धनाजी जाधव यांचे पूर्वज आणि वारस
भाग २
महाराष्ट्रांत १६९२ सालीं संताजींंच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होते. धनाजींंच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण ते आपल्या लोकांनां अधिक प्रिय होते. इकडे धनाजींंनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.
धनाजी हे संताजी घोरपडयांंबरोबर महाराष्ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें ते संताजींंबरोबरच होते. परंतु शेवटीं शेवटीं या दोन्ही सरदारांमध्यें वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजींंनें संताजींंच्या सैन्यांतील कांहीं लोकांस फितविलें, व एके दिवशीं विजापुराजवळ संताजींंवर एकदम हल्ला केला. संताजी आपला जीव वांचवून कसे तरी तेथून निसटले, तेव्हां कांहीं लोकांनां त्याच्या पाठलागार्थ पाठवून, व कांहींनां सातार्यास राजारामा महाराजांकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारें १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरितां पुन्हां कर्नाटकांत आले. यापुढें दोन वर्षें धनाजींंची व झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजींंनें कर्नाटकांत व महाराष्ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.
औरंगझेब महाराष्ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजींंनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होते. धनाजींंचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, ते आलेले दृष्टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार 'तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?' असें घोडयास विचारीत. मध्यंतरी (१७०७) घोरपडयांनीं ताराबाईच्या मुलखांत लुटालूट केल्यामुळें धनाजी त्याच्या पारिपत्यास गेले असतां झुल्फिकारखान घोरपडयांच्या मदतीस आला, व त्यानें धनाजींंस कृष्णेपार काढून दिलें. यानंतर मोंगलांचें सैन्य महाराष्ट्रांतून निघून गेल्याबरोबर धनाजींंनें पुण्याचा फौजदार लोदीखान याचा पराभव करून चाकणचा किल्ला परत घेतला.
यानंतर मोंगलांच्या छावणींतून शाहूराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रांत आले, तेव्हां ताराबाईंंकडून धनाजी जाधवांंची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजींंनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून ते त्याला मिळाले. पुढें शाहूराजे गादीवर बसले तेव्हां त्यानें धनाजींंस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हे अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिले. कोल्हापूरकर मात्र त्यांंना फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
पुढल्या वर्षीं धनाजी हे कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावले (मे १७१०). त्यांंना कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें ते बरेच दिवसपर्यंत आजारी होते. या आजारांत त्यांंनें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ यांंची नेमणूक केली होती.
धनाजींंची स्त्री गोपिकाबाई ही सती गेली. धनाजींंस दोन बायका होत्या. पहिलीस संताजी व दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंह असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला. शिवाजी महाराजांच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय. धनाजी हे सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.
No comments:
Post a Comment