"
धनाजीराव जाधवराव यांचे घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे मातुल घराणे होय. जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती .दौलताबाद व सिंदखेडराजा मुलूख इत्यादी भागात त्यांचा दरारा होता. पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखुजीराव जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी ,रघुजी आणि यशवंतराव हे सर्व पुरूष एकाच वेळी मारले गेले .
या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजीराव यांचे पालन-पोषण शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ साहेब यांनी केले .जिजाऊ यांचे जेष्ठ पुत्र संभाजी आणि भाचा संताजीराव हे दोघे समवयस्क होते .ते एकत्र वाढले परंतु दुर्दैवाने ते दोघेही कनकगिरीच्या युद्धात एकदमच मारले गेले .
संताजीराव चा मुलगा शंभूसिंह शिवाजी महाराजांच्या बरोबर असे ते पावनखिंड येथे शाहिद झाले .
अश्या शूरवीर शंभूसिंह यांच्या पोटी 1650 च्या सुमारास धनाजीराव यांचा जन्म राजगड झाला. शिवाजी महाराजांनी सोपवलेल्या ऊमराणी येथील लढाईत धनाजीराव जाधवराव प्रथम महाराजांच्या नजरेस पडले. जिजाऊंच्या संस्कारात तावून सुलाखून निघालेले शंभर नंबरी सोने म्हणजे धनाजीराव जाधवराव .धनाजीराव हे मृदुभाषी ,शांत ,व हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारे ,मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी शिष्टाचाराने वागणारे, राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरविणारे ,मुत्सद्दी सेनानी होते .धनाजीराव जाधवांराव खानदानी मराठे सरदारात प्रमुख समजत .धनाजीराव जाधवराव रावांच्या कर्तबगारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत सुरू झाली असली तरी ,त्यांचा खरा पराक्रम राजाराम महाराज व ताराराणी यांच्या काळातच दिसून आला .धनाजीराव जाधवराव सौम्य प्रकृतीचे असल्यामुळे गोड बोलून कार्य साध्य करून घेत .त्यामुळे हाताखालचे लोक त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत त्यामुळेच राजाराम महाराजांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते .संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाच्या 26 वर्षांच्या कालखंडात सतत लढाया करणारा हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानी होता. धनाजी जाधवराव यांनी शेकडो लढाया केल्या, विजय मिळवले यांची नुसती यादी करायची म्हटली तर पुस्तकाची अनेक पुष्ठे खर्ची पडतील .राजाराम महाराज व ताराराणी यांच्या काळात धनाजीराव जाधवराव एक सारखे धावपळीच्या लढाया करताना दिसून येत. 1700 साली धनाजीराव जाधवराव यांनी 2000 कोसांच्या हालचाली केल्या होत्या .त्यांच्या पाठीमागून धावून धावून झुल्फिकारखाना सारखा मातब्बर सेनानी सुद्धा मेटाकुटीला आला होता. शत्रूवर अचानक छापा टाकावा, सापडेल त्याला कापून काढावे ,लगेच माघार घ्यावी ,रसदी माराव्या, ठाणेदारांना पकडावे अशा गनिमी पद्धतीने धनाजीराव जाधवराव लढत राहिले. त्यामुळे मोगलांच्या छावणीत त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला होता. खुद्द औरंगजेबही धनाजीराव जाधवरावस घाबरून होता .मोगलांची घोडी पाण्यावर घातली असता एखाद्या वेळी पाणी पीत नसत, तेव्हा त्यास पाण्यात संताजी-धनाजी दिसतात की काय असा प्रश्न मोगल सेनानी विचारत असत .हे खुद्द मोगल इतिहासकारांनी त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या पुस्तकात सांगितल्या आहेत .1697 ते 1708 या काळात धनाजीराव जाधवराव सरसेनापती होते .संभाजी महाराज व राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा धनाजीराव जाधवराव यांनी सांभाळली .शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता .राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधवराव यांनी फलटणच्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरी ची लढाई करून रनमस्त खान यांचा पाडाव केला .या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन जयसिंगराव हा किताब दिला .राजाराम महाराज चंदी प्रांतात जाताना जिंजीला धनाजीराव जाधवराव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना सरनोबत हे पद दिले गेले. मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातारला पोहोचले तेव्हा महाराणी ताराराणीने शाहूंचा गादीवरचा हक्क अमान्य केला. 12 जानेवारी 170 8 मध्ये शाहू राजांनी स्वतः साताऱ्यास राज्यभिषेक करविला .त्यावेळी शाहू हेच स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून धनाजीराव जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.धनाजीराव जाधवराव यांना शाहू महाराजांनी सेनापतिपद दिले. पण धनाजीराव जाधवराव यांना हे सेनापतिपद फार दिवस उपभोगता आले नाही. शाहू महाराज विशाळगड व पन्हाळगड मोहिमेवर असता 27जून 1708 मध्ये वारणा नदीच्या काठी वडगाव येथे पायाला जखम होऊन धनाजीराव जाधवराव मृत्यू पावले. अशा या पराक्रमी, "शूर योध्द्याच्या स्मृतीदिनी आमचा मानाचा मुजरा "
शब्दांकन राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव
No comments:
Post a Comment