विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 June 2021

कोल्हापूर गादीचे छत्रपती शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब यांचे समाधी स्थळ

 शिव छत्रपतींचे वंशज व कोल्हापूर गादीचे छत्रपती यांच्या समाधी स्थळाची दयनीय अवस्था.




कोल्हापूर गादीचे छत्रपती शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब यांचे समाधी स्थळ
पोस्तसांभार :: Abhijeet Shinde इतिहासाची साधने
येवती तालुका मोहोळ या गावी कोल्हापूर गादीचे छत्रपती शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब यांचे समाधी स्थळ आहे. गावातील काही मोजक्याच लोकांना माहित आहे की ही समाधी छत्रपतींच्या वंशजांची आहे. समाधी स्थळाची सध्या दयनीय अवस्था आहे. पूर्वी या ठिकाणी पादुका (समाधी स्थळ) वरती अष्टकोणी चौथरा होता. काळाच्या ओघात याची दुरावस्था होत गेली, हा चौथरा नष्ट होउन गेला. सध्या तिथे फक्त पादुका उघड्यावर आहेत. त्यासमोर कोल्हापूर संस्थानाने बांधलेले शिवमंदिर आहे. त्याची ही अवस्था सध्या दयनीय होत चालली आहे.
वेळीच याकडे लक्ष नाही दिले तर, काही वर्षांनी लोकांना स्मरणातहि राहणार नाही की, या ठिकाणी एका छत्रपतीची समाधी होती.
छत्रपती शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब यांचा जन्म १८०३ साली झाला. ते कोल्हापूर गादीवरती छत्रपती म्हणुन १८२२ साली विराजमान झाले. नुकताच पेशवाईचा अंत झाला होता आणि संपूर्ण देशावरती इंग्रजांचे शासन होते या कालावधीमध्ये ही महाराजांनी इंग्रजांशी संघर्ष केलेला दिसून येतो. त्यांच्या कार्यकाळात इंग्रजांशी दोन महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. तसेच काही संस्थाने होती यांच्याशी त्यांनी लढे दिले आहेत. कोल्हापुर शहरास रंकाळा तलावा मधून नळाद्वारे पाणीपुरवठा प्रथम त्यांच्या कालावधी मध्ये केला गेला. नरसिंहवाडी दत्त मंदिर परिसरात त्यांनी बांधकामे केलेली आहेत. तसेच बऱ्याच मंदिरांसाठी देणग्या दिलेल्या आहेत. अश्या काही मह्त्वपूर्ण घटना त्यांच्या कलावधी मध्ये घडल्या.
आपल्या पुत्रप्राप्तीचा नवस फेडण्यासाठी ते सहकुटुंब आणि राजकबीला घेऊन तुळजापूर दर्शनास जात असताना, त्यांना ज्वर होऊन, २९नोव्हेंबर १८३८या दिवशी त्यांचा मृत्यू येवती मुक्कामी झाला. त्यानंतर त्यांचे अंतिम विधी पंढरपूर मध्ये चंद्रभागे तिरी केले गेले. त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर संस्थानाने हे शिव मंदिर आणि समाधी स्थळासाठी अष्टकोणी चौथरा बांधून दिला होता. याची सध्या या दयनीय अवस्था आहे.
शिवरायांच्या वारसदाराच्या समाधीस्थळाची अशी अवस्था आहे. याबाबत राजघराण्यातील काही व्यक्तींशी पूर्वी बोलणे झाले होते. तरीही याच्या संवर्धना बद्दल काहीही हालचाली झालेल्या नाहीत ही निंदनीय बाब आहे.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....