विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांचे विविध पैलू

 


श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांचे विविध पैलू-
१)स्वभाव - महादजी हे मोकळ्या स्वभावाचे होते. त्यामुळे ते अनेकांना आवडत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती होती. तरीही त्यांची रहाणी साधीच होती.
२)धार्मिक सहिष्णूवृत्ती- महादजी हे धार्मिक सहिष्णूवृत्तीचे असुन ते कृष्ण भक्त असल्याचे दिसुन येते. इश्वराच्या भजनात ते बराच वेळ घालवत. कपाळावर मुद्रा लावत असत. तसेच हातात स्मरणी(माळ) मथुरा, गोकुळ, वृंदावन, पुष्कर वगैरे ठिकाणी त्यांनी पैसा खर्च केल्याचे दिसते. महादजींचे गुरू हिंदूंबरोबरच मुसलमानांचे पीर, साधु, संत हेही असल्याचे दिसुन येते. वारकरी पंथातले संत मल्लाप्पा वास्कर हे त्यांचे गुरु होते. वास्कर महाराजांनीच महादजींना दिक्षा दिली. व त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. तीच माळ पुढे हातात घेऊन फावल्यावेळी पाटीलबाबा भगवंत नामाचा जप करीत असत.
३)शिक्षण- महादजी हे शिकलेले होते. त्यांनी मराठी बरोबरच फारशी, ऊर्दू भाषा आवगत करून घेतल्या होत्या.
४)लेखन - महादजी शिंदे हे कवी होते. त्यांना ज्या ज्या वेळी वेळ मिळत असे. त्या त्या वेळी ते पदे रचत असत. त्यांनी माधव या नावाने अनेक अभंग रचलेले दिसुन येतात. त्यांनी माधवविलास या नावाचा ग्रंथ लिहलेला दिसुन येतो.
५)प्रशासन- महादजी हे राज्य जिंकल्यानंतर त्या राज्याची चोख व्यवस्था लावत. राज्यात शांतता राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करीत. प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष देत. राज्याच्या हिशोबा बाबत दक्ष असल्याचे दिसुन येते
६)युद्धनीती- महादजींना पानिपतच्या युद्धात अपंगत्व आले. महादजी युध्दाची तयारी करुन आक्रमण करीत. युध्दनीतीमध्ये ते नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत. एकदम सर्वांशी विरोध न करता ते एकाशी विरोध तर एकाशी मैत्री यानुसार आपले वर्तन ठेवत व डावपेच आखत.
७)सैन्यव्यवस्था-महादजींनी डी-बाँय या फ्रेंच अधिकार्याच्या साह्याने कवायती लष्करी फलटनी तयार केल्या. डी-बाँय, रानेखान, आंबुजी इंगळे, खंडेराव रायाजी पाटील, वगैरे आपल्या सरदारांच्या नियंत्रणाखाली फौज तैनात ठेवली. लष्कराचा तळ उज्जैन व आग्रा येथे पडलेला असे. स्वतः महादजींनी दारुगोळा व तोफा ओतण्याचा कारखाना आग्रा येथे चालू केला होता व त्याच्यावर सँगस्टर नावाचा परदेशी तज्ञ अधिकारी नेमल्याचे दिसुन येते.
८)परकीय धोरण- महादजी शिंदे यांनी वाँरन हेस्टींग्ज होता तोपर्यत इंग्रजां मांडलिक ठेवल्याचे दिसुन येते. नंतर मात्र त्यांनी इग्रजांना भारतातुन घालवुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला दिसुन येतो. टिपू सारख्या इंग्रजांच्या बळकट शत्रूचा नाश होऊ नये असे महादजींना मनोमन वाटे. महादजीनी फ्रेंचाबरोबर तटस्थ धोरण स्वीकारल्याचे दिसुन येते.
९)महादजी गुणांचे पारखे- महादजी गुणांचे चाहते होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अधिकार्यांचा उदय झाला. डी-बाँय, लखबा दादा, राणेखान, जगूबापू, आप्पा खंडेराव, अंबुजी इंगळे, जिवबा दादा वगैरे मंडळीतील गुण महादजींनी ओळखले व त्यांना आपल्या पदरी ठेवले.
१०)संगीताची आवड- महादजींना संगिताची आवड होती. त्यांच्या पदरी बीनकर महम्मद जमान सारखे सुरेख व उत्तमरितीने वाद्ये वाजवणारे संगितकार होते.अशा प्रकारे तलवार बहाद्दर, मुसद्दी राजनीती, कवी इत्यादी एकाच व्यक्तीत अनेक गुण असे महादजी शिंदे यांचे व्यक्तीमत्व असल्याचे दिसुन येते.
साभार शिंदे सरकार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...