नांगरगाव च तुळापूर झालं
१६३१ च्या अखेरीस महाराष्ट्रातील भीषण दूष्काळ, मोगली फौजेचे हाल यामुळे शहाजहान उत्तरेत परत गेला. निजाम आणि मोगल एक होऊन आदिलशाही नष्ट करण्याच्या तयारीत होते, एकंदरच दख्खनेतील राजकरण संपूर्ण ढवळून निघाले होते. शहाजी राजांनी मुरारपंताशी सल्लामसलत करून एक बुद्धिमत्तेचा डाव खेळला व जीवधन किल्ल्यावरून नवीन निजामशाही स्थापन केली. दख्खनेत आता दोन निजामशाह या अस्तित्वात होत्या. फतेहखानाची दौलताबादची आणि शहाजीराजांची जीवधनची. शहाजी राजांच्या या निजामशाही ला खवासखान व मुरार पंतांचा मनःपूर्वक पाठिंबा होता. शालिवाहन शक १५५५ जेष्ठ वद्य ६ (१७ जून १६३३) मोगल सरदार महाबतखानाने दौलताबादचा किल्ला जिंकला. आदिलशाहीच्या सहाय्याने निजामशाहीचा झेंडा पुन्हा फडकत ठेवण्याचे शहाजीराजांनी ठरवले होते. या कार्याला मुरार पंतांचा संपूर्ण पाठिंबा होता. शालिवाहन शक १५५५ (इस १६३३-३४) शहाजीराजांनी पेमगिरी येथे निजामशहाचा राज्याभिषेक संपन्न केला या निजामशाहीची वजीर शहाजीराजे सांभाळणार होते आणि त्यांना विजापूरच्या सत्तेने पाठिंबा दिलेला होता.
१६३१ च्या त्यानूसार मोगलांकडून आदिलशहास भीमा व नीरा ह्या नद्यांमधला प्रांत मिळाला होता. त्याची व्यवस्था लावण्याचे काम आदिलशहाने मुरार जगदेव यास दिले. या कामगिरीवर जाताना त्याने शहाजीराजे भोसले यांना सोबत घेतले, कारण शिवाजीराजांना या मुलखाची माहिती होती.
शहाजीराजे चतुर, बुद्धिमान, मुत्सद्दी आणि अप्रतिम योद्धा होते, यामुळे च मुरार जगदेवाच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. त्यांनी आदिलशहाकडे शिफारस केली की अशा शूर, धाडसी, युद्धनिपूण व राज्यकार्यधुरंधर व्यक्तीस आपल्या पदरी कायम राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, बढती द्यावी.
१६३३ च्या सुमारास दौलताबाद च्या किल्ल्यावरील मोहिमे नंतर मुर्तजा निजाम शहा याचा पेमगिरी वरील राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर मुरार जगदेव व शहाजीराजे परतत असताना वाटेत सूर्यग्रहण झाले.
(शके १५५५, श्रीमुखनामसंवत्सरी भाद्रपद अमावस्येला २३ सप्टेंबर १६३३)
यावेळी भीमा-इंद्रायणी संगमी नांगरगाव येथे सैन्याचा तळ दिला व पुष्कळ दानधर्म केला. ह्यावेळी मुरारपंताच्या मनात आले की आपण हत्तीची रौप्यतुला करावी व ते रूपे (चांदी) ब्राम्हणांस दान करावी. पण हत्तीची तुला कशी करावी हा प्रश्न समोर उभा राहिला. यावेळी शहाजीराजे यांनी युक्ती सुचवली. हत्तीला होडीत चढवावे, आणि त्याच्या भाराने ती दबले तेथे खूण करावी. मग हत्तीला खाली उतरवून तीत दगड भरावेत, त्या खुणेपर्यंत पाण्यात बुडली म्हणजे ते सगळे दगड काढून वेगवेगळे तोलावे, अशा रीतीने हत्तीचे एकंदर वजन कळेल. ही साधी परंतू कोणालाही न सुचलेली युक्ती राजांनी सुचवली, यावरून मूरारपंताने शहाजीराजांची खूप तारीफ केली. (काही ठिकाणी ही दंतकथा असल्याचे म्हटले जाते) अशा रितीने हत्तीच्या वजनाइतके रूप्याच्या किंमतीचे गाव मुरारपंतांनी ब्राम्हणांस दान दिले.
ही तुला नांगरगाव येथे झाली, यावरून नांगरगाव चे नाव तुळापूर पडले.
या घटनेचे दानपत्र उपलब्ध आहे, या पत्रातील मजकूर संस्कृत भाषेत असून यात धर्मावतारी मुरार जगदेव याने सूर्यग्रहणाच्या वेळी गजदान, अश्वदान गोशतदान करत सोने आणि रूपे चांदी अशा २४ वस्तूंचे तुलादान केले असा उल्लेख पहावयास मिळतो
सोळा ब्राम्हणांना हे दान देण्यात आल्याचा उल्लेख दिसतो आणि या सोळा ब्राह्मणांची नावे ही आपणास या पत्रात पहावयास मिळतात. सोनभट देवगिरीस्त, नरसिंहभट अग्निहोत्री, त्र्यंबकभट नांदुरकर, त्रिंबकभट सुदामे, त्रिंबकभट खेडकर, मानभट तळेगावकर, महादेवभट पुरंदरे, त्रिंबकभट पुराणिक, पुरुषोत्तमभट वैष्णव, मानभट वैष्णव, गोपतिभट ढेरे, अपदेवभट चित्राव, बाल पाठक नाशिककर, रंगनाथभट ग्रामज्योतिषी, सोमनाथभट ग्रामज्योतिषी, पुंडलिक हरिदास पंढरपूरकर या सोळा ब्राम्हणांना हे दान दिल्याचा उल्लेख या दानपत्रात आहे. या दानसोहळ्यासाठी विद्वान, पंडितजनांची चांगलीच दाटी नांगरगावी झाली होती. या अविस्मरणीय तूळादान विधीमुळेच नागंरगावचे नाव पडले, तूळापूर!
संदर्भ
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ क्र ३६३
शककर्ते शिवराय
बसातीन उस सलतीन
क्षत्रियकुलावतंस
संकलन : भारती धोंडे पाटील
जिजाऊंचं स्वराज्य
९६१९९७१४९५
No comments:
Post a Comment