शिंदेशाही इतिहासाच्या स्मृती जपणारे ऐतिहासिक
औंध गाव (पुणे)
-------------------------------------------------------
पोस्तसांभार :: ©प्रसाद शिंदे
पुण्याच्या पश्चिमेकडे औंध हे गाव वसलेले आहे.ब्रिटिशकालीन वास्तूखुणा,पुरातन मंदिरे,शिक्षण संस्था,टोलेजंग इमारती त्याचबरोबर गावठाणातील छोट्या पाऊलवाटा,कौलारू घरे व जुने पार पाहून औंधचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.औंध आणि शिंदे घराण्याचे एक अतूट नाते आहे.या ऐतिहासिक औंध गावची पाटीलकी शिंदे सरकारांकडे होती.
माळवाच्या मोहिमेत श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांनी मोठे शौर्य गाजविले,त्याबदल्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी अनेक सरंजाम राणोजीरावांना बहाल केले.लोणी येथील मोकादमी राणोजीरावांना मिळाली होती तसेच तांदुळवाडी,रामपूर ही गावे लष्करी खर्चासाठी राणोजीबाबांना मिळाली होती व औंध गावची पाटीलकी राणोजीरावांनी विकत घेतली होती.सैन्याच्या खर्चासाठी येथून महसुल गोळा केला जात असत.राणोजीरावांचे आणि औंधचे एक घट्ट नाते झाले,उत्तर हिंदुस्थान धाकात ठेवणारे राणोजीबाबा मनाने फार प्रेमळ होते त्यामुळे औंधच्या जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव होता.
राणोजीरावांच्या निधनानंतर औंध गावची पाटीलकी त्यांचे पुत्र तुकोजीराव शिंदे यांना मिळाली.तुकोजीराव हे राणोजीरावांच्या दुसऱ्या पत्नी चिमाबाईसाहेब यांचे पुत्र होते.तुकोजीराव शिंदे हे आपल्या पित्याप्रमाणे शूर व पराक्रमी होते.माळव्यात मराठयांचे बस्तान बसविताना,निजामा विरुद्धच्या लढाईत,वसईच्या मोहिमेत यांसारख्या मोठ्या मोहिमेत त्यांचा सहभाग होता.१४ जानेवारी १७६१ साली पानिपतच्या युद्धात मराठयांची अख्खी एक पिढी गारद झाली त्याचवेळी तुकोजीराव शिंदे पानिपतच्या भूमीवर धारातीर्थी पडले.तुकोजीरावांचा विवाह देवजी ताकपीर यांच्या कन्या लक्ष्मीबाईसाहेब यांच्या सोबत झाला होता.
तुकोजीरावांना केदारजीराव शिंदे,रवलोजीराव शिंदे,आनंदराव शिंदे हे तीन पुत्र होते.
केदारजीराव हे जेष्ठ पुत्र असल्यामुळे औंधच्या कारभाराची सूत्रे त्यांच्या हातात आली.केदारजीरावांचा विवाह शालुबाईसाहेब यांच्याशी झाला. शालुबाईसाहेब या मोठ्या धार्मिकवृत्तीच्या होत्या.केदारजीरावांनी विठ्ठल-रुक्मिणी चे सुंदर मंदिर औंध गावी बांधले.या मंदिराचा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होते.दगडी शिळांमध्ये मंदिराचे बांधकाम केले असून दगडांवरील कोरीवकाम पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय रहात नाही.केदारजीरावांनी मुळा नदी तीरावर घाट बांधुन घेतले.गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन ठिकठिकाणी विहिरी व बारवा बांधून दिल्या.केदारजीराव शिंदे यांनी औंध गावची बरीच सुधारणा करून लोकोपयोगी कामे केली. केदारजीरावांना त्यांचे बंधू रवळोजीराव शिंदे व आनंदराव शिंदे यांनी बरेच सहकार्य केले.
औंध गावी शिंदे सरकारांचा भव्यदिव्य असा टोलेजंग राजवाडा होता.सध्या या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे.गावात आपल्याला बरीच मंदिरे पहायला मिळतात ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर,हनुमान मंदिर,शितलादेवी मंदिर,मरीमाता मंदिर,शिवाईदेवी मंदिर,रानवडे पाटलांचे दत्तमंदिर तसेच शिंदे सरकारांच्या वाड्याच्या पश्चिम दिशेला महादेवाचे एक जुने मंदिर पहायला मिळते.नदी काठावर बांधलेल्या घाटावर रवलोजीराव शिंदे यांची समाधीछत्री आहे.केदारजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी शालुबाईसाहेब यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात तुळशीवृंदावने बांधली आहेत त्यावर कारागिरांनी केलेले सुरेख कोरीव व नक्षीकाम अप्रतिम आहे.याच मंदिराच्या परिसरात केदारजीराव शिंदे व शालुबाईसाहेब शिंदे यांच्या समाध्या आहेत.
आनंदराव शिंदे यांचे पुत्र दौलतराव शिंदे यांना पुढे श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या निधनानंतर दत्तक घेण्यात आले. दौलतराव शिंदे यांनी शिंदे घराण्याचा पराक्रमाचा वारसा पुढे अखंडपणे चालू ठेवून मराठा साम्राज्याची सेवा केली.औंध गावचा अपरिचित इतिहास व शिंदे घराण्याचे औंध गावाशी असणारे नाते आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखातून केला आहे.
---------------------------------------------------------
•संदर्भ-शिंदेशाही इतिहासाची साधने
©प्रसाद शिंदे
•फोटो:-रवलोजी शिंदे छत्री,केदारजी शिंदे आणि शाळूबाई साहेब समाधी,विठ्ठल मंदिर
•फोटो साभार-विराज शिंदे सरकार
No comments:
Post a Comment