गुंजण मावळचे देशमुख शिळीमकर
अमृतेश्वर मंदीर हे गुंजण मावळ येथील मोहरी या गावी आहे,गुंजण मावळचे देशमुख शिळीमकर यांचे ते कुलदैवत, या शिळीमकर घरण्याबाबत थोडी माहिती घेऊयात!
शिळीमकर मूळचे शिंदे या शिंदे देशमुखास सिलिंब या गावावरून सिलीमकर-शिळीमकर नाव पडले,तसा अनेक पत्रात सिंदे सिलीमकर असाच उल्लेख मिळतो.शिळीमकर हे गुंजन नदीच्या खोऱ्यातील 84 गावाचे देशमुख होय शिंदे घराणे हे प्राचीन घराणे होय, या घराण्यास रवीराव, झुंजारराव व हैबतराव असे किताब होते,जावळीच्या खोऱ्यात,पवन मावळात,आणि गुंजन मावळात यास देशमुख होती,तसे मराठा वाडा विदर्भ या भागात देखील हे घराणं स्थिरस्थावर झाले होते,
या शिळीमकर घराण्यातील एका करीना(कैफियत) मध्ये खालील उल्लेख मिळतो तो असा
"करीणा सुभानराव बिन खंडेराव सिंदे सिलिमकर देशमुख ता। गुंजणमावळ सु॥ सबा तिसैन मया व अलफ करीना लेहून दिल्हा ऐसा जे, आमचा मूळपुरुष शाहाजी शिंदे रविराव मुकाम बेसवडा हे निघोन पायेनडास येऊन नजिक बलवंड व तोरणाल आहे;"
या वरून असे लक्षात येते के हे घराणं मूळ बेसवडा येथून आले आहे,बहुतांशी शिंदे बेसवडा येथून आल्याचे सांगतात, या करीना मध्ये उल्लेख ही तसा भेटतो,त्यामुळे त्या गोष्टीस बळकटी मिळते,
शिवपूर्व काळात राजगड किल्ला निजामशाही कडे होता,आदिलशाहाने किल्ल्यावर चढाई केली त्यावेळी गडाचे किल्लेदार शिळीमकर होते असे संदर्भ भेटतात,राजगड मुरूम खोऱ्यात म्हणजेच गुंजण मावळात मोडत होता,या मुळे या शिंदे शिळीमकर देशमुखांचा राजगडाशी घनिष्ठ संबंध होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त वेढ रोवली व हिंदवी स्वराज्य वाढवण्यास प्रारंभ केला,महाराजांनी मावळातील माणसे जोडायला सुरुवात केली पण मावळ खोऱ्यातील देशमुख मंडळी स्वतंत्र राजे असल्या प्रमाणेच वागत असत या मुळे महाराजांनी कधी गोडी गुलाबीने तर कधी लढून या देशमुख मंडळीस स्वराज्यत सहभागी करून घेतले, त्यावेळी मावळातील फुलाजी नाईक शिंदे देशमुख शिळीमकर हे आपल्या पाच हजाराच्या पथका सहित स्वराज्यात आले,
या नंतर शिळीमकर घराण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले, या घराण्यातील अनेक मंडळींनी स्वराज्यासाठी बलिदान दिले,
औरंगजेबाने राजगडास वेढा घातला त्यावेळी संताजी शिळीमकर कामी आले,त्यापूर्वी पुरंदर किल्ल्याच्या लढाईत सुभानराव शिळीमकर मारले गेले,सोबत रखमाजी शिळीमकर हे ही कामी आले,सुलतानराव शिळीमकर तोरण्यावर पायदळाच्या पंचसहस्त्री होता तसेच माकाजी हे ही तोरण्यावर पायदळाच्या हजारी होते, अशा तर्हेने पुरंदर,राजगड,तोरणा,या किल्ल्यांशी शिळीमकर देशमुखांचा संबंध आला आहे,
बेलसरच्या फतहखानाच्या सोबत झालेल्या लढाईत महाराजांनी पुरंदर वर मावळातील देशमुख मंडळीचा जमाव केला होता,महाराजांचा जमाव तीन हजारहुन अधिक होता,मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर,कारीचे जेधे,हिरडास मावळचे बाजी बांदल,कानद खोऱ्याचे झुंजारराव देशमुख,व गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख आप आपल्या जमावाणीशी पुरंदर वर पोहचले होते,महाराजांच्या या महत्वाच्या लढाईत शिळीमकर घराणे सहभागी झाले होते,या लढाईत महाराजांनी पहिल्या तुकडीच्या जोरावर सुभान मंडळचे ठाणे व पुरंदरची लढाई ही जिंकली!
जावळीचे मोरे आणि शिळीमकर
हिंदवी स्वराज्या लगत जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य होते, मोरे हे शिळीमकर देशमुखांचे नात्याने मामा लागत होते,१६४० च्या मोऱ्यांच्या दत्तक प्रकरणात महाराजांनी माणकाईने घेतलेल्या दत्तक कृष्णाजी बाजी चंद्ररावास गादीवर बसवले होते,या मदतीच्या पाठी मोरे हे पुढे स्वराज्यकार्यत सहभागी होतील अशी आशा महाराजांना होती म्हणून त्यांनी त्यास मदत केली खरी पण पुढे चंद्रराव मोऱ्यांनी महाराजांशी उघड उघड शत्रुत्व घेतले,
महाराजांनी सर्व मावळ खोऱ्यातील मावळे संघटित करून सर्वांना स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणले व स्वराज्य संवर्धनास सुरुवात केली,स्वाभाविकच मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला नकळत धोका उत्पन्न झाला, त्यांच्या स्वराज्य कार्याला पायबंद बसण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळेच चंद्ररावाने महाराजांच्या स्वराज्य कार्याला विरोध सुरू केला,महाराजांचे उगवते स्वराज्य व चंद्ररावांची जुनी सत्ता यात संघर्ष उत्पन्न झाला.
या नंतर मोऱ्यांनी अनेक ठिकाणी जुलूम जबरदस्ती केले यामुळे जुलूम झालेली मंडळी महाराजांच्याकडे गेली,महाराजांनी अनेक तंटे बखेडे सोडविले,पुढे हा वाद वाढत गेला व त्याचे लढाईत रुपांतर झाले, महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्यात फोडा फोडीचे मोऱ्यांनी राजकारणाचा अवलंब केला,
गुंजण मावळच्या देशमुखी बद्दल शिंदे शिळीमकर व चोरघे यांचा वाद होता,चोरघे शिरेजोर झाले होते,त्यामुळे चोरघे गुंजण मावळच्या देशमुखीवर आपला अधिकार सांगू लागले,यात भर म्हणून मोऱ्यांनी घोषणा केली घाट मात्यावरील देशमुखी आमचीच,या भांडणात महाराजांनी शिळीमकरांच पक्ष उचलून धरला,शिळीमकरांनी फतहखान मोहिमेत मनःपूर्वक साथ दिली होती,ते महाराजांचे एक निष्ठ साथीदार होते.
शिळीमकर महाराजांच्या पक्षाला मिळालेले पाहून चंद्रराव मोऱ्यांने,नात्या गोत्याच्या आधारे शिळीमकरांचे कान भरण्यास सुरुवात केली,ही बातमी महाराजांना कळताच त्यांनी त्यास तातडीने पत्र पाठवले..
"आजर. राजश्री सिवाजीराजे - हैबतराउ देशमूख ता गुंजणमावळ तुमचे बाबे हुजूर खबर मालूम जाली जे,कित्येक बडिया लोकांनी तुमचे पाठी शक घातला आहे की तुमची देशमुखी आम्ही घेऊ तुम्हास वाईट करू ऐसा शक घातला आहे व दळवी याचे कर्ज आहे त्यास तुम्ही जमान आहा जमानती झाडे लावून तुम्हास कष्टी करू ऐसा शक तुमचे पोटी वैसविला.व कितेक तुमचिया घरोबियामध्ये एक प्रकार वर्तणूक जाली आहे असे कितेक लोक बोलताती.तरी येही गोष्टीच्या निमित्त्या येऊन कष्टो करितील ऐसा शक बसविला आहे.या तिही गोष्टी करता व कितेक गोष्टी करिता तुम्ही शकजादे आहा.डावा कौल होता तरी तुम्हास साहेब घरिच्या लेकरासारिखे जाणिती आणि तुमचे फार हेही गोष्टीचे वाईट करावे ऐसे मनावर धरणार नाहीत हे तुम्हास बित्तिम कळले असावे.कोणेही गोष्टीचा शक न धरणे.तुमचे हजार गुन्हे माफ आहेती. तुम्हास आम्ही काहीहि वाईट वर्तणूक करू तरी आम्हास महादेवाची आण असे व आईसाहेबांची आण असे.कोणेही गोष्टीची चिंता न करणे.अवांतरही लोक भेडसावले असेल ते भेटविणे.आमच्या इमानाबरी आपली मान ठेवुनु आम्हापासी येणे कोणे गोष्टी चिंता न करणे.मोर्तब."
या पत्रात हैबतराव शिळीमकरांना महादेवाची व आईसाहेबांची आन घेऊन विश्वासात घेतले,
यानंतर महाराजांनी अचूक वेळ गाठून जावळीवर हल्ला करण्याचे ठरविले,या लढाईत स्वतः महाराज उतरले होते सोबत होते शिळीमकर देशमुख,कोंढाळकर,काकडे,जेधे,बांदल इत्यादी मातब्बर सरदार होते.
महाराजांनी पहिल्याच ठोक्यातच जावळी काबीज केली या वेळी चंद्रराव पळून रायरी येथे लपले,शिळीमकरांच्या मध्यस्ती मुळे मोरे गडउतार झाले व जावळी स्वराज्यात महाराजांनी आणली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिळीमकरांचा स्नेह इतिहासात पहायला मिळतो असाच एक संदर्भ भेटतो तो असा की शिळीमकर घराण्यातील विठोजी शिळीमकर यांच्या मुलीच्या लग्नात पैशाची चणचण भासली होती तेव्हा महाराजांनी ५०० जनांचे जेवण दिले होते,खंडोजी खोपड्याच्या प्रकरणात रतबदली करता त्याने जेधे व शिळीमकरांना मध्यस्ती घेतल्याचे संदर्भ सुद्धा भेटतात.
खरे तर शिळीमकर घराण्याचा खूप जज्वलंनत इतिहास आहे त्यावर स्वतंत्र संशोधन होणे गरजेचे आहे,हा झाला या घराण्याचा कुलवृत्तांत व इतिहास आत्ता जाणून घेऊयात त्यांच्या कुलदेवता बद्दल
गुंजन मावळातील मोहिरी गावातील अमृतेश्वर हे प्राचीन मंदिर असून ते यादव कालीन आहे असे सांगितले जाते,मंदिराच्या वर वरच्या जीर्णोद्धारमुळे मंदिराचे मूळ रूप नाहीसे झाले असून,मुळात मंदिराचा जीर्णोद्धार करताना भडक रंगाचा वापर नकरता,आहे त्या जुन्या शैलीतच केला गेला पाहिजे त्यामुळे मंदिराचे मूळ रूप टीकून राहते,पूर्वी सभा मंडप लाकडी स्वरूपाचा असून सध्या सिमेंटच्या खांबात उभा आहे,या मंडपात महादेवाच्या नंदीचे अधिष्ठान आहे,मंदिरावर अनेक शिल्पे आपलं लक्ष वेधून घेतात, कमळ,वाघ सिंह,हत्ती व शरभाची अनेक चित्र आहेत,त्यातील दक्षिणेकडे गडभेरुंड शिल्प म्हणजे दोन चोची व एक पोट असलेला गरुडासारखा पक्षी आणि पोटामध्ये दोन्ही बाजूस वाप असलेलं हे वेगळेच शिल्प इथे पहायला मिळते,सोबत मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे व चित्रे कलाकृत्या आहेत,
मंदिराच्या गाभाऱ्यात शिव पिंड असून पाठी मागच्या कानोड्यात, सुंदर देखणी विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे, या मंदिरात आजही अमृतेश्वरास बिछाना टाकला जातो,गावकऱ्यांच्या मते अमृतेश्वर स्वतः त्या ठिकाणी विश्राम करतात म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मनो भावनेने बिछाना टाकला जातो,
मंदिराचा आवारात छोट्या खणीचे देवीचे आणि मारुतीचे मंदिर पाहायला मिळते,सोबत भव्य दिव्य दीप माळ लक्ष वेधून घेते,या ठिकाणी शिवरात्र उत्सव भजन कीर्तनाच्या गजरात साजरी केली जाते,
मंदिराच्या कडेने ओढा वाहतो,चैत्र पाडव्याला मानाची कावड ओढ्यातील पाणी भरून शिखर शिंगणापूरास नेली जाते,
गुंजवणी नदी आणि शिवगंगा नदी यांच्या पाणथळ आसमंतातील हा परिसर धंडाव्याने प्रसन्नता निर्माण करतो. मंदिराच्या जवळून वाहणारा ओढा आणि त्याकाठी असलेली दगडी तळी किंवा कुंडे दुष्काळातही आटत नाहीत. थंड आणि स्वच्छ पाण्याने ती सदैव भरलेली असतात.सह्याद्रीच्या रांगेच्या पार्श्वभूमीवरील हे अमृतेश्वर मोहरी मंदिर एक चांगले सहलीचे निसर्गस्थान असून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने असे ऐतिहासिक प्राचीन मंदिर - परिसर सुधारल्यास पर्यटनातून शिक्षण,शिक्षणातून प्रशिक्षण, प्रशिक्षणातून लोकशिक्षण आणि लोकशिक्षणातून समाजकारण आणि समाजरंजनहीं पडेल ; मात्र हा परिसर - विकास स्थानिक निसर्गदृश्य व परिसरदृश्य कोणत्याही प्रकारे न विचलित करता न बिघडवता करणे विशेष जबाबदारीचे आणि कौशल्याचे आहे.
शिवछत्रपतींनी याच परिसरातील राजगड किल्ल्यावर २४ वर्षे राजधानी शर्थनि जपली.तोरणा आणि पुरंदरही याच परिसरात.मराठ्यांच्या इतिहासाला मावळचा भूगोल अनुकूल ठरला.त्यातून राजकारण घडले - निसर्गाच्या मदतीने, मनाच्या उमेदीने आणि शर्थीच्या शौयनि! याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची सुसंधी आपल्याला लाभते अशा स्थानांच्या भेटीगाठीतून!
*अमृतेश्वराबद्दल काही महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख केल्याशिवाय त्याच्या परिचयाची सांगता होणार नाही.
मोहरीचे ' दिव्य'
शिवकाळात आपापसातील वादविवाद, तंटे बखेडे मिटवण्यासाठी व निर्णयासाठी अमृतेश्वर मोहरी मंदिरात न्यायनिवाडा होत असे.एकमत किंवा उभयपक्षी समझोता न झाल्यास दिव्य ' करण्याची प्रथा होती. तापलेला लोखंडी गोळा हातात धरून निर्दोषीपणा सिद्ध करावा लागे.अशी 'दिव्ये 'इथे झाल्याचे ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आहेत.गुंजन - मावळचे कुलदैवत शिवकालीन अमृतेश्वर मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी पुरोहित,इनामदार आणि राजगुरवांची नियुक्ती केलेली होती.त्यांचे सालीना वर्षासन स्वातंत्र्य मिळेपर्यंत रु. ४० / होते.
गुंजन मावळातील ८४ गावांचे देशमुख-
शिळीमकर यांचे कुलदैवत 'अमृतेश्वर '! राजगडावर शिळीमकर घराण्यातील पुरुषाने शौर्य गाजवले होते,त्यांचे वंशज सेवा करतात महादेव कोळी मंडळी,व गोपाळ महादेव,बबन हरिभाऊ राजगुरू , वसंत नारायण आणि कृष्णाजी गंगाधर पुरोहित हे ग्रामस्थ वंशजही परंपरागत देवाची सेवा करतात.
स्वयंभू शिवलिंग नदीत सापडले मधे शाळंका नसलेले शिवलिंग हे या मंदिराचे वैशिष्ट्य.मंदिराच्या निर्मितीच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत.त्यापैकी एक म्हणजे मोहरी बुद्रुक गावाजवळील गुंजवणी नदीच्या पात्रात एका गोराख्याला दोन गायी दुधाचा पान्हा सोडत असल्याचा दृष्टान्त झाल्यावर शोध घेता तेथे दोन शिवलिंगे आढळली ; त्यापैकी एक न घडवलेले - स्वयंभू लिंग अमृतेश्वर मंदिरात आहे.ते आणण्यासाठी बारा बैल लावूनही लिंग हलेना. दूध देणाऱ्या त्या गायींचे खोंड दृष्टांताप्रमाणे लावल्यावर शिवलिंग जागचे हलले व त्याची ओढ्याकाठी स्थापना झाली.
अशी आख्यायिका या मंदिरा बाबत सांगितली जाते,या भागात आला तर नक्कीच या मंदिरास भेट द्या..
संदर्भ-मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १७ राजवाडे
शककर्ते शिवराय भाग १-विजयराव देशमुख
राजाशिवछत्रपती-पुरंदरे
पानसे घराण्याचा इतिहास
अपरिचित महाराष्ट्र्र-गोरसाळे
ऐतिहासिक पत्रे मावळातील निवाडे
©शेखर शिंदे सरकार
No comments:
Post a Comment