विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे भाग ४

 






शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे
भाग ४
ताम्रपटातून आढळणारे झंजाचे आणि मंदिरांचे उल्लेख
शिलाहार राजांनी मंदिरे बांधली आणि त्या मंदिरांसंदर्भात त्यांनी शिलालेख पण कोरून ठेवले आहेत. त्या शिलालेखांमध्ये मंदिराचे नाव, काळ, मंदिराला जमीन दान दिली असेल तर त्याचे उल्लेख, मंदिर कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले इ. अनेक संदर्भ वाचायला मिळतात. उदा. १) लोणाड येथील अपरादित्य दुसरा याच्या शके ११०६ मधील गध्देगाळीवर कोरलेल्या शिलालेखात “व्योमेश्वर” मंदिराचा उल्लेख आहे. लोणाड गावात शिलाहारकालीन मंदिर आहे आणि तो शिलालेख ह्याच मंदिरासंदर्भात असावा. २) चौधरपाड्यातील केशीदेव दुसरा याच्या शके ११६१ काळातील शिलालेखात “श्रीषोंपेश्वर” असा मंदिराचा उल्लेख आला आहे.
लोणाड शिलालेख
चौधरपाडा शिलालेख
मंदिर की कीर्तन?
वरील सर्व ताम्रपटात मंदिराऐवजी ‘कीर्तन’ हा शब्द वापरला आहे. तर कीर्तन म्हणजे नक्की काय? हा प्रश्न वाचकांना पडू शकतो. झंज राजाने बारा शिवकीर्तन बांधली असे वरील ताम्रपटात वाचायला मिळते. दिनेशचंद्र सरकार यांच्या मते “कीर्तने म्हणजे एखाद्या राजाच्या नावामुळे प्रसिध्द झालेले मंदिर अथवा वास्तू. शिलाहारराजांच्या समकालीन असलेल्या इतर राजांच्या ताम्रपटांमध्ये कीर्तन हा शब्द आलेला आहे.
झंज राजाने बांधली म्हणून जी बारा मंदिरे सांगितली जातात, त्यापैकी फक्त हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर आणि नागेश्वर हीच तीन मंदिरे मूळ रुपात आहेत. बाकीची मंदिरे धरणाच्या पाण्यात गेलेली आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण झालेले आहे. मंदिराची शैली ओळखण्यासाठी मंदिराचे शिखर महत्त्वपूर्ण ठरते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर नागर शैलीत, अमृतेश्वर मंदिर भूमिज शैलीत आणि नागेश्वर मंदिर फांसणा शैलीत आहेत. कुकडेश्वर मंदिराचा शिखर नष्ट झालेले असल्यामुळे त्याची निश्चित शैली सांगता येणार नाही. जर झंज राजाने ही मंदिरे बांधली आहेत, तर त्यांची शैली वेगवेगळी का?
भूमिज शैलीतील अमृतेश्वर मंदिर
फांसणा शैलीतील नागेश्वर मंदिर
शिखर नसलेले कुकडेश्वर मंदिर
तसेच झंज राजा मंदिरे बांधतो ती पण त्याच्या राजधानीपासून भरपूर लांब ठिकाणी. असे का? त्याला मंदिरे बांधायचीच असती तर ती त्याने राजधानीच्या आसपास बांधली असती. ज्या प्रदेशात ही सगळी मंदिरे आहेत तो प्रदेश झंज राजाच्या ताब्यात होता का हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांच्या उगमावर असलेली बारा मंदिरे झंज राजानेच बांधलेली आहेत ह्या दाव्याला आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे.
संदर्भ
Mokashi, Rupali 2016 King Jhanja and the Legend of Shiva Temples: An Epigraphical Analysis. Research Deliberation, Vol II / Issue I (May, 2016) 8:3, pp. 25–41.
Kanhere, Gopal 1988 The Temples of Maharashtra. Maharashtra Information Centre, New Delhi
सूत्रधार मंडन विरजित प्रासाद मंडन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
गद्रे, प्रभाकर २०१० मंदिर स्थापत्याचा इतिहास, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर
Fergusson, James History of Indian and Eastern Architecture (Vol. I & II), Rupa Publications, New Delhi

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...