्ती गावच्या आपल्या सैन्यासह ब्रिटीशांविरुद्धच थेट मोर्चा उघडला. ८ जानेवारी १८२९ रोजी खानापूर मिलिटरी कॅम्पवर हल्ला करून गावच्या चावडी जाळून टाकल्या. रायान्नाचा रुद्रावतार बघून त्याला नडायला कोणी पुढे आला नाही. त्यानंतर कित्तूर, देवरहल्ली, खुदानपूर या गावातील बाजारांवर हल्ला करून ब्रिटिशांनी गोळा केलेले धन (टॅक्स) लुटले. नडायचं जाऊद्या, यावेळी तर कोणी नाव पण घेतलं नाही! बिडी संपगावच्या तालुका कार्यालयावर हल्ला करून रायान्नाने ब्रिटिशांची तिजोरीच ताब्यात घेतली!
ब्रिटिशांनी बक्षीस द्यायचं राहिलं बाजूला, रायान्नानेच ब्रिटीश सरकारचे खजिने लुटून जनतेत वाटले! ब्रिटीश सैनिक कॅम्पवर जोरदार हल्ले केले, पुणे - मुंबई कडे जाणारी पोस्टल सेवा बंद पाडल्यामुळे ब्रिटीश सरकारला दक्षिणेतून येणारा रेवेन्यू गोळा करून मुंबईला पाठविणे जवळजवळ अशक्य करून टाकले! रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध उभी केलीली हि स्वराज्य चळवळ (आजच्या) कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेशाच्या काही भागात पोहोचली होती. ब्रिटिशांनीही या भारताच्या स्वराज्यनायकाच्या 'कार्या'ची नोंद आपल्या रेकॉर्ड्स मध्ये करून ठेवली होती..
धारवाड आणि बेळगाव दरम्यान असलेल्या कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. ५ डिसेंबर १८२४ रोजी कित्तुरू किल्ल्यावरील स्वराज्याचा ध्वज उतरवून ब्रिटीशांनी युनियन ज्याक फडकवला. स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली होती. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना! संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला पकडण्यात आले. तीला सोडवण्यासाठी रायान्नाने खूप प्रयत्न केले. राणीचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला. त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलंच जेरीस आणलं..
संगोळी रायन्नाने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, ब्रिटिशांची मर्जी असलेले सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतासाठी नवीन नाहीत. आपल्याच साथीदाराने दगा केल्याने ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना फाशी देण्यात आली तेंव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे!” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते. १६ डिसेंबर १८३० रोजी रायान्नाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनतर, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे. या समाधीस भेट देण्यास, दर्शन घेण्यास संपूर्ण देशातून विविध जाती-जमातीचे लोक येतात. रायान्ना सारखा शूरवीर पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा, असा नवस नवविवाहित करून त्याचे प्रतिक म्हणून समाधी जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे बांधतात!
तारखांचा योगायोग बघा - या महान क्रांतिकारकाचा जन्म १५ ऑगस्ट रोजी झाला आणि त्यांना १८३० साली वयाच्या ३२व्या वर्षी जेंव्हा फाशी झाली ती तारीख होती २६ जानेवारी! आज या दोन्ही दिवसांना अनन्यसाधारण महत्व आहे..
संगोळी रायन्ना यांचा आज स्मृतीदिन. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन..
- वेद कुमार
No comments:
Post a Comment