*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*
लेखन : फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
*कारभाटले येथील समाधीस्थाने*
पन्हाळा सुभ्याचा लष्करी बंदोबस्त म्हाळोजीबाबांकडे असल्याने आणि प्रचितगड हा पन्हाळा सुभ्यात असल्याने छत्रपती शंभूराजांच्या संरक्षणासाठी
असलेल्या हुजुरातीच्या फौजेत प्रचितगड व कारभाटले येथील घोरपडे मंडळींचाही समावेश असणे साहजिकच आहे. म्हाळोजीबाबांबरोबरच यातील काही घोरपडे मंडळी संगमेश्वराच्या लढाईत ठार झाली असावीत.पण यांची नावे उपलब्ध नाहीत. संगमेश्वरची ही लढाई झाली तिथून कारभाटले गाव जवळच आहे.
चिपळूण-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण आहे. संगमेश्वर गावातून पूर्वेला गेलेल्या रस्त्यावर १० कि.मी. अंतरावर कारभाटले हे गाव आहे. हाच रस्ता पुढे नायरी गावावरून शृंगारपूरला पोहोचतो. शृंगारपूरहून प्रचितगडावर जायची वाट आहे.
कारभाटले गावाच्या दोन वाड्या आहेत. पहिली घोरपडेवाडी व दुसरी पवारवाडी. रस्त्याच्या दक्षिणेला चढावरती घोरपडेवाडी व उत्तरेला उतरतीवरती पवारवाडी वसलेली आहे. घोरपडेवाडीत ग्रामदैवत काळीसरी देवीचे मंदिर आहे. पवारवाडीत पवारांचे वेगळे ग्रामदैवत काळीसरीचेच मंदिर आहे. घोरपडेवाडीत ४०-४५ घरे आहेत. एक दोन अपवाद वगळता सर्व घरे घोरपडे यांचीच आहेत.लोकसंख्या अंदाजे ३०० असावी.
शिवकाळात प्रचितगड हा या भागातील प्रमुख किल्ला होता. प्रचितगडावरील शिवकालीन
सैन्यात घोरपडेंचा समावेश असून ते शिवकाळातच सातारा जिल्ह्यातील वेणेगाव येथून येऊन घोरपडेवाडीत स्थायिक झाल्याची परंपरागत माहिती मिळते.
म्हाळोजीबाबा शहाजीराजांच्या काळापासूनच पन्हाळा सुभ्याचे माहितगार असल्याने छत्रपती शंभूराजांच्या काळात या भागाच्या लष्करी बंदोबस्ताची जबाबदारी सरनोबत या नात्याने
म्हाळोजीबाबांकडेच होती. तसेच घोरपडेवाडीतील त्यांच्या भाऊबंदांपैकी अनेक घोरपडे त्यांच्या पन्हाळ्यावरील सैन्यात व प्रचितगडावरील शिबंदीत असावेत. कारभाटले गावची पाटीलकी ही सुद्धा पूर्वापार घोरपडेंकडे चालत आलेली आहे.
घोरपडेवाडीतील ग्रामदैवत काळीसरीदेवीच्या कौलारू, जुन्या व प्रशस्त मंदिराच्या आवारातच मंदिराच्या उजव्या बाजूला काहीशा चढावर पाच शिवकालीन समाध्या आहेत. साधारणपणे साडेपाच फूट बाय साडेपाच फूट या मापाच्या व अडीच फूट उंचीच्या या समाध्या आहेत. दगडाचे मोठे पाटे व चौकोनी दगड रचून या समाध्या बांधलेल्या आहेत. समाध्यांवर दिवा लावण्यासाठी दगडी देवळ्या असून यापैकी सर्वात पुढील समाधी ही सरनौबत म्हाळोजीबाबांची समाधी म्हणून ग्रामस्थाना परिचित आहे. या समाधीच्या दगडी देवळीत दगडाचाच छोटा निरांजनासारखा दिवा आहे. इतर समाधीस्थानांपेक्षा ही दगडी देवळी व दिवा वेगळ्या घडणीचा आहे.
देवीचे नवरात्र, जत्रा व गावातील इतर सणांच्या वेळी या समाध्यांना नैवेद्य दाखविला जातो. काळीसरीदेवीच्या मंदिरात स्थापनेच्या वेळच्या मूर्ती असून यापैकी उजवीकडील मूर्ती वरदायिनी मातेची (भवानी), मधील जुगाईदेवीची तर डावीकडील काळीसरी देवीची आहे.
म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वीपासूनच घोरपड्यांची वस्ती येथे आहे. त्यामुळे समाध्यांचा काळ देवीस्थापनेनंतरचा ठरतो. देवीचे स्थान इथे असल्यामुळेच नित्यपूजेसाठी समाध्या मंदिराशेजारी बांधण्यात आल्या.
घोरपडेवाडीतील ग्रामस्थांच्या पूर्वापार चालत आलेल्या रितींवरून, माहितीवरून व परंपरेने या समाध्या घोरपड्यांच्या असून सर्वात पुढील समाधी ही म्हाळोजीबाबांची समाधी म्हणूनच ओळखली व पूजली जाते. देवी मंदिराशेजारील अगदी महत्त्वाच्या जागेवरूनही याला बळकटी मिळते.
संगमेश्वराच्या लढाईत म्हाळोजीबाबा व इतर सैनिक वीरगती पावल्यानंतर त्यांचे व सैनिकांपैकी घोरपडे घराण्यातील व्यक्तींचे दहन व इतर क्रियाकर्मे ही कारभाटले गावच्या घोरपड्यांनी ते भाऊबंद असल्याने करून त्यांची समाधीस्थाने गावात बांधली असावीत असा निश्चित अंदाज करता येतो.
राहत्या गावी आपल्या पूर्वजांची समाधी बांधण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनच परंपरा आहे. त्यासाठी ग्रामदैवताच्या शेजारचे स्थान सर्वात योग्य मानले जाते. याशिवाय नद्यांच्या संगमावर,परिसरातील प्राचीन मंदिराशेजारी, अथवा इतर पवित्र ठिकाणीसुद्धा समाध्या बांधल्या जात. समाधी बांधताना त्यात मृत व्यक्तीचा अस्थिकलश ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे म्हाळोजीबाबा व त्यांच्यासमवेत मारले गेलेल्या इतर घोरपडे वीरांचे दहन केल्यानंतर त्यांची समाधीस्थाने घोरपड्यांच्या कारभाटले या संगमेश्वरपासून जवळ असलेल्या गावी असणे हे तर्काला धरूनच आहे. नित्यनैमित्तिक पूजा व इतर सोयींसाठी या समाध्या देवीमंदिराशेजारी बांधण्यात आल्या. इतर चार समाधीस्थानेसुद्धा घोरपड्यांचीच असून अद्याप त्यांची नावनिशीवार माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र या सर्व समाध्या एकाच वेळी बांधण्यात आल्या हे बांधकामावरून सहज समजते.
म्हाळोजीबाबांकडे वांगी, भाळवणी, न्हावी, जांब ही गावे होती. मात्र या गावात तसेच संगमेश्वरमध्ये म्हाळोजीबाबांची कुठेही समाधी नाही. कापशी, गजेंद्रगड, दत्तवाड ही गावे अनुक्रमे सेनापती संताजी, बहिर्जी व मालोजी या तीन बंधूना नंतरच्या काळात मिळाल्याने तेथेसुद्धा म्हाळोजीबाबाची समाधी नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे देवीमंदिराशेजारी समाधी बांधण्याएवढे मोठे व महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हाळोजीबाबांशिवाय दुसरे कोणतेही नाही. घोरपड्यांच्या संबंधात या भागात संगमेश्वर लढाईसारखी दुसरी कुठलीही महत्त्वाची घटना म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वी व नंतरसुद्धा घडलेली नाही. त्यामुळे म्हाळोजीबाबांच्या समाधीच्या सत्यतेविषयी खात्री पटते.
शिवपूर्वकाळापासून म्हणजे इ.स.१६०० पासून ते १८१८ मध्ये मराठी साम्राज्य ब्रिटिशांकडून नष्ट केले जाईपर्यंतच्या काळात मराठेशाहीतील शेकडो कर्तबगार, महत्त्वाच्या पदावरील व एखाद्या प्रसंगाने प्रसिद्धी पावलेल्या व्यक्ती मरण पावल्या आहेत. काही लढायांत, काही वृद्ध होऊन तर काही आजारपणाने मृत झाल्या. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरसुद्धा गावोगावी, किल्ल्यांवर, पवित्र ठिकाणी अनेक मराठ्यांची समाधीस्थाने आहेत. लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या , घराण्याचे मूळ पुरुष असलेल्या तसेच विशेष कर्तबगारी दाखवलेल्या व्यक्तींची समाधीस्थाने आवर्जून बांधली जात. लढाईत रणांगणावर आलेला मृत्यू त्याकाळी व आजही सर्वश्रेष्ठ समजला जातो. अशा व्यक्तींच्या कर्तबगारीचे स्मरण म्हणून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच परंपरेने चालत आलेली पितृपूजा, कुलाचार, पूजाविधी करण्यासाठी या समाध्या बांधल्या व पूजल्या जात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यक्तींचे चरित्र माहिती होत जाई.
इ.स.१६०० पासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा (इ.स.१७०७)हा काळ महाराष्ट्रासाठी अतिशय धामधुमीचा होता. त्यामुळे या काळातील बहुसंख्य समाध्यांना कागदोपत्री अगदी काटेकोरपणे समाधीची निश्चिती करणारा पुरावा आढळत नाही. तसेच समाधीच्या पूजाअर्चेसाठी कागदोपत्री काही जमीन अथवा इनाम दिले जाण्याच्या घटना अगदी महत्त्वपूर्ण पदावरील, मोठ्या घराण्यातील तुरळक व्यक्तींच्या बाबतीतच आढळतात. त्यामुळे एखाद्या समाधीस्थानांविषयी त्या व्यक्तींच्या घराण्यातील वंशजाच्या परंपरा, वहिवाट, पूर्वापार चालत आलेली माहिती व त्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रसंगाची व ठिकाणाची कागदपत्रातून आढळणारी त्रोटक माहिती यांच्याआधारेच एखाद्या व्यक्तीचे समाधीस्थान निश्चितपणे सांगता येऊ शकते.
अनेक मोठ्या घराण्यांची त्यांची वेगळी समाधीस्थानासाठी ठेवलेली जागा असूनसुद्धा त्या जागेतील समाध्यांपैकी कोणती समाधी कोणाची हे कागदोपत्री पुराव्याअभावी काटेकोरपणे सांगता येत नाही. मुधोळ मधील घोरपडेंच्या समाधीस्थानांची जागा, गजेंद्रगडकर घोरपडेंची एकत्रितअसणारी समाधीस्थाने, तंजावरच्या राजेभोसले घराण्यातील समाधीस्थाने, साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपतींच्या घराण्यातील समाधीस्थाने इथेही हीच परिस्थिती आहे. पण परंपरेने या समाध्या पुजल्या जात असल्याने कोणती समाधी कोणाची हे ठरवण्यास निश्चित आधार मिळतो.अशाच प्रकारे आपल्या इतिहासातील बहुतांश वीरांची समाधीस्थळे निश्चित झालेली आहेत.
याच अनुषंगाने कारभाटले येथील समाधीस्थळे घोरपडेंचीच असून सर्वात पुढील समाधी ही सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची आहे असा निष्कर्ष खालील मुद्द्यावरून काढता येतो.
१. कारभाटले येथे
ग्रामदैवताच्या मंदिरशेजारी महत्त्वाच्या जागी समाधीस्थाने आहेत.
२. कारभाटले गाव संगमेश्वरच्या जवळ आहे.हे घोरपडेंचे गाव आहे.
३. घोरपडे घराण्याशी संबंधित इतर गावामध्ये कुठेही म्हाळोजीबाबांची समाधी नाही.
४. समाध्यांच्या बांधकामाचे साहित्य व पद्धत शिवकालीन आहेत.
५. कारभाटले ग्रामस्थ पूर्वापार परंपरागत माहितीआधारे ही समाधी म्हाळोजीबाबांचीच असल्याचे
मानतात व नैमित्तिक पूजा करतात.
६. सेनापती संताजीरावांचे थेट वंशज कापशीकर सेनापती राणोजीराजे घोरपडे सरकार यांचीही या गोष्टीला मान्यता आहे.
७. म्हाळोजीबाबांशिवाय इतर कोणतीही इतिहासप्रसिद्ध व समाधी बांधण्याच्या योग्यतेची व्यक्ती दुसरी कुणीही या भागात त्या काळात झालेली नाही.
८. संगमेश्वरच्या लढाईसारखा अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग या लढाईशिवाय दुसरा कोणताही त्यापूर्वी व त्यानंतर या भागात घडलेला नाही.
१०. प्रत्यक्ष छत्रपतींना वाचविताना प्राणार्पण केलेल्या वीरांची समाधीस्थाने बांधली जाणे सहज शक्य गोष्ट आहे.
११. म्हाळोजीबाबा हे सेनापती घोरपडे घराण्याचे मूळ पुरुष असल्याने त्यांची समाधी बांधली जाणे आवश्यकच होते.
वरील सर्व मुद्यावरून या पाचही समाध्या घोरपडे वीरांच्याच असून त्यातील सर्वात पुढील समाधी माळोजीबाबांची आहे असा निष्कर्ष काढता येतो.
No comments:
Post a Comment