विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 June 2021

#हांडे_देशमुखांच्या_शोधात




 #हांडे_देशमुखांच्या_शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी माझ्यासकट आमच्या कुटुंबातील व्यक्तींना 'राजे' या नावाने संबोधत असत.त्यामुळे मला सुरूवातीपासुन या गोष्टीबद्दल कुतुहल आणि वाटत होता. त्यामुळे या सर्व ऐतिहासिक गोष्टीत मला रुची होती. या गप्पा सुरू झाल्या की आपोआप माझे कान टवकारले जात.
आमचे आजोबांनी मला सांगितलेल्या गोष्टी,
"शिरुर तालुक्यातील कर्डे हे आमचं मुळगाव. तिथं आज ज्या जागी हायस्कुलची इमारत उभी आहे त्याजागी आमची गढी होती. गढीत मुंजाबा, जेवत्या आणि मारूती अशा देवतांची मंदिरे होती.त्याचबरोबर पाण्यासाठी आड , कैद्यांना डांबुन ठेवण्यासाठी तळघरे देखिल होती. आमचे पणजोबा कै.कोंडीरामराजे यांना विजयादशमीच्या वेळी शमीपुजनाचा मान असायचा.सन १९५२ पर्यंत आमच्या कुटुंबाला पेन्शन मिळत होती.मावळात गेल्यावर पहिल्या पाटाचा मान हांडे देशमुखांना आहे."
या सर्व गोष्टी ऐकल्यामुळे माझ्या मनाला सतत उत्सुकता असायची आपण कोण आहोत ? कुठुन आलो? आपल्या पुर्वजांनी नेमकं काय केलं? याचा शोध घेण्यासाठी वृद्ध व अनुभवी व्यक्तींच्या संपर्कात रहायचो.माझ्या वडिलांच्या जन्मापासून आम्ही मौजे आंबळे गावी वास्तव्य करून आहोत. तिथे आमचा ३६० बिघे म्हणजेच २०८ एकर जमीन देशमुख इनाम आहे. त्याला आजही इनाम या नावाने संबोधतात. थोड्या कळत्या वयात आल्यानंतर मी त्याची कागदपत्रे तहसिल कार्यालयातुन मिळवली.पण मला हवी तशी माहिती मिळत न्हवती. त्याच काळात माझ्याकडे 'स्मार्टफोन' आला , एकप्रकारे संपुर्ण जग माझ्या हातात आलं होतं. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी गुगलवर 'हांडे देशमुख' इंग्रजीत कधी मराठीत शोधत होतो.त्यात मला दोन ठिकाणी संदर्भ मिळाला.त्यातल्या एकात पेशवे दफ्तरातुन माहिती मिळाल्याचा उल्लेख होता. पुन्हा इंटरनेटवर पेशवे दफ्तर शोधलं. तिथं गेल्यानंतर मला जी माहिती त्यातुन मी योग्य रस्त्यावर असल्याचं जाणवलं.हे साल होत २०१७.मी नुकताच १२ वी पास होऊन प्रथम वर्षात गेलो होतो.
माझा आणि मोडी लिपीचा परिचय लहानपणापासूनच होता परंतु आता कागदपत्रांमुळ मोडीची गोडी लागली होती. मी मोबाईल च्या माध्यमातून मोडी शिकलो.आणि त्याच दरम्यान फेसबुकच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी माझा परिचय झाला. त्यांची मला मोठ्या प्रमाणात मदत झाली. श्री संतराज बापु साठे यांच्यामुळे पारसनीस कृत 'सनदपत्रांतील माहिती' या पुस्तकातील हांडे देशमुख कैफियत वाचणात आली आणि बरेच मार्ग मोकळे झाले. आतापर्यंत मिळालेले धागे दोरे जुळु लागले. मला सर्व हांडे देशमुख भावकी एका छताखाली आणायची होती सर्वांचा एकमेकांशी परिचय करून द्यायचा होता. पण संधी मिळत न्हवती. पण त्यात पुणे येथे शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रम होतो आणि तिथं ऐतिहासिक घराण्यांचे रथ समाविष्ट होतात हे कळलं. दुसरीकडे मी फेसबुक वर दिसेल त्या हांडे, देशमुख आणि हांडे देशमुख व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवत होतो. ते माझ्याशी जोडले जात होते. शिवजयंती ला आपल्या घराण्याचा रथ समाविष्ट करायचा हे मनाशी पक्कं केलं आणि सर्व हांडे देशमुख बांधवांच्या अहोरात्र मेहनतीनं साकार झालं. परंतु मी माझ्या शोधात अजुन होतो काय करू? काय नको करू ? हे प्रश्न मला पडत होते. शेवटी मी पुणे पुरालेखागार येथे अभ्यास करण्याची परवानगी मिळवली.तिथुन अनेक रुमालांमधील कागद हाताळले आणि अजुन हाताळायचे बाकी आहेत. तरी वरील जवळपास ५-६ वर्षाच्या काळात थोडी माहिती माझ्याकडे गोळा झाली आहे ती खालीलप्रमाणे
" जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे हांडे परिवाराच मुळगाव. तिथला एक पुरूष देवराव हांडे याने तलवारीच्या जोरावर देशमुखी मिळवली व मौजे नळवणे ता.जुन्नर या गावी कोट बांधुन देशमुखी करू लागला.नळवणे येथेच आमचे कुलदैवत श्री मार्तंड यांचे देवालय आहे. या देवराव हांडे देशमुख याने 'पातशहाची पिछाडी मारली व मालकावर वार केला' अशा प्रकारचा उल्लेख वंशावळींमध्ये आहे. देवराव हांडे देशमुख यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इ.स. १६५७ साली औरंगजेबाचा सरदार मुर्शीदकुलीखान याने जाखोजी मर्जी हांडे देशमुख यांना जुन्नर सरकारमधील १७ तरफांतील ३५९ गावची देशमुखी दिल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शाहु महाराज यांच्या काळात देखिल रायाजी हांडे या लढाऊबाण्याच्या व्यक्तीचा उल्लेख आढळतो. सन १८१८ साली हांडे देशमुख घराण्याकडे ५६२ गावची देशमुखी असल्याचे संदर्भ आहेत आणि ती पुणे , नगर व नाशिक जिल्ह्यात आहेत. त्याचबरोबर मौजे उंब्रज ,मौजे पिंपळगाव जोगा व मौजे रिसे येथील पाटिलक्या हांडे घराण्याकडे होत्या. त्याचबरोबर जुन्नर ,करडे व पुणे पुरालेखागार येथुन वंशावळी प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार माझ्यापर्यंत २४ पिढ्यांची वंशवेल उपलब्ध झाली आहे. मौजे नळवणे येथे देवराव हांडे देशमुख यांची समाधी आहे.तसेच पारनेर व पळवे येथे देखिल समाध्या आहेत"
ही माहिती टाकण्याचा उद्देश असा की अजुनही माझा शोध संपलेला नाही.मला तुमच्या सर्वांच्या मदतीची व मार्गदर्शनाची गरज आहे.
तुम्ही ही पोस्ट वाचली असेल तर कृपया शेअर करा!
✍️ हर्षद रमेश हांडे देशमुख
मो.नं.८२०८५०९१५५
फोटो- १) देवराव हांडे देशमुख समाधी
२) हांडे देशमुख वंशवेल
३) गणपतराव रामचंद्र हांडे देशमुख सरकार जुन्नर

2 comments:

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...