म्हणजेच
महिंदपुर(जि.उज्जेन) येथील दि.२० डिसेंबर १८१७ ची होळकर-इंग्रज लढाई.....
तृतीय मराठा-इंग्रज युद्ध हे महाराष्ट्रामध्ये नियोजीत होते. या युद्धामध्ये हिंदवी स्वराज्यातील प्रमुख तीन घराणी व त्यांचे प्रमुख-उपप्रमुख सरदार सामील होणार होते. प्रमुख तीन घराण्यामध्ये पुण्याचे पेशवे, इंदौरचे होळकर व नागपूरचे भोसले होते. मात्र इंग्रजांनी या युद्धात रडीचा डाव आखला व होळकर आणि भोसले यांना पुण्याला न येऊ देता त्यांच्याशी स्वतंत्र युद्ध पुकारले. सीताबर्डी(नागपूर) येथे दि.२६-२७ नोव्हेंबर १८१७ ला भोसले-इंग्रज लढाई, महिंदपुर(मध्यप्रदेश) येथे १९-२० डिसेंबर १८१७ ला होळकर-इंग्रज लढाई व कोरेगाव(पुणे) येथे दि.१ जानेवारी १८१८ ला पेशवे-इंग्रज लढाई झाली.
१९ डिसेंबर १८१७ ला दिवस मावळणींला आला होता म्हणून सारे होळकर सैन्य या दिवशी किल्ले महिंदपुर येथे मुक्कमी होते. होळकरांचा सरदार गफुरखान हा घरचा भेदी इंग्रजांच्या गळाला लागला होता. त्याला इंग्रजांनी होळकरांचा जावरा(जि.रतलाम,मध्यप्रदेश) हा परगणा देण्याची कबुली दिली होती. त्याने १९ डिसेंबर ला सायंकाळी ही संधी साधली व महालात अचानक श्रीमंत तुळसाराणीना गुप्त निरोप धाडून क्षिप्रा नदीच्या गऊ घाटावर महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी एकटे यावे असे सांगितले. क्षिप्रा नदीच्या काठी श्रीमंत तुळसाराणी एकट्या आल्या व त्यांचा विश्वास घाताने तुरंत शिरच्छेद करुन ठार मारले. त्यांच्या प्रेताचे तुकडे करून क्षिप्रा नदीत फेकुन देण्यात आले. या घटनेची खुस-पूस काही तासाने लगेच होळकरांच्या छावणीत लागली मात्र त्यांचा खून कोणी केला हे कुणालाच माहित नव्हते. सर्वांचा समज झाला की इंग्रजांनी आपल्या छावणीत येऊन खून केला आणि याच रात्री खऱ्या अर्थाने तृतीय मराठा-इंग्रज युद्धातील दुसरी लढाई म्हणजेच महिंदपुरची होळकर-इंग्रज लढाई सुरु झाली. दोन्ही बाजूच्या सॆन्याने एकमेकांवर तोफाने मारा करण्यास सुरुवात केली मात्र थेट लढाईला सुरुवात झाली नाही कारण त्यावेळेला खूप अंधार होता तसेच त्या रात्री पाऊस हि असल्यामुळे क्षिप्रा नदी दुथडी भरून वाहत होती. क्षिप्रा नदीच्या एका तटावर होळकर सेन्य होते तर दुसऱ्या तटावर इंग्रज सेन्य होते. हे दोन्ही सेन्य दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबरला ऐकमेकांना समोर लढाईला उभे राहिले आणि पाहताच क्षणी महिंदपुर येथे होळकर-इंग्रज लढाईला प्रत्यकक्षात सुरुवात झाली.
या लढाईत १२ वर्षाचे श्रीमंत महाराज मल्हारराव होळकर(दुसरे), श्रीमंत भीमाबाई, सरदार हरिराव होळकर, सरदार तात्या जोग यांच्या सहित शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ लढत होते. २० वर्षाच्या श्रीमंत भीमाबाई या १५ हजार घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या व त्यांनी या लढाईत अविस्मरणीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधीत केले होते. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. श्रीमंत भीमाबाई अभूतपूर्व सैन्य संचलन, शस्ञ संचलन व युद्ध संचलन करून सेनेत जोश भरत होती. ब्रिटीश सेनेचे नेतृत्व प्रचंड अनुभवी व भारतात दरारा असलेल्या कर्नल माल्कम, कमांडर टॉम्स हिस्लाप आणि मेजर हंट यांच्याकडे होते. भिषण युद्ध सुरु होते. होळकर सेना ब्रिटीश सेनेवर तुटून पडली होती. श्रीमंत मल्हारराव हत्तीवर बसून लढाई करत सैनिकांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवत होते. श्रीमंत भीमाबाईने घोड्याची लगाम दातात धरली. दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटीश सैन्यांना कापून काढत होती. श्रीमंत भीमाबाईच्या शौर्याचा संदेश एका ब्रिटीश सैनिकाने मेजर हंटला कळविला. तो एकून आश्चर्यचकीत झाला आणि लगेच श्रीमंत भीमाबाईच्या दिशेने यायला लागला. विजेसमान कडाडत आणि शेरणीसारखी दाहडत श्रीमंत भीमाबाई ब्रिटीश सैन्याचे मुडदे पाडतांना पाहून युद्धाचा प्रचंड अनुभव असणा-या मेजर हंटची पाचावर धारणा बसली. मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून सिंहगर्जना करत अश्वरूढ श्रीमंत भीमाबाई प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंट वर वार केला. हंटने कसाबसा तो वार बचावण्याचा प्रयत्न केला. हातातली तलवार बाजूला पडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेला हंट कसाबसा जीव वाचऊन पळून गेला मात्र काही प्रमुख इंग्रज अधिकारी आपल्या जीवाला मुकले. दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्यामुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते. अशा प्रकारे २० डिसेंबरच्या महिंदपुर येथील लढाईत होळकर सेना पराभूत होऊन श्रीमंत भीमाबाई, श्रीमंत मल्हारराव, सरदार तात्या जोग आदी. नि किल्ले अलोटच्या दिशेने पलायन केले. या लढाईत होळकरांचे ३००० सेन्य व श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर शहिद झाल्या तर इंग्रजांचे १७४ सेन्य मृत, ६०४ सेन्य गंभीर जखमी व प्रमुख ९ इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ९ इंग्रज अधिकाऱ्यांची क्षिप्रा नदीच्या पलीकडील दुबली गावात(ता.महिंदपुर जि.उज्जेन,म.प्र) सामायिक कब्र आहे. वास्तविक खिश्चन लोक एका व्यक्तीसाठी एक कब्र बनवत असतात मात्र हि लढाई खूप भयानक होती म्हणून भयभीत होऊन इंग्रजांनी एकच कब्र ९ इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बनवली. ते ९ जण पुढील प्रमाणे होते, १.डोनाल्ड मेकालियान(सेना प्रमुख), २.लेफ्टिनेंट चार्ल्स कोलोेमन(मद्रास यूरोपियन रेजीमेंट्स), ३.लेफ्टिनेंट हेनकोम(मद्रास यूरोपियन रेजीमेंट्स), ४.लेफ्टिनेंट ग्लेन(थर्ड पी.एल.आई), ५.कैप्टन मार्टन(रायफल क्राॅस), ६.लेफ्टिनेंट शहनाहन(रायफल क्रॉस), ७.लेफ्टिनेंट कोर्न(रायफल क्राॅस), ८.लेफ्टिनेंट गिबिंस(सेकंड बटालियन रेजीमेंट्स), ९.लेफ्टिनेंट जाॅन गिबिंगस(आॅफिसर थर्ड डिविजन). या लढाईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे होळकर-इंग्रज दोन्ही सेन्याकडून रॉकेटचा उपयोग केला गेला. रुद्रखेडा(ता.महिंदपुर जि.उज्जेन,म.प्र) या गावात आजही ते स्टीलचा ढाचा पाहावयास मिळतो.
पुढे ६ जानेवारी १८१८ ला श्रीमंत कृष्णाबाई(केसराबाई) होळकर यांनी श्रीमंत मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या वतीने इंग्रजांबरोबर तह केला. हा तह शिंदेशाहीच्या किल्ले मंदसोर येथे झाला होता म्हणून हा तह "मंदसोरचा तह" या नावाने प्रसिद्ध आहे. या तहानंतर श्रीमंत कृष्णाबाई होळकर या भानपुरा हुन इंदोर येथे वास्तव्यास आल्या व त्यांनी पुन्हा इंदोरची राजधानी म्हणून घोषणा केली व भारत देश स्थापन होईपर्यंत राजधानी होती. या अदोगर भानपुरा हि होळकरशाहीची राजधानी होती(तिसरी). त्यांनतर श्रीमंत मल्हारराव, श्रीमंत हरीराव, तात्या जोग आदी. मंडळी इंदोर येथे वास्तव्यास आली मात्र श्रीमंत भीमाबाईचा इंग्रजांशी लढा थांबणार नव्हता. ती आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी चंबळ खोऱ्यात वास्तव्यास होती व पुन्हा इंग्रजांवर चाल करून जाण्याचा तयारीत होती. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी श्रीमंत भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी जहागिरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी श्रीमंत भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन श्रीमंत भीमाबाईच्या सर्वनाशासाठी श्रीमंत भीमाबाईचा माग काढत होता, पण श्रीमंत भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. श्रीमंत भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटी पणाचा आश्रय घेतला. त्याने श्रीमंत भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. श्रीमंत भीमाबाईचा तळ किल्ले धार नजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला श्रीमंत भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ श्रीमंत भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. श्रीमंत भीमाबाईला कैद करण्यात आले व रामपुरा येथील गढीत कायमचे बंदिस्त करण्यात आले. असा खऱ्या अर्थाने तृतीय मराठा-इंग्रज युद्धातील महिंदपुर लढाईचा शेवट झाला असे म्हणायला काही हरकत नाही.
पुढे ४० वर्षांनी, नोव्हेंबर १८५८ मद्धे रामपुरा येथील गढीतच श्रीमंत भीमाबाईचा म्रुत्यु झाला आणि टोंक(राजस्थान) व जावरा(मध्यप्रदेश) हे हिंदवी स्वराज्यातील होळकरशाहीचे २ परगणे ब्रिटिश साम्राज्यात नवीन मुस्लिम राज्य म्हणून उदयास आले.
संकलन : होळकर राजघराण (facebook page)
फोटो आभार : श्री.गौरव सोनगरा(महिंदपुर)
माहिती आभार : १].श्री.आर.सी. ठाकूर(इतिहास संशोधक,महिंदपुर), २].श्री.होमेश भुजाडे(इतिहास संशोधक,नागपूर), ३].श्री.संजय सोनवणी(इतिहास संशोधक,पुणे), ४].दैनिक भास्कर.
To Join( Like ) Page #होळकर राजघराhttps://xn--www-yhh.facebook.com/HolakaraRajagharana
.
No comments:
Post a Comment