मराठे महाराष्ट्र सोडून इतक्या लांबच्या प्रदेशात उत्तर हिंदुस्तानात का गेले ?
पानिपतचा रणसंग्राम
सांभार :मुकुंद पायगुडे (सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज )
भाग ३
मराठ्यांनी पानिपतला आपली छावणी केली. पानिपतच्या छावणीची रचना अतिशय बळकट होती. पानिपत गावाला जुना खंदक होता तो मराठ्यांनी साफ केला. त्याची खोली वाढवली. त्याच्या काठावर मातीविटांचे धमधमे बांधून लांब पाल्याच्या तोफा त्यावर चढविल्या. सैन्याच्या गोलाकार रचना करून परिघावर सशस्र पहारा ठेवला.सशस्र सैनिकांच्या आत कुटुंब,बाजारभुवने ठेवले. अब्दाली हा कसलेला सेनापती होता त्याने मराठी सैन्याला दाणागोटा रसद पुरविणाऱ्या सरदार गोविंदपंत बुंदेल यांना रोखून ठार मारले. त्याच्या सैन्याचा पराभव केला. मराठ्यांची रसद बंद झाली.
दरम्यानच्या काळात लहान,मोठ्या चकमकी होत होत्या. अशाच एका चकमकीत सरदार बळवंतराव महेंदळे कामी आले.त्यांच्या पत्नी पानिपतावर सती गेल्या. रसद बंद झाल्यामुळे मराठ्यांच्या उपासमारीला सुरवात झाली.डिसेंबर,जानेवारी हे कडक थंडीचे महिने. त्या वर्षी पाऊस जोरदार पडला होता त्यामुळे बोचरे वारे निर्माण झाले होते.त्यातच घोडयांना वैरणपाणी,सैन्याला अन्न मिळेनासे झाले. उपासमारीने सैन्यावर मोठा प्रसंग ओढवला.१३ जानेवारी १७६१ रोजी सर्व मराठे सरदारांनी भाऊसाहेबांजवळ आपल्या दैन्याअवस्थेचे कथन केले. उपाशी मरण्यापेक्षा युद्धात लढून मेल्याचे परवडेल असा निर्धार सर्व सैन्याने केला .
पानिपतचा घनखोर संग्राम : पौष शुद्ध अष्टमी,१४ जानेवारी १७६१ सकाळ होताच मराठे शस्रसज्ज होऊन रणात उतरले. मराठ्यांनी गोलाच्या लढाईचा अवलंब केला होता. भाऊसाहेब साठ हजार स्वारांनिशी पूर्वेस,विश्वासराव पेशवे वीस हजार फौजेनिशी,डावेबाजूस मल्हारराव होळकर आपल्या पन्नास हजार फौजेनिशी,पश्चिमेस जनकोजी शिंदे पन्नास हजार फौजेसह,उत्तरेस इब्राहिम खान गारदी आपल्या तोफांबरोबर आठ हजार पायदळासह व इतर सर्व सरदार आपल्या सैन्यसह रणात तयार झाले. इब्राहिम खानच्या तोफांनी ठरविल्याप्रमाणे अब्दालीच्या सैन्यावर प्रथम भडीमार केला त्यामुळे त्याच्या सैन्याची दाणादाण उडाली.सैन्य सैरभैर झाले हे पाहून गोल मोडून सरदार विंचुरकर व दमाजी गायकवाड शत्रूवर तुटून पडले. तुंबळ युद्ध झाले. मराठ्यांनी सरशी झाली.पण हिमखानाचा तोफखाना गोल मोडल्यामुळे बंद पडला. दुपारनंतर सूर्याची दिशा बदलली. दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. सूर्याची किरणे मराठ्यांच्या घोड्यांच्या डोळ्यावर आणि सैनिकांवर पडू लागली त्यामुळे लढाईत अडथळा निर्माण झाला. घोडी माना टाकू लागली. त्यातच शत्रूचा जोर वाढला. खासे विश्वासराव गोळी लागून अंबारीत पडले.आपला सेनापती अंबारीत दिसत नाही हे पाहून सैन्य सैरभैर झाले. पराभव दिसू लागला. भाऊसाहेब व इतर काही सरदार घोड्यावरून पायउतार होऊन दोन्ही हाती पट्टे घेऊन गर्दीत मिसळले. निशाणापाशी गर्दी झाली. जनकोजी शिंदे या वीराने निशाणा वाचविण्यासाठी अभिमन्युप्रमाणे पराक्रम केला. भाऊसाहेब गर्दीत मिसळून दिसेनासे झाले. मरता मरता शत्रूला मारावे हा पुरातन क्षत्रिय धर्म मराठ्यांनी पानिपतच्या भूमीवर पाळला
No comments:
Post a Comment