विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 April 2021

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

 


दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

दिनांक ७ फेब्रुवारी सन १७७१ रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या. महादजी शिंदेनी शहाआलम बादशहा बादशहाची दिल्लीत व्दाही फिरवली व झाबेताखानाकडून दिल्लीचा ताबा मागीतला. त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या मार्याने दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. झाबेताखान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही. मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार उरला नव्हता. दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेथे तेथे भगवे उभारले होतेच. दिल्लीच तेव्हढी बाकी होती.
दिनांक १० फेब्रुवारी सन १७७१ दिल्ली सर झाली.. दिनांक १४ जानेवारी सन १७६१ रोजी हातातून गेलेली दिल्ली दहावर्षात परत हातात आली. पानिपतावर देशरक्षणासाठी बलिदान दिलेल्या एका पिढीतील नरवीरांना दिल्ली घेऊन पुढच्या पिढीतील नरवीरांनी जणू आदरांजलीच वाहिली.
मराठ्यांच्या या विजयाच्या दणदणाटांत रोहिले व पठाणांना "दत्त्ताजींची ..बचेंगे तो और भी लडेंगे.." या बोलांची निश्चितच पदोपदी आठवण झाली असेल.
महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले, तुकोजी होळकर, सरदार पानसे आणि सैन्याने मराठ्यांच्या हृदयातील पानिपत या जखमेवर एक हळूवार फुंकर मारली.
दिल्लीवर शिवछत्रपतींचा भगवा जरीपटका डौलात फडकला.. शहाआलम हजर नसल्याने शहजादा जवानबख्त यास तख्तावर बसवून मराठ्यांनी सन १७५२ सालात झालेला अहमदीया करार एकवीस वर्षानंतरही पाळला. हीच ती मराठ्यांची विश्वासाहर्ता. जे तख्त घेण्यासाठी आजवर सख्या मुलांनी बापाचे, भावंडांचे मुडदे पाडले.. तेच तख्त हातात असूनही केवळ करार, वचन पाळण्याकरीता मराठ्यांनी ज्याचे त्याला परत मिळवून दिले.
विश्वासू मराठे, न्यायकर्ते मराठे, योध्दे मराठे, राज्यकर्ते मराठे, शासनकर्ते मराठे, जयोस्तु मराठे!
या एका घटनेने उत्तरेलील सत्तासमिकरणच बदलले. जवळपास उभा हिंदुस्थान मराठ्यांच्या छत्रछायेखाली आला. कलकत्तेकर इंग्रजांच्या सत्ताविस्तारास चाप बसला. दिल्लीच्या तख्तावर बादशहाकरवी मराठी अंमल सुरू झाला.
मिसरूड फुटलेल्या निग्राहक माधवराव पेशव्याने अनमोल मराठ्यांच्या मदतीने शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या कक्षेत दिल्लीला पुन्हा एकदा आणून बसवले.
आज या विजयदिनास २५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अत्यंत अभिमानास्पद विजयाच्या सर्व शिल्पकारांना त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!
फोटो - श्री कौस्तुभ कस्तुरे
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...