विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे भाग ३

 



शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे
भाग ३
ताम्रपटातून आढळणारे झंजाचे आणि मंदिरांचे उल्लेख
नागार्जुन राजा ठाणे (९६१), मुम्मुणी ठाणे (९७०), मुम्मुणी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय (९७१), अनंतदेव खारेपाटण (१०१६), महाकुमार केशिदेव ठाणे (१०४२), अपरादित्य वडवली (१०४९), विक्रमादित्य पन्हाळे (१०६१) आणि मल्लिकार्जुन पन्हाळे (१०७३) या नंतरच्या सर्व ताम्रपटात छित्तराजाने झंज राजाबद्दल व मंदिरांबद्दल बर्लिन ताम्रपटात लिहिलेलाच श्लोक लिहिलेला आहे.
झंज राजाने बांधलेल्या मंदिरासाठी ज्या अपरादित्य राजाच्या पन्हाळे ताम्रपटाचा आधार घेतला जातो असा कोणताही ताम्रपट ह्या राजाचा नाही. अपरादित्य राजाचा वडवली ताम्रपट आहे आणि पन्हाळे ताम्रपट एक नसून दोन आहेत. त्यापैकी पहिला ताम्रपट विक्रमादित्य (शके १०६१) व दुसरा ताम्रपट मल्लिकार्जुन (शके १०७३) या राजाचा आहे. तसेच ज्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो, तो अर्धवट आहे. पूर्ण श्लोक: तस्माज्जातस्तनूजो रजनिकर इवानदिताशेषलोक श्लाघ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानीव मन्ये प्रणत तनुभृ तां स्वर्ग्गमार्ग्गोद्यातानां. हा संपूर्ण श्लोक सद्यस्थितीत बर्लिनमध्ये असलेल्या छित्तराजाच्या शके ९५६ च्या ताम्रपटात आधीच आला आहे.
वरील ताम्रपटांचा अभ्यास केल्यानंतर छित्तराजाच्या कल्याण व बर्लिन ताम्रपटात पहिल्यांदा झंज राजाचे नाव शिवमंदीरांशी जोडले गेलेले दिसते. जर झंज राजाने शंकराची मंदिरे बांधली असती तर त्याचा उल्लेख झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी किंवा छद्वैदेव यांनी नक्कीच केला असता. पण झंज राजानंतर साधारणपणे ८९ वर्षानंतर सत्तेवर आलेल्या छित्तराजा याने केलेला आहे. छित्तराजाच्या आधीच्या राजांनी ताम्रपटात झंज राजाने बांधलेल्या शंकराच्या मंदिराविषयी काहीच भाष्य का केलेले नाही ह्याचे समाधानकारक उत्तर मिळणे सध्यातरी कठीण आहे.
जर झंजाने मंदिर ताम्रपटातील नोंदीनुसार शंकराची मंदिरे बांधली असतील तर त्याची नोंद झंजानंतर सत्तेवर आलेल्या गोग्गी आणि छद्वैदेव यांनी का नाही घेतली.
जर झंज राजाच्या काळात ह्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असे मानले आणि ही मंदिरे त्याच्या कार्यकालात पूर्ण न होता नंतरच्या राजांच्या कार्यकालात पूर्ण झाली असे मानले, तर त्या राजांनी शिलालेख नोंदून ठेवले असते. उदा. अंबरनाथ शिवमंदिरातील राजा मम्मुनी याचा शिलालेख. छित्तराजा हा पण मोठा शिवभक्त होता. त्याने अंबरनाथ येथील प्रसिध्द भूमिज शैलीतील शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. पण ते मंदिर छित्तराजाच्या कारकिर्दीत पूर्ण न होता मम्मुनी राजाच्या कार्यकालात पूर्ण झाले. तर अंबरनाथ मंदिरात तश्या अर्थाचा शिलालेख कोरून ठेवला आहे. या शिलालेखात हे मंदिर छित्तराजा याने बांधायला सुरुवात केले आणि मम्मुनी याच्या काळात काही अधिकाऱ्यांनी मंदिराचे काम पूर्ण केले असे नमूद केले आहे. ह्या शिलालेखाचा काळ शके ९८२, शुक्रवार ९ आणि श्रावण महिना आहे. मंदिराचे काम ज्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले त्यांची नावे सुध्दा दिलेली आहेत. उदा. महामात्य बिंबपैय, महाप्रधान नागनैय इ.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...