विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 28 June 2021

क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज


 क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज

राज्यामध्ये सगळे लोक। सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्ये धाक। उपजोची नये।
बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।
कष्ट करोनी घसरावे म्लेच्छांवरी।।
(समर्थ रामदासांनी शिवरायांना लिहिलेले पत्र)अंधारलेल्या आणि विस्कळीत हिंदू समाजामध्ये रयतेला कोणीच वाली शिल्लक नव्हता पूर्णतः कोलमडलेली संस्कृती आणि हिंदू हा शब्द तरी कुणाला नंतर लक्षात राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आपापसात भांडत बसलेला इथला समाज बादशहाची कृपा व्हावे यासाठी आपल्या लोकांचा जीव घेण्यास मागेपुढे पाहत नव्हती स्वाभिमान आणि निष्ठा दोन्ही गोष्टी वेशीला टांगल्या गेल्या होत्या. परक्यांसाठीच आपण मरायचे आपल्याच लोकांना मारायचे अशी मानसिकता त्यावेळी झाली होती आपला समाज विखुरला आहे आपली ताकद विभागली आहे त्यामुळे स्वहितासाठी लोक आपसात भांडत आहेत त्यांना एकत्र करून परकीय आक्रमणापुढे खांद्याला खांदा लावून उभे केले पाहिजे अशी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून एका स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहणारा कोणीतरी असावा अशी त्या काळाची गरज होती. आपल्या मातृभूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले पाहिजे ही राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये जागृत करणारा सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या नंतरचे एक महान व्यक्ती म्हणजे शिवराय
शिवरायांचा जन्म हा केवळ सतराव्या शतकातील जुलमी सत्तेची मूळ उखडून टाकण्यासाठी नव्हता तर अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथं आपलंच राज्य पाहिजे ही संकल्पना कुठेतरी अंधारात गेली होती ती पुन्हा उजेडात आणली ती शिवरायांनी. भयभीत आणि गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला अखंड भारत या संकल्पनेचे स्वप्न महाराजांनी दाखवलं, गोरगरीब आणि शेतकरी वर्गाला हाताला धरून स्वतंत्र राज्य स्थापन केला परकीयांची सावली आपल्या प्रखर तेजस्वी पराक्रमाने नेस्तनाबूत करून टाकली
“बादशहाचे बाहुले बनलेले हे पराक्रमी मराठे आता आपल्या राजाच्या पायाची पावले बनली आणि ही पावलं जिथं पडली तिथली जमीन स्वतंत्र झाली”
ज्या पुरुषाला कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रीला मातेसमान मानले, ज्याने स्वधर्मा प्रमाणे परधर्माला आदर दाखवला, ज्याने युद्धामध्ये पाडाव केलेल्या शत्रूच्या लोकांना त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पाठवले, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश रक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली ज्याने सर्वात आधी स्वतः संकटात उडी मारून आपल्या लोकांना स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, अनेक जिवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धी सामर्थ्याने स्वतःचा बचाव केला ज्याने औरंगजेबासारख्या प्रतापी बादशहाचे भगीरथ प्रयत्न सतत तीस वर्षे पावेतो यत्किंचितही चालू दिले नाहीत, इतकेच नव्हे तर तीन राज्यांच्या अखिल भारत खंडात अपूर्व असे स्वतंत्र राज्य स्थापन करून त्याची किरणे पृथ्वीवर अजरामर करून ठेवले त्या प्रताप पुण्यशील थोर योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे…!
संत तुकोबाराय म्हणतात,
वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती।
जाणा त्या निश्चिती देव नाही।।
म्हणजेच निर्वाहाचे साधन म्हणून जे लोक भूमी राज्य द्रव्य यांची प्राप्ती करुन घेतात त्यांना देव निश्चित मिळत नाही असे समजा कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवताना शिवरायांनी स्वातंत्र्याला प्राधान्य दिले कारण समता आणि बंधुता या बद्दल विचार करण्यासाठी स्वातंत्र्य महत्त्वाचे
शिवराय रयतेला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक निर्णय घेत असत सतराव्या शतकातील परिस्थिती पाहिली तर महिलांची सुरक्षितता ही सर्वसामान्यांची सर्वात महत्त्वाची अडचण होती शिवरायांनी सर्वप्रथम महिलांच्या सुरक्षेवर लक्ष दिले आणि म्हणूनच घरातील पुरुष बाहेर पडू शकला व स्वराज्याचा शिलेदार झाला स्वराज्यातील योग्य ती कामे देऊन रोजगार उपलब्ध करून त्यांना वेळेवर पगार देणे हेही तितकेच महत्त्वाचे होते गरीब व सर्वसामान्य लोकांना शिवरायांनी पायदळात घोडदळात आरमार उभारणी मध्ये किल्ल्यांच्या उभारणीमध्ये रस्तेबांधणी मध्ये अशा विविध क्षेत्रात रोजगार दिला आणि पगाराची हमी दिली पगाराच्या हमी वरून तर आदिलशहाच्या पठाणांची टोळी सुद्धा शिवरायांच्या सैन्यात दाखल झाली. पोटात जर भाकरी नसेल तर मनुष्य कोणाचीही चाकरी करायला मागेपुढे पाहत नाही. सभासद बखरीमध्ये शिवरायांच्या लष्कराची संख्या २,०८,२६० एवढी दिली आहे म्हणजेच शिवरायांनी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना रोजगार दिला किंवा एवढ्या कुटुंबांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यापार, आपला पैसा आपल्याच राष्ट्रात राहावा आणि हे करण्यासाठी आपल्या राज्यातील व्यापारी समृद्ध बनले पाहिजेत आपल्या व्यापाऱ्यांना समृद्ध बनण्यासाठी त्यांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे ही बाब शिवरायांनी ओळखली होती शिवरायांनी परदेशी व्यापा-यांना आळा घालून स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले. शिवरायांचे आज्ञापत्र त्यांचे व्यापार विषयक धोरण स्पष्ट करते
“साहुकार म्हणजे राज्याची व राजश्री ची शोभा साहुकाराकरिता राज्य आबादान होते, न मिळेल ते वस्तुजात राज्यात येते, राज्य श्रीमंत होते, पडिले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्ज मिळते. तेणेकरून आलेले संकट परिहार होते साहुकाराचे संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे याकरिता सहकाराचा बहुमान चालवावा…”
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कमी प्रमाणात सैन्यहानी शिवरायांचा काळ पाहिला तर त्या काळात सर्वात बलाढ्य शासन कर्ता म्हणजे मोगल त्यानंतर दक्षिणेत आदिलशहा कुतुबशहा समुद्रावर इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज होते ही सर्व मंडळी बऱ्यापैकी प्रबळ व आर्थिक बाजूने मजबूत होती शिवरायांसाठी स्वराज्य स्थापनेची सुरुवात करताना लष्कर व खजिना या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्यासुरुवातीच्या काळात सैन्यबळ फारच कमी होते, त्यामुळे थोडी जरी मनुष्यहानी झाली तर अनेक अडचणी शिवरायांमुळे उभ्या राहत होत्या त्यामुळे सुरुवातीच्या काळात मोहीमांचे अचूक नियोजन केले गेले ज्यामध्ये मनुष्यहानी टाळणे गरजेचे होते जर शत्रू आपल्या प्रदेशात आला तर आपल्या लोकांची लूट होणार शेतीचे नुकसान होणार त्यामुळे शत्रूला आपल्या प्रदेशापासून दूर ठेवून त्याच्याच प्रदेशात युद्ध करणे गरजेचे आहे याची जाणीव शिवरायांना होती
शहाजीराजांच्या शिकवणीतून एक सारांश काढला तर शिवरायांनी अवलंबिलेल्या तत्व म्हणजे
“जेव्हा शत्रू हल्ला करतो त्यावेळी मागे फिरा, जेव्हा शत्रू बेसावध असतो त्यावेळी त्याचा छळ करा, ज्यावेळी तो हतबल होतो त्यावेळी हल्ला करा ज्या वेळी शत्रू माघारी फिरतो त्यावेळी त्याचा पाठलाग करून नाश करा”
यामध्येच शिवरायांचा गनिमी कावा लपला आहे त्यामुळे शिवरायांच्या मोहिमांचे वर्णन केवळ लष्करी या शब्दाने न करता संरक्षण या व्यापक शब्दप्रयोगाने करावे लागते
मिस्टर रॉलिन्सन म्हणतो, “शिवाजी महाराज क्रूर नव्हते स्त्रिया मुले आणि न लढणारे लोकांचा ते मान करीत असत युद्धानंतर विनाकारण कत्तली ते करीत नसत युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या शत्रुपक्षातील अधिकाऱ्यांना व इतरांना सन्मानाने वागवलं मुक्त करीत असत”
असे अप्रतिम सद्गुण शिवरायांमध्ये होते कल्याणकारी राज्याची उभारणी करत असताना दूरदृष्टी किती व्यापक असावी लागते व विचारधारा किती परिपक्व असावी लागते हे शिवरायांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेपासून लक्षात येते
भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार जो शिवरायांचा समकालीन होता तो म्हणतो, “छत्रपती शिवाजीराजे हे सत्य पुरुष अद्वितीय सेनानी प्रेमळ आणि अत्यंत सावध महापुरुष होते.”
कोणास कधी जागिरी अगर जमिनी तोडून न देणारा, न्यायाच्या कामात कोणाची भीड मूर्तब न धरणारा दृष्टांचा काळ आणि गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारा, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून राष्ट्राची चिंता वाहणारा, स्वदेश, स्वभाषा स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा असा हा आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी प्राचीन पुण्य श्लोकांचे पंगतीत बसण्यास सर्वथैव प्राप्त आहे.
अशा माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा
लेखनसीमा…
संदर्भ :
सभासद बखर
शिवकालीन पत्रसार संग्रह
आज्ञापत्र
तुकाराम गाथा
पराक्रमापलीकडील शिवराय (प्रशांत बबनराव लवटे)
संकलन
आयशा आस्मा
९६१९९७१४९५

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...