विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठे महाराष्ट्र सोडून इतक्या लांबच्या प्रदेशात उत्तर हिंदुस्तानात का गेले ?भाग २

 

मराठे महाराष्ट्र सोडून इतक्या लांबच्या प्रदेशात उत्तर हिंदुस्तानात का गेले ?
पानिपतचा रणसंग्राम
सांभार :मुकुंद पायगुडे (सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज )

भाग २
याच सुमारास दक्षिणेत मराठी सैन्याने उदगीर येथे निजामाचा पराभव केला होता. त्या आनंदात मराठी सैन्य असतानाच दत्ताजींच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. यापूर्वी जयाप्पा शिंदे याचा खून होऊन तो हि राष्ट्रकार्यास कामास आला. आता मात्र उत्तरेस मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित होणे गरजेचे होते. उदगीरच्या लढाईत विशेष प्रसिद्ध झालेले सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे यांना उत्तरेकडे पाठवण्याचे ठरवले. त्यांच्याबरोबर नानासाहेबांनी आपला पुत्र विश्वासराव यास सेनापती नेमून त्याच्या हाताखाली मराठी सैन्य पाठविले. भाऊसाहेबांनी १० मार्च,१७६० रोजी परतुडहुन उत्तरेकडे प्रयाण केले. या सैन्यात अनेक शूर वीर सरदार सामील झाले. बळवंतराव महेंदळे,समशेर बहाद्दर,सदाशिव पुरंदरे,अंताजी माणकेश्वर,विठ्ठल शिवदेव विंचुरकर,नारोशंकर,दामाजी गायकवाड,यशवंतराव पवार, खंडेराव नाईक निंबाळकर ,तुकोजी पवार,अप्पाजी जाधवराव,नारायणराव मोहिते,सोनाजी भापकर,तान्हाजी खराडे,मानसिंगराव बांडे,कदम,शितोळे,ढमढेरे,शिरोळे तसेच ज्यांच्या तोफखान्यामुळे उदगीरच्या लढाईत विजय मिळाला ते सरदार इब्राहिम खान हे आपल्या तोफखान्यांबरोबर नऊ हजार स्वरांबरोबर होते. काही सरदार मंडळी आपल्या कुटुंबकविल्यासह व सैन्यासाठी आवश्यक बाजारबुणगे हे हि होते . या सर्वांची गोळाबेरीज तीन लक्ष इतकी होती. पुढे दिल्लीजवळ मल्हारराव होळकर हे येऊन मिळाले.
औरंगाबाद,बऱ्हानपूर,ग्वाल्हेर,चंबळ ,आग्रा,मथुरा मार्गे भाऊसाहेब दिल्लीत दाखल झाले. लगेचच मराठ्यांनी दिल्लीच्या किल्ल्यावर कब्जा मिळविला. ता.२ ऑगस्ट १७६० पुढे पावसाळा सुरु झाला. यावेळी अब्दाली अनुप शहर येथे होता. दसऱ्यानंतर नारोशंकर यास दिल्लीस ठेऊन भाऊसाहेब पुढे गेले. अब्दाली हा यमुने पलीकडे होता. १७ ऑक्टोबर १७६० रोजी दिल्लीच्या उत्तरेस ७८ मैलांवर कुंजपुरा या ठाण्यावर भाऊसाहेब चालून गेले. तेथील सुभेदार निजाबतखान हा दत्ताजीच्या मृत्यूस कारणीभूत होता. त्याच्यावर हि स्वारी केली.इब्राहिम खानच्या तोफांच्या माऱ्यामुळे कुंजपुरा नेस्तनाबूत झाले व कुंजपुरा ठाणे मराठ्यांनी ताब्यात घेतले. याच वेळी यमुनेस पूर आल्यामुळेअब्दालीचे सैन्य पलीकडे काठावर अडकून पडले होते.पण अब्दाली यमुनेस कोठे उतार मिळतो का याचा शोध घेत बागपतजवळ आला. गुलाबसिंग गुजर हा स्थानिक रहिवासी अब्दालीच्या वाटाड्या झाला.त्याला तेथील भौगोलिक स्थितिची उत्तम माहिती होती.बागपतच्या उत्तरेस गौरीपूर पनवडी या ठिकाणी तो अब्दालीस घेऊन आला. तेथे त्याने उताराची जागा दाखवली. तेथून अब्दाली आपल्या सर्व सैन्यासह तीन,चार दिवसात यमुना पार होऊन अलीकडे आला. हि बातमी भाऊसाहेबास कळताच ते सर्व सैन्यासह पस्तीस मैलावरील पानिपत या गावी आले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...