पाश्चात्य इतिहासलेखकांनी एक यशस्वी दरोडेखोर म्हणून छत्रपति शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. ग्रॅंड डफसारखे इतिहासकारही या गोष्टीला बळी पडले आहेत असे दृष्टोत्पत्तीला येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रारंभकाळात बादशाही खजिन्यावर आक्रमण करून तो लुटल्यामुळे त्यांना पाश्चात्यांनी दरोडेखोरांच्या सदरात बसविले आहे. पण धनाची स्वार्थासाठी लूट करणारा मनुष्य दरोडेखोर असतो. शिवछत्रपतीच्या परंपरेचा विचार केला तर त्यांची परंपरा राजवंशाची होती हे ध्यानात येते.
कृत्याचे बाह्य स्वरूप जरी दिसावयास एकच असले तरी ते करणार्या व्यक्तीचे स्थान व उदिष्ट यावरूनच त्या कृत्याचे नैतिक अधिष्ठान ठरत असते. या दृष्टीने शिवभारत व राधामाधवविलासचंपू या दोन शिवकालीन ग्रथांवरून छत्रपति शिवाजी महाराज हे राजवंशातील पुरुष होते हे स्पष्ट दिसते. ही माहिती पाश्चात्य लेखकांना नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना व छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यांनी दरोडेखोर ठरविले आहे.
पण शिवाजी महाराजांचा चे आजोबा मालोजी हे राजा होते; शिवरायांचे वडील शहाजी हेही राजे होते; व राजवंशात उत्पन्न झालेल्या शिवरायांनी स्वतःच्या राज्यविस्तारासाठी आपल्या शत्रुराष्ट्रावर हल्ले चढवावयास प्रारंभ केला होता. ही भूमिका ध्यानात घेऊन त्यांच्या स्वकृत्याकडे पाहिले असता त्यांची कृत्ये ही शास्त्रशुद्ध राजनीतीच्या मर्यादेत बसतात हे ध्यानात येईल.
आपल्याला याही पुढे जाऊन असे म्हणावे लागेल की, केवळ राज्यसंस्थापकाहुनही त्यांची भूमिका अनेक पटींनी श्रेष्ठ व उदात्त होती. कुशल राजकारणी व साहसी पुरुष विशिष्ट परिस्थितीचा लाभ घेऊन स्वतंत्र राज्य प्रतिष्ठापना करतात. फ्रान्समध्ये झालेल्या राज्यक्रांतीच्या वातावरणाचा आपल्या बुद्धिमत्तने आणि साहसाने लाभ घेऊन नेपोलियनही सम्राट झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या अंदाधुंदीचा फायदा घेऊन निजाम उल्मुल्काने आपले राज्य दक्षिणेत प्रतिष्ठापित केले, याचप्रमाणे हसन गंगूने बहामनी राज्य निर्माण केले होते. हैदरची दरोडेखोरी तर प्रसिद्धच आहे.
परंतु या वरील सर्वांचे राज्य हे परिस्थितीला प्रतिक्रिया म्हणुन स्थापन झाले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यस्थापना ही बालपणापासून ध्येयवादी होती म्हणुन इतर साहसी व धैर्यशाली राजपुरुषांहुन छत्रपती शिवाजी महाराजांची योग्यता कित्येक पटीने श्रेष्ठ दर्जाची आहे.
No comments:
Post a Comment