सरसेनापती संताजीबाबा घोरपडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
*“जहाँ आशोब दिले शेरमर्दान*
*रज्जाआजमारा दर ताजलजुल मी अंदाख्त”*
जगाला धडकी भरवून सोडणारी फ़ौज घेऊन जेव्हा तो चालून जाई,तेव्हा नरव्याघ्राप्रमाणे शूर असणाऱ्या योद्धयांची हृदये कंपनामय होत असत…..
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर मराठ्यांच्या साम्राज्यावर औरंगजेबाच्या आक्रमनाचे काळे ढग जम धरु लागले होते.पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्थीरबुद्धी राजकारणामुळे,महाराणी येसूबाई यांच्या असीम त्यागामुळे मराठ्यांचे राज्य तरले,लढले,वाढले..
छत्रपती राजाराम महाराज यांच्या राजकारणाला जोड मिळली ती या मर्द सेनापतीच्या पराक्रमाची..पुढे जे घडले,ते निव्वळ झंजावात..!!
संताजी घोरपडे म्हणजे हंबीर मामांच्या तालमीमधे वाढलेले रत्न.म्हाळोजीबाबांच्या पराक्रमाचा वारसा जन्मजात त्यांना लाभला होता.छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर संताजी घोरपडे यांनी ज्या त्वेषाने लढा दिला आणि पराक्रम गाजवला,त्याला इतिहासात तोड़ नाही.
बादशाहच्या तंबूवरचा कळस कापून,रायगडाला झुल्फिकारखानाच्या वेढा दिलेल्या सैन्यावर हल्ला करण्याचे मोठे धाडस संताजी घोरपडे यांनी केले.मराठ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयजयकार करत या पराक्रमी योध्याने खानाचे 5 हत्ती पळवले.
खानखानान उर्फ़ शेख निजाम,ज्याने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले,त्या निजामासोबत युद्ध करुन त्याचे हत्ती,घोड़े आणि पुष्कळ द्रव्य लुटून त्याला परास्त केले.महाराजांच्या अटकेचा बदला घेतला.
सर्जाखान उर्फ़ रुस्तमखान याचा सातारच्या पायथ्याला केलेला दारुण पराभव आणि वसूल केलेली 1 लक्ष होन खंडणी म्हणजे संताजीबाबांच्या पराक्रमाची सुरूवात होती.हा संताजी घोरपडे यांचा पहिला मोठा विजय आणि त्यांच्या गनिमी लढाईचे शत्रुला झालेले पहिले भव्य दर्शन..!!
मार्च 1689 नंतर लयाला जाणारे मराठ्यांचे राज्य मे 1690 पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते,आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व उधळले होते..
सर्जाखान,लुत्फुल्लाखान,जाननिस्सारखान,तहव्वुरखान,कासिमखान,खानखानान यांसारख्या कितीतरी बलाढ्य सेनापतींचा पराभव करुन आपली घोडी संताजी चौफेर उधळत होता..खानदेशापासून जिंजीपर्यंतचे विस्तृत मैदानी युद्धक्षेत्र संताजीच्या पराक्रमासाठी खुले झाले होते आणि त्याचा पुरेपूर वापर संताजी घोरपडे यांनी केला नसता तर नवल..
बुरहानपुरच्या मुघली सुभेदाराला बादशाहकडून बांगड्यांचा आहेर मिळाला,तो संताजीबाबांच्या पराक्रमामुळे..मराठ्यांपेक्षा मुघलांचे सैन्य जास्त असूनही त्या सुभेदाराला पराभवाचे तोंड पहावे लागले होते..मुघलांच्या सुभेदाराला बांगड्या घालण्याची वेळ संताजी घोरपडे यांच्यामुळे आली….
जेव्हा राजाराम महाराज हे झुल्फिकार खानासोबत जिंजीच्या किल्ल्यावर मुरब्बी राजकारण करत होते,तेव्हा संताजी साऱ्या दुनियाभर आपली तलवार गाजवत हिंडत होता..!!
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर खुद्द संताजीबाबांच्या हत्येपर्यंत हा मराठ्यांचा सेनापती खानदेशापासून ते अर्काटपर्यंतच्या दक्षिणेच्या भुभागावर आपल्या पराक्रमाने एकसारखा चमकत राहीला.
दोड्डेरी म्हणजे संताजीच्या लढाईचा परमोच्च कळस..छत्रपती शिवराय यांच्यानंतर त्याकाळात मराठ्यांच्या युद्धकलेमधे क्रांतिकारी बदल करण्याचा मान संताजी घोरपडे यांचाच..!!
बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा एकमेव मराठा सेनापती म्हणजे संताजी घोरपडे..!!
जेव्हा राष्ट्राच्या अंगी असणाऱ्या अस्मितेवर संकट येते,तेव्हा त्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अनेक नररत्ने जन्माला येतात आणि त्यांच्या अंगातील पराक्रमामुळे त्यांच्या कर्तबगारीची ऊँची मोठी होते..संताजीबाबा त्यातीलच एक बलाढ्य कणखर नेतृत्व..!!
मुघल-मराठा संघर्षातील महाबलाढ्य शिपायाच्या चरणी हा लेख सादर अर्पण..!!
मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्लक्षित पराक्रमी पान.. संताजीबाबा....
-केतन पुरी

No comments:
Post a Comment