विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९००० भाग ४

 

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००
लेखन व संकलन: प्रमोद करजगी


भाग ४
मराठेशाहीतील जखमी सैनिकांच्या पगाराबद्दलची मराठ्यांच्या इतिहासातील उदाहरणे: आपाजी राम दाभोलकर यांच्या, तारीख २२जुलै१७९० च्या एका पत्रात राजस्थानातील पाटण येथील लढाईतील जायबंदी सैनिकांची तपशीलवार माहिती दिली आहे. पाटण येथे महादजीचे सैन्य व मोंगल सरदार इस्माईल बेग यांच्यात झालेल्या लढाईत मराठ्यांच्याकडील एकूण ३६१ सैनिक जाया झाले. त्यापैकी ३०९ जखमी व ५२ ठार झाले.३०९ जखमी पैकी ७२ तलवारीच्या वाराने, ३४ भाल्याच्या हल्ल्याने, ९ बर्चीच्या हल्ल्याने, ६ बाण लागल्याने, १५१ बंदुकीच्या गोळीमुळे व उरलेले ३१ दगडाच्या माऱ्यामुळे जखमी झाले अशी तपशीलवार माहिती दिली आहे. एव्हढेच नव्हे तर या लढाईत १७३ घोडी जाया झाली, त्यापैकी ६९ ठार झाली तर बाकीची वेगवेगळ्या कारणाने जखमी झाली असे म्हंटले आहे.
राजस्थानातील कोटा संस्थान येथील शिंदे सरकारचे वकील गुलगुले यांच्या एका पत्रामध्ये जयाजी शिंदे आपल्या पदराच्या माणसांची कदर किती करीत व त्यांची कशी काळजी घेत याबद्दलची माहिती दिली आहे. उदाहरणार्थ जयाजी शिंदे यांच्या फौजेतील एक सैनिक चांदखान हा लढाईत जखमी झाल्यावर तो बरा होईपर्यंत पगार ठरवून दिला होता.चांदखान याला १२ रुपये दरमहा जखम बरी होईपर्यंत द्यावेत व त्यानंतर रोज ४ रुपये या प्रमाणे वीस दिवस द्यावेत असा आदेश दिलेला होता. राजजी गायकवाड बारगीर या दुसऱ्या एका सैनिकाच्या बाबतीत दरमहा रुपये १० जखम बरी होईपर्यंत व त्यानंतर अडीच रुपये रोज जखम बरी झाल्यावर वीस दिवस द्यावेत असा आदेश दिलेला होता.
बगाजी श्रीपत याच्या हस्ते ७० रुपयेची हुंडी जखमी सैनिकांच्या खर्चासाठी मोत्याजी थोरात शिलेदार याजकडे पाठवली आहे, असा उल्लेख ‘उत्तर मराठेशाहीतील सराफी धंदा’ या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासीकातील एका लेखामध्ये आला आहे. अशा स्वरूपाची उदाहरणे मराठेशाहीच्या अभ्यासात आढळतील ज्या मध्ये जखमी झालेल्या सैनिकांच्या पोटापाण्याची योग्य ती काळजी त्यांच्या वरिष्ठानी घेतलेली होती.अशा कारणामुळेच मराठेशाहीत मराठे वीर आपले प्राण पणाला लावून हिंदुस्थानात कुठेही लढायला सदैव तयार असत असे दिसते.
मराठ्यांच्या मोहिमेत नेहमी कारभारी, लेखनिक व कारकून मंडळी सुद्धा सहभागी होत असत.मृत सैनिकाच्या भावाला किंवा त्याच्या मुलाला त्याच सैन्यात नोकरी मिळत असेल काय? जरी मला या संबधीचा ठोस पुरावा ऐतिहासिक कागदपत्रात आढळला नाही तरी पण मराठे सरदारांचे त्यांच्या सैनिकांबरोबरचे वर्तन पाहिले म्हणजे याचे उत्तर 'हो' असेच द्यावेसे वाटते.
लेखन व संकलन: प्रमोद करजगी
संदर्भ: उत्तर मराठेशाहीतील सराफी धंदा लेखक वा.गो. काळे, महादजी शिंदे याजकडील राजकारणे:आपाजी राम दाभोलकर यांची पत्रे,भाग तिसरा,लेखांक ९६, तारीख २२जुलै१७९०, शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग पहिला, कोटा संस्थान येथील शिंदे सरकारचे वकील गुलगुले यांचे दप्तरातील पत्रव्यवहार, संपादक आनंदभाऊ फाळके.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...