संतोष चंदने| ऐतिहासिक वाडे व गढी |
वेध इतिहासाचा.
सिंदखेडराजा. जि. बुलढाणा.
सिंदखेडराजा येथे शिवपूर्व काळातील समाजिक, राजकीय व्यवस्थाच्या अनेक पाऊलखुणा पाहायला मिळतात.
सिंदखेडराजा मध्ये महत्वाची वास्तु म्हणजे ज्यात जिजाऊंसाहेबांचा जन्म झाला तो त्यांचे वडील 'लखुजीराजे जाधव यांचा वाडा.'
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांचे सिंदखेड राजा हे जन्मस्थान .त्यांच्या प्रेरणेतून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले होते. ते सिंदखेड राजा स्वराज्य निर्मितीचे स्फूर्तिस्थान व मातृतिर्थ आहे.
सिंदुराजनामक राजाने हे गाव वसविले होते असे सांगितलं जाते. हे गाव ठळक करण्यासाठी राजांचे गाव म्हणून सिंदखेड राजा असे झाले.
मध्ययुगीन काळात येथे बहमनींची सत्ता होती. अलाउद्दीन अहमद या बहमनी सुलतानाने तेथील काजीस १४५० साली हा परगणा जहागीर म्हणून दिला होता. या घराण्याने जवळपास आनेक वर्षे जहागिरी उपभोगली. त्यानंतर सिंदखेड राजाची सूत्रे पराक्रमी जाधव घराण्याकडे आली. या घराण्यातील लखुजी जाधव हे पराक्रमी सरदार होते.
शूर सरदार शहाजीराजे हे लखुजीराव जाधवांचे जावई होते. लखुजीरावांनी १६१४ ते १६२९ दरम्यान कधी मोगल, तर कधी निजामशाही यांची अदलून बदलून चाकरी केली आणि अनेक लढाया जिंकल्या. निजामशाहीत १०,००० घोडेस्वारांच्या तर मोगलांकडे त्यांना १५,००० घोडदळाची मनसबदारी दिली होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीत फतेखान हा त्याचा मुलगा कारभारी झाला परंतु हमीदखान या सरदाराच्या चिथावणीवरुन निजामशाहाने त्यास तुरुंगात टाकले व हमीदखानास कारभारी केले. त्यामुळे इतर सरदारांना धास्ती वाटू लागली. त्यांपैकी लखुजीराव जाधव हे एक होते. त्यांनी मोगलांकडे जाण्याचा बेत आखला. ही बातमी निजामशाहास कळताच त्याने मुजरा करण्यासाठी दरबारात बोलविले आणि त्यांच्यावर अचानक हल्ला केला .या हल्ल्यात लखुजी व त्यांचे राघव, यशवंत व अचलोजी हे तीन मुलगे ठार झाले (१५ जुलै १६२९). पुढे निजामाकडे सत्ता गेल्यानंतर (१७२४) जाधवरावांची जहागीर निजामशाहाच्या अंमलाखाली आली.
संदर्भग्रंथ . मालोजी शहाजी ( वा.सी. बेंद्रे.) .शककर्ते शिवराय. ( देशमुख) .मराठी विश्वकोश.( fb)
अशा या सिंदखेडराजा मध्ये
जेथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, तो लखुजी जाधव यांचा वाडा वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या वारसायादीत आहे. या राजवाड्याची उभारणी १५७६मध्ये पूर्ण झाली. राजवाड्याचे भव्य प्रवेशद्वार तेथील वैभवाची व भक्कमतेची साक्ष देते. दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार तीन मजली आहे. खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षक भिंत असलेला सज्जा आहे. प्रवेशद्वारावर दगडांत कोरलेले तोरण आहे. प्रवेशद्वाराची उंची १२ मीटर आहे. राजवाड्याला भक्कम तटबंदी होती. त्यावर टेहळणीसाठी आवश्यक साधन सामुग्री होती. राजवाड्यात १२ दालने, वैशिष्ट्यपूर्ण तळघर, त्यात हवा येण्यासाठीची व्यवस्था होती. परंतु आता त्यातील अनेक वास्तूंचे केवळ काही अवशेषच व जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यास जुन्या तोफा व इतर साहित्य दिसते. जिजाऊंचा जन्म येथेच या वाड्यात झाला होता. सध्या तेथे एक दगडी खोली असून त्यात जिजाऊ व बालशिवाजीचा पांढरा संगमरवरीचा पुतळा बसविला आहे. दारावर ‘जिजामाता जन्मस्थान’ अशी पाटी आहे.
राजवाड्याच्या आत पाहण्यासाठी तोफा , जाती ,दगडी शिल्प , आनेक मूर्ती आहेत.
येथूनच काही आंतरावर राजे लखुजीराव व त्यांच्या मुलांची समाधी छत्री आहे.
काही अंतरावर जिजाऊं सृष्टि बांधण्यात आली आहे.
संतोष मु चंदने. चिंचवड , पुणे.
No comments:
Post a Comment