होळकर घराणं हे इतिहासातलं एक महत्त्वाचं राजघराणं. ह्या राजघराण्यात एकूण चौदा राज्यकर्ते होऊन गेले.
या चौदा पैकी काही अल्पायुषी ठरले तर काही फक्त राजेच झाले. ह्या सर्व होळकर राजवटीत सर्वांगीण विकासाचा आणि आदर्शवत असा सुवर्णकाळ होता तो अहिल्यादेवी होळकर आणि त्यानंतर थेट अकरावा राजा तुकोजीराव (द्वितीय) होळकर या दोघांचा. होळकर राजघराण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा राज्यकारभार तर भारतात सर्वश्रुत आहेच. पण तुकोजी (द्वितीय) यांची कारकीर्द आदर्शवत आणि संस्मरणीय असूनही फारशी प्रसिद्घ मात्र नाही. श्रीमंत तुकोजीराव (द्वितीय) हे १७ जून १८४४ साली होळकर घराण्याचे अकरावे राजे म्हणून इंदूरच्या गादीवर बसले. त्यांनी बेचाळीस वर्ष राज्य कारभार सांभाळला. तुकोजीरावांच्या काळात भारतावर तसं इंग्रजांचं वर्चस्व होतं. आपल्या कार्यकाळात तुकोजीराजांनी मध्यप्रदेशात रेल्वेची सुविधा निर्माण केली, कापडगिरण्याही चालू केल्या, टपालव्यवस्था, आरोग्यकेंद, दवाखाने, शैक्षणिक दृष्टीनं त्या काळात शहरात इंजिनियरींग कॉलेजेस तर ग्रामीण भागातपर्यंत शिक्षण प्रसार योजनाही राबविल्या. कलागुणीजनांना प्रोत्साहन देण्याच्या कामाबरोबरच वन्यविकास, रेव्हेन्यु डेव्हलपमेंट तसंच वर्तमानपत्रही सुरू केलं. ह्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांनाही तुकोजीराजांनी सहाय्य केल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी इंदूर संस्थानातून आपल्या राज्याच्या परिसरांत राष्ट्रगीत म्हणण्याचीही प्रथा रूढ केलेली होती. अर्थात वंदे मातरम् किंवा जन-गण-मन हे नसून हे एक स्वतंत्र राष्ट्रगीत होतं. असा हा राष्ट्रसेवक आणि सर्वांगीण प्रगती साधणारा होळकर राजा होता. म्हणूनच तुकोजी (द्वितीय) यांचा कार्यकाळ होळकर घराण्यातला श्रेष्ठकाळ मानला जातो. इंग्रजांना एक कोटीचे कर्ज देणारे राजे म्हणून यांचा उल्लेख येतो. इंग्रज महाराजांचे कर्जदार झाले होते त्यांच्या काळात म्हणजे मल्हारराव, अहिल्यादेवी नंतर राज्यकारभार तुकोजीराव होळकर यांनी केलेली आर्थिक भरभराट आपल्या नजरेत भरते.
No comments:
Post a Comment