विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 May 2021

केसरीवाडा :

 सतत आपल्या दृष्टीसमोर असलेला केसरीवाडा पुण्याचे वैभव आहे. हा राष्ट्रीय ठेवा मी शालेय जीवनापासून आतूनबाहेरून हजारोवेळा अगदी जवळून पाहिला आहे. त्याविषयीचा हा लेखनप्रपंच :

----------'

केसरीवाडा :
टिळक वाडा. गायकवाडवाडा या नावानेही पुण्याच्या नारायण पेठेतील ही वास्तू परिचित आहे. केसरी ही एक चळवळ आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे ते तीर्थक्षेत्र आहे.अशा निष्कर्षापर्यंत मी आलो आहे. संघर्ष आणि रचनात्मक कार्य अशा दोन्ही भूमिका या वाड्याने निभावल्या. काँग्रेसच्या विचारधारेला जसे या वाड्याने वाहून घेतले तितक्याच जोमाने हिंदूमहासभेला पाठबळही या वाड्याने दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी उठविण्यासाठी जिवाचे रानही या वाडयाने केले. दलितांना आधार देण्याचे कामही याच वाडयातून झाले. गोवा मुक्ती आंदोलन असो अथवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो.पैसा फंडाचे संकलन असो अथवा प्लेगची साथ असो. पुण्यातील नीलफलकाचा उपक्रम असो.अथवा वसंत व्याख्यानमाला असो. या वाड्याने नेहेमीच समाजाभिमुख भूमिका घेतल्या. ही वास्तू लोकमान्य टिळक यांनी २७ जानेवारी १९०५ या दिवशी विकत घेतली. प्रत्यक्ष व्यवहार त्या दिवशी झाला असला, तरी राहायला जाण्यापूर्वी तेथील डागडुजी व सुधारणा करणे गरजेचे होते. त्यासाठी काही
महिने लागले. पेशवाईतला हा वाडा श्रीमंत चिमणाबाईसाहेब गायकवाड यांच्या पुण्यातील मुक्कामासाठी बडोद्याच्या सरकारने घेतला होता. खरेदीच्या वेळी रस्त्यावरील सार्वजनिक हौद व त्या शेजारी छपरांचा माळा असलेला दिवाणखाना याखेरीज चांगली वास्तू तिथे नव्हती. दोन्ही दिवाणखाने आतील एका ठेंगण्या माडीने जोडले होते. लाकूडकाम मजबूत असले, तरी मोठा दिवाणखाना ज्यावर होता, ती सगळीच इमारत स्थापत्यशास्त्राप्रमाणे अशास्त्रीय होती. खाली दोन मोठे, मध्ये तीन फूट जाड असलेले सोपे होते. त्यावरील दिवाणखान्याचे दोन्ही बाजूंचे मधले खांब सोप्याचे तुळवंटाचे होते. मध्यावर खांब घेऊन त्यावर छपरांचा भार टाकलेला होता. टिळकांच्या चिरंजीवांनी नंतर माळ्यावर तिसरा मजला बांधला. मोठ्या दिवाणखान्याच्या मागे मध्ये चौक टाकून एक पडवीसारखी वर माळा असलेली कौलारू इमारत होती. ती नोकरांसाठीहोती. या इमारतीच्या पायावरच त्याच्या बाजूच्या भिंती पाच-पाच फूट जाडीच्या होत्या. त्या मजबूत असल्याने तळमजला कायम ठेवून राहण्यासाठी दुमजली घर बांधण्यात आले. त्याला पुणे म्युनिसिपालिटीने २ ऑक्टोबर १९०५ रोजी मान्यता दिली. मागे एक हौद होता. तर बाहेर सार्वजनिक हौद होता. त्यामागे बाग होती. त्यात पार बांधलेला होता व पिंपळाचा भलामोठा वृक्ष होता. संपूर्ण बाग रानवट झाडांची होती. वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर पाठीमागील हद्दीच्या भिंतीजवळ एक विहीर होती. मुख्य दरवाजा उत्तरेकडे होता. रस्त्याकडे मोठा दिवाणखाना, आतील इमारत, हौद व बाग. डाव्या हाताला पूर्वेला म्हणजे दरवाजासमोर दक्षिणेकडे केळी, फणस, आंबे, शेवगा, हदगा, डाळिंब, सीताफळ, जांभूळ, बेल, बोर, बाभूळ, उंबर, पेरू, कडिलिंब, चिंच, चंदन अशी दाट वनराई होती. हिरवा चाफा, सोनचाफा, चमेली, जाई-जुई अशी फुलझाडे होती. काळाच्या ओघात टिळकांच्या वाड्यातील ही सारी वृक्षवल्ली नाहीशी झाली. वाड्याच्या पश्चिम हद्दीकडे पडवीवजा खोल्या होत्या, तर उत्तरेकडे पडवीवजा दुघई खोल्या होत्या. तिन्ही बाजूंना उंच व मजबूत भिंत होती. लोखंडी कठड्याचे दार असलेले तीन दरवाजे होते. वाड्याचे संपूर्ण क्षेत्रफळ सुमारे एक एकर एवढे होते. नारायण पेठेतील हा वाडा त्या काळी कमी वस्तीच्या हद्दीत, जिथे गवळी, मराठे व ब्राह्मणेतर वस्ती होती, तिथे होता. अंत्यविधी करण्यासाठी जवळच ओंकारेश्वर स्मशानभूमी होती. वाड्यावरूनच प्रेते नेण्याचा रस्ता होता; म्हणून कितीतरी दिवस हा वाडा पडीक व विकाऊ होता. त्यामुळे आवारातही रान माजलेले होते. आतील इमारतीत टिळक राहायला येण्यापूर्वी काही दिवस एक इस्पितळ होते. मृतांच्या व भुताखेतांच्या अफवा तिथे पसरत. पिंपळाच्या सान्निध्यामुळे त्याला पुष्टीच मिळायची. अशा स्थितीत ‘ही जागा घेऊ नका. वाडा घ्यायचाच झाला, तर भरवस्तीच्या ब्राह्मणांच्या जागेत घ्या,’ असा सल्ला लोक देत. लोकमान्यांचा भुताखेतांवर व फलज्योतिषावर विश्वास नसल्याने त्यांनी घर, वर्तमानपत्राचे ऑफिस व छापखाना एकाच ठिकाणी असावे, या हेतूने ही वास्तू विकत घेण्याचा निर्णय घेतला. ही जागा टिळकांना मिळू नये म्हणून अनेक उपद्व्यव्यापी मंडळींनी बडोद्याच्या महाराजांकडे बरीच खटपट केली. टिळकांनी वाडा विकत घेतल्यावर प्रथम राहते घर व छापखान्यासाठी इमारती बांधल्या. २३ ऑक्टोबर १९०५ रोजी त्यांना घर बांधायला पुणे म्युनिसिपालिटीने परवानगी दिली. छापखान्यासाठी ३१ मार्च १९०७ या दिवशी परवानगी मिळाली. घर बांधण्यासाठी टिळकांना आठ हजार रुपये, तर छापखान्याची इमारत बांधण्यासाठी त्यांना सात हजार रुपये, असा एकूण पंधरा हजार रुपये खर्च त्या काळी आला. हा वाडा त्यांनी १५,४०० रुपयांना विकत घेतला होता. राहत्या घरात तळमजल्यावर पुढे मध्यभागी ओटी होती. एका बाजूला बाळंतिणीची खोली, तर दुसर्या बाजूला कोठी होती. मधल्या भागात देवघर व माजघर होते. पाठीमागे स्वयंपाकघर, पडवी व स्नानगृह, अशी रचना होती. वरच्या मजल्यावर गच्ची, दिवाणखाना, पार्टीशन व लोकांना भेटण्यासाठी स्वतंत्र खोली होती. ही इमारत गणपतराव शिंदे या कंत्राटदाराने बांधली. स्वंयपाकघरातून वरच्या मजल्यावर जाणारा वाटोळा जिना, दोन दिवाणखान्यांना १५ फुटांचा लाकडी चौक, त्यात आगगाडीच्या डब्याप्रमाणे दोन्ही दिवाणखान्यांना प्रकाश देणारी हंडी अशी खास व्यवस्था होती. पुण्यात त्या काळी विजेचे दिवे आलेले नव्हते; त्यामुळे मेणबत्त्या अथवा गोडेतेल व खोबरेल तेलाचे दिवे लावत असत.
घराच्या रंगाबाबतही लोकमान्य टिळक काटेकोर होते. गूळ, सरस व भाताची पेज यापासून बनविलेला हिरवा व गुलाबी रंग हे आधुनिकतेचे लक्षण होते. टिळकांनी हेच रंग घराला लावून घेतले. बांधकाम पाहण्यासाठी ते रोज विंचुरकर वाड्यातून या वाड्यात येत. या वाड्याचा पहिला रखवालदार भुताच्या भीतीने वेडा झाला होता, असे संदर्भ वाचायला मिळतात. वाड्याच्या मुख्य दरवाजाला दोन बाजूंना दोन देवड्या होत्या. देवडीवर नगारखान्याची जागा होती. भव्य लाकडी दरवाजा होता. त्यावर तीन फूट जाडीच्या फळ्यांवर खिळे व पत्र्याच्या फुल्या ठोकलेल्या होत्या. उजवीकडे एक दिंडी होती.
एका अर्थाने लोकमान्यांचा हा राजवाडाच होता. गृहप्रवेश करताना रथावर पालखी, त्यात चंदनी करंडक व टिळकांचा परिवार स्थानापन्न झालेला. अशा ऐश्वर्यसंपन्न थाटात टिळक या ऐतिहासिक वास्तूत आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी घेऊन आलेल्या गाडीने या महान राष्ट्रपुरुषाला अखेरचा निरोप दिला. टिळकांच्या निधनानंतर ‘लोकमान्य टिळक मंदिर’ असे नाव या वाड्याला दिले गेेले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची ही साक्ष आज मात्र बदललेल्या स्वरूपात उभी आहे. चळवळींचे माहेरघर म्हणूनच ही वास्तू नावारूपाला आली. आज या वाड्यात लेखणीचे युद्ध खेळणार्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार्या शक्ती एखाद्या जागृत देवस्थानासारख्या वावरताना दिसतात. टिळकांची अभ्यासिका, पुणेरी पगडी, पुणेरी जोडे, त्यांची खुर्ची, टेबल, दौत, टाक, काठी या वस्तू जतन केलेल्या पाहायला मिळतात. हा वाडा पुढे भाग्यवंतांचा ठरला. सेनापती बापट, गंगाधरपंत देशपांडे, शि. म. परांजपे, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले, ज्ञानकोशकार केतकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, रवींद्रनाथ, एम. एन. रॉय, चक्रवर्ती, राजगोपालाचारी, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरहद्द गांधी, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, डॉ. राधाकृष्णन, गोविंद वल्लभ पंत अशा दिग्गजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वाड्याने संपूर्ण देशालाच एक प्रेरणा दिली.म.गांधींनी तर वाड्यात पाऊल ठेवताच तेथील धूळ मस्तकाला लावून या वास्तूला अभिवादन केले होते. न.चिं.म्हणजे तात्यासाहेब केळकर, ज.स.करंदीकर, ग.वि.केतकर, चन्द्रकांत घोरपडे, जयंतराव टिळक अशी महान पत्रकारांची हा वाडा म्हणजे कर्मभूमी ठरली.डाॅ ना.भिं.परूळेकर. श्री. रा. टिकेकर यासारख्या अनेक थोर व्यक्तींना बातमीदारीचा अनुभव या वाड्याने दिला. या वास्तूने १७ डिसेंबर १९१४ रोजी ना.गोपाळ कृष्ण गोखले व टिळक यांचे संवाद ऐकले . या दोन नेत्यांमध्ये काय बोलणे झाले ? याचे त्या काळी सर्वत्र कुतूहल होते. ‘तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका, आजच्या काँग्रेसच्या मंडळींचे तुमचे पटणार नाही,’ असे म्हणताच टिळक गोखले यांना उद्देशून म्हणाले, ‘‘काँग्रेस सर्वांची आहे. ती काही कोण्याएका पक्षाला आंदण दिलेली नाही. मी काँग्रेसमध्ये येणार व काँग्रेस काबीज करणार.’अशा परखड विचारांनी भारलेल्या या वास्तूचे १९३२ मध्ये न. चिं. केळकरांनी नूतनीकरण केले. त्यानंतर पेशवाई थाटाच्या या वाड्याचा कायापालट झाला. तिथे सुसज्ज असे ग्रंथालय आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे नेतृत्व केसरीवाड्याने केले. टिळकांची मुले आणि केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त यांच्यातील वादही या वाड्याने पचविला. नंतर डावीकडचा भाग टिळकांच्या कुटुंबीयांसाठी आणि उजवीकडचा भाग संस्थेसाठी, अशी विभागणी या वास्तूने पाहिली.
या विभागणीनतंर या वाड्याने पुन्हा चळवळींना प्रेरणा दिली. विधान परिषदेचे अध्यक्ष जयंतराव टिळक यांनी १९३०मध्ये या वास्तूत पुन्हा प्रवेश केला. ‘पुनरागमनायच!’ अशा मथळ्याचा लेख त्यानंतर पुढे कितीतरी वर्षांनी लिहून जयंतरावांनी राष्ट्रपुरुषांच्या, लोकमान्यांच्या म्हणजे आजोबांच्या प्रेमाचे भारावून टाकणारे वर्णन लिहिले आहे. पुढे रविकिरण मंडळाचे वास्तव्य या वाड्यात होते. कवी गिरीश, कवी यशवंत, श्री. बा. रानडे, प्रा. ज. नी. कर्वे यांचा सहवास तिला लाभला. लोकमान्यांच्या काळात या वाड्याभोवती पोलीस असायचे. वाड्याच्या पुढच्या बाजूला हिंदू भांडार हे दुकान होते. हिंदुधर्मीयांना लागणार्या वस्तू तिथे मिळायच्या. मादाम कामा यांनी फडकावलेला तिरंगा ध्वज येथील समृद्ध अशा ग्रंथालयात पाहायला मिळतो. अग्रलेखाची भाषांतरे इथून लंडनला जात.आता केसरीचा संपादकीय विभाग व छपाईची तिथे वर्दळ दिसते. वाडा आजही चोवीस तास गजबजलेला दिसतो.
टिळकांच्या अभ्यासिकेची निशाणी आजही तेथे जतन केलेली आहे. त्याचा परिसर मात्र जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. गोवा मुक्ती आंदोलनात लोकमान्यांपुढे नतमस्तक होऊन हजारो सत्याग्रही इथूनच पणजीला गेले होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या वास्तूतच केंद्रित झाली होती. एस. एम. जोशी, कॉ. डांगे, भाई बागल, आचार्य अत्रे, वा. रा. कोठारी, नाथ पै आदी नेत्यांची त्या वेळी या वाड्यात वर्दळ असायची. पुणे श्रमिक पत्रकार संघाची स्थापना इथेच झाली. दुष्काळ निवारणासाठीही हा वाडा पुढे सरसावला. टिळकांच्या वास्तव्याची साक्ष असलेल्या या वाड्यात स्वातंत्र्यानंतर विरोधी पक्षांचा राबता असायचा. आता काँग्रेसी विचारांची माणसे येथे वावरताना दिसतात. या वाड्याची स्मृती राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करायला हवी; परंतु तसे होण्याची चिन्हे मात्र अद्याप दिसत नाहीत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून इतिहासात केसरीवाडा अजरामर झाला आहे. लोकमान्यांच्या पश्चात गेल्या शंभर वर्षांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा वारसा या वास्तूने पुढे चालू ठेवला आहे. या वास्तूने काळाप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वात बदल करून घेतले. एकविसाव्या शतकाकडे झेप घेताना या वास्तूने पुढच्या शंभर वर्षांची तजवीज करून ठेवल्याचे आढळते. बाहेरचे दर्शनी स्वरूप बदलून तिथे आता पाच मजली भव्य इमारत उभी आहे. रस्त्याच्या दर्शनी भागात निरनिराळी दुकाने थाटून या वास्तूने स्वतःचा कायापालट केला आहे. पहिल्या व दुसर्या मजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची कार्यालये, तिसर्या मजल्यावर ‘केसरी’चे कार्यालय या इमारतीत थाटले गेले आहे. पूर्वेच्या बाजूला टिळकांचे वशंज राहतात, तर पश्चिमेला समृद्ध असे ग्रंथालय या आवारात पाहायला मिळते. मधले भव्य अंगण, लोकमान्यांचा पुतळा ही वैशिष्ट्ये कायम ठेवून १९९६मध्ये या वास्तूच्या आतील भागाचे नूतनीकरण सुरू झाले. तिथे विद्वानांचा राबता आजही कायम आहे. केसरीवाड्याला माझे कोटी कोटी प्रणाम.
विकास वाळुंजकर
ज्येष्ठ पत्रकार पुणे.
9422020981
Vikasvalunjkar@gmail.com

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...