विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 28 July 2021

मराठ्यांचे आणि इंग्रजांचे लष्कर

 



मराठ्यांचे आणि इंग्रजांचे लष्कर
मराठ्यांचे व इंग्रजांचे लष्कर यांच्या तौलनिक विवेचनाची संक्षिप्त माहिती इथे दिलेली आहे.
मार्च १७९५मध्ये इंग्रजांचा पुणे येथील वकील चार्लस मॅलेट याने खर्ड्याच्या युद्धभूमीवरून आपल्या सरकारला एक विस्तृत खलिता पाठवला होता.या लेखामध्ये मराठ्यांचे लष्कर व इंग्रजांचे लष्कर, त्यांच्या मुक्कामाच्या पद्धती, लष्करी तळावरील विविध घटक, आगेकूच करण्याची पद्धत इत्यादी अनेक बाबींचा यामध्ये उल्लेख आहे. इंग्रजांच्या लष्कराची माहिती ही कवायती फौजेला लागू पडते.
मराठ्यांच्या लष्करातील पथके व पागा यां त्यांच्या सरंजामी सरदाराच्या हुकुमतीखाली चालत, आपाआपल्या पथकात सरदारांचा हुकूम शिरसावंद्य मानला जाई. या पाग्याना वा पथकांना पेशवे सरकार नगद पैसे वा उत्पन्नाचा मुलुख लावून देत असे. त्यांना अनुक्रमे नगदी व तनखा असे संबोधले जाई. तनख्यात दिलेली जमीन पेशवे सरकार कोणत्याही क्षणी काढून घेऊ शकत असे. पैशाच्या मोबदल्यात सरंजामी सरदाराने ठराविक शिलेदार वा शिपाई पुरवण्याचा करार केलेला असे.परंतु बऱ्याच वेळेस करारात ठरलेले सैनिक प्रत्यक्षात भरती केलेले असतीलच असे नसे. नगदी सरदारांचा मान सरंजामी तनखा सरदारांपेक्षा कमी असे, पण स्वतःच्या पथकात दोघांना पूर्ण अधिकार असे.पेशवे सरकारमधून मिळालेल्या पैशाचा किंवा जमिनीरून येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ते त्यांच्या मनाला येईल तसा करू शकत असत. सरकारातून ठरलेला पगार संपूर्णतः व वेळच्या वेळी कधीच मिळत नसे. त्यामुळे सरदार पण भरतीमध्ये करारामध्ये ठरलेल्या संख्येपेक्षा कमी सैनिकांची भरती करीत. पैशाची चणचण असल्याने सरकारने प्रत्येक शिपायामागे ठराविक रक्कम (मुशायरा) नेमून दिलेली असे, त्यापैकी निम्मा तरी त्यांच्या पदरात पडत असे की नाही अशी शंका असे. पाग्यातील बारगीरांना घोडे पेशवे सरकारांनी किंवा सरंजामी सरदारांनी द्यावेत असा संकेत असे. शिलेदार मात्र स्वतःची घोडी वापरीत असत. परंतु पागेत एकूण बारगीर व शिलेदार किती असावेत याचे गुणोत्तर ठरलेले नसे किंवा तशी गरज नसे. मराठ्यांच्या लष्करात पायी सैनिकांपेक्षा घोड्यावर बसणाऱ्यास मान अधिक, त्यात ही शिलेदारास बारगीरापेक्षा जास्त मान असे. पागा पथकावर सरकारातून देखरेखीसाठी कारकून व मुजुमदार नेमलेले असत. घोड्यासाठी दाणावैरण नेमलेली असे. पेशवे सरकारातून कमी रक्कम मिळाली किंवा शेतसारा कमी आला तर सरदाराला शिपायांच्या पगारासाठी खिशातील पैसे द्यावे लागत. बऱ्याच वेळेला 'सरकारातून रक्कम आली नसल्याने तुला पगार कसा देऊ" असे शिपायाला सांगून मार्गी लावले जाई. बऱ्याच वेळेस आलेली रक्कम शिपायाने काढलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी वापरून उर्वरित रक्कम त्याच्या पदरात पडे.
बारगीर शिलेदाराखेरीज मराठयांच्या फौजेत अजून एक वर्ग असे, तो म्हणजे एकांड्यांचा. हे लोक कायम स्वरूपी कोणाकडे बांधलेले नसत.जरुरी प्रमाणे निरनिराळ्या सरदाराकडे किंवा सरकारकडे ते नोकरीस जात. त्यांना मान व त्यांचा इतमाम मोठा असे. त्यांना मासिक पगार शंभर ते हजार रुपयांपर्यंत असे व त्यांना पाग्यातील खास घोडा स्वारीसाठी देण्यात येई. बऱ्याच मुख्य सरदारांचे ते जीवाभावाचे सवंगडी असत.
मराठे घोडेस्वार तलवारी, भाले व नंतरच्या काळात बंदुका वापरत. काहीजण धनुष्यबाण किंवा तीरकमाठाही वापरात. तलवार ही प्रत्येकाजवळ असे, नंतर आवडते हत्यार भाले मागे पडत चालले. पुष्कळसे एकांडे शिलेदार फक्त तलवारच वापरत. शिलेदार स्वतःचे घोडे, तलवार व पोशाख वापरात असल्याने त्यांच्या एकजिनसीपणा अभावानेच आढळत असे.
प्रत्येक पागेकरिता एक भला मोठा तंबू, राहुटी किंवा शामियायाना नेमून दिलेला असे. पागेतील घोडे दोन रांगा करून ठाणबद्ध केली जात. दोन रांगाच्या मधून रस्ता तयार होत असे त्याच्या एका टोकाला पागेचा तंबू किंवा शामियाना उभारलेला असे. ती जागा शिपायांना बसण्या उठण्यास, एकत्र येण्यास वा विचार विनिमयासाठी किंवा विश्रांतीसाठी असे.बहुतेक शिलेदार त्या जागेचा फारसा वापर करीत नसत. तो आपला गाशा, जीन,खोगीर व शस्त्रे घेऊन आपल्या घोड्यासमोरच ठाण मांडत असे. एव्हडेच काय, तो तेथेच झोपे. मराठी शिलेदाराकडे फालतूचे सामान नसे. ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ अशी त्यांची गत असे.
घोड्यासाठीच्या प्रत्येक पागेत काही ठराविक तट्टू नेमलेले असत.या तट्टूचे काम म्हणजे घोड्यासाठी कडबा, चारा, वैरण वगैरे भरून आणायची.तळावरून पागेने कूच केले की हे तट्टू चारी दिशांना कडबा वगैरे गोळा करण्यास पाठवण्यात येत. पागा व त्यांचे सैनिक पुढच्या मुक्कामावर पोहचताच हे तट्टू आपले सामान नेऊन तेथे पोचत असत. याचा परिणाम असा होई की ज्या मार्गावरून लष्करे जात, त्या मार्गाच्या आजूबाजूचा कडबा, चारा, काडी इत्यादी ओरबाडून नेलेले असे.त्यामुळे तेथील स्थानिक रहिवाश्यांचे हाल कुत्रे खात नसे. त्यामुळे लष्करांचे कूच आपल्या प्रदेशातून होऊ नये म्हणून तेथील संबंधित मुख्याचा कटाक्ष असे.अशा आशयाची अनेक प्रकारची अनेक पत्रे इतिहासात सापडतात.
मराठांच्या लष्कराची कूच करण्याची पद्धती: कूच करायच्या आदल्या रात्री लहानमोठ्या सरदारांना, पथकांच्या प्रमुखांना कूच कारण्याबद्दलच्या चिठया पाठवल्या जात.तसेच दवंडीवाल्याकडून दवंडी पिटली जात.नंतर दुसरे दिवशी पहाटे चार वाजता प्रत्यक्ष कूच करण्याचा इशारा, नगारा किंवा नौबत सुरु करून दिला जाई. दुसऱ्या नौबतीचा इशारा झाल्यावर पेशव्यांचे निशाण जरीपटका घेऊन बिनीवाले तळ सोडत असत. जरीपटक्यासोबत बिनीवाल्यांचे एक किंवा अनेक पथके असत. बिनीवाले निघाले म्हणजे त्यांच्या बरोबर किंवा आगे पीछे इतर सरदारांची पथके निघत. त्यांच्याबरोबर त्यांची निशाणे, बिनलष्करी जमाव म्हणजे बाजार, कर्मचारी,लोहार, सुतार, बेलदार, स्वयंपाकी इत्यादी सर्व बुणगे चालू पडत. बाजार बुणगे आपल्या घोळक्यातून चालत, त्यांच्यात बऱ्याच अंशी शिस्तीचा अभाव असे.
पुढल्या तळावर बिनीवाल्यांचे पुरलेले निशाण दिसले की सर्वजण थांबत व परत ते आपापल्या समूहात एकत्र होत.ही सर्व क्रिया शिस्तीत होत असे.नवीन तळाची जागा शोधणे व ती योग्य का अयोग्य याचा निर्णय सर्वस्वी बिनीवाले घेत.मुख्य सेनापतीचा मोठा शामियाना लावल्यावर त्याच्या पुढे रस्त्यासाठी बऱ्यापैकी जागा सोडली जाई. मग त्याच्या उजव्या डाव्या बाजूला आपल्या हुद्द्यानुसार इतर सरदार आपले तंबू, शामियाने ठोकत असत. सेनापतीच्या समोरच्या रस्त्यावर लष्करातील वाणी,व्यापारी, उदीम आपली पाले स्थापन करीत. यामागे बाजारहाट मुख्य सेनापती व त्याच्या कुटुंबाला जवळ असावा आणि बाजाराला सरंक्षण मिळावे असा हेतू असू शकतो.प्रत्येक सरदाराला मुक्काम करायला किती जागा द्यायची हे कोणत्या नकाशावर जरी नमूद केले नसले तरी त्याचे ठोकताळे मात्र असतील असे वाटते. तळ पुढे कितीही वाढला तरी कोणाची हरकत नसे, फक्त मुख्य सरदाराच्या उजव्या व डाव्या अंगास कितीपर्यंत त्याची वाढ असावी यावर नियंत्रण असे. लष्कराचा तळ लहान नदी किंवा नाल्याच्या काठी असेल, तर नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर शिपाई तळ ठोकीत असत. मुख्य सेनापती व त्याचे इतर महत्वाचे सरदार पुढील मुक्कामावर त्यांचा शामियाना उभा राहीपर्यंत मागच्याच तळावर थांबत. आपले भारी व महत्वाचे सामान त्यांनी पुढे पाठवलेले असे. हे लोक सकाळी स्नान संध्या,पूजा आटोपून न्याहारी घेऊन दहा वाजण्याच्या सुमारास पुढे कूच करीत. लहानसहान सरदार मात्र इतरांच्या सोबत पुढे जात असत.सेनापती व प्रमुख सरदार त्यांच्या मानानुसार हत्तीवरून वा पालखीतून किंवा घोड्यावरून पुढे कूच करीत. तळावरचा मुख्य रास्ता सोडला तर मराठ्यांची छावणीत गोंधळ असे.उंट, घोडे, तट्टू व इतर सामान अस्ताव्यस्त पसरलेले असे, त्यातून मार्ग काढत जाणे मुश्किल असे.
मराठयांच्या सैन्याला बंजारांचे तांडे अन्नधान्य पुरवीत. असे तांडे मराठ्यांचं फौजेच्या आजूबाजूला फिरत असत. त्यामुळे मराठ्यांना पोटाला अन्नधान्य मिळण्याची शाश्वती असे. त्यामुळे मराठ्यांना अन्नाचा साठा करून ठेवायची गरज नव्हती. फक्त पाण्याचा साठा पाहून ते कुठेही मुक्काम करू शकत. युरोपिअन धर्तीच्या सैन्यात अन्नधान्य साठवणे ही अत्यंत गरजेची बाब असे. मराठ्यांच्या लष्कराबरोबर वाणी, उदीम, ओझी वाहणारे कामगार यांची गर्दी उडालेली असे.मराठ्यांना नेहमी लागणारे सर्व पदार्थ सहज मिळत असल्याने त्यांना साठा करण्याची जबाबदारी नव्हती. तशात मराठ्यांच्या गरजा अत्यंत कमी असत. इंग्रज लष्कराच्या त्या मानाने गरजा खूपच जास्त होत्या. त्यामुळे साहजिकच अन्नपुरवठा व इतर गोष्टीवरून इंग्रज शिपायात धुसफूस होत असे. मराठ्यांच्या कवायती फौजेच्या सुद्धा गरजा इंग्रजांच्या फौजेपेक्षा कमी असत. तरी सुद्धा आपल्या शौर्यात ते इंग्रज सैनिकांना सरस असत.
मराठ्यांच्या लष्कराभोवती त्यांच्या घोडदळाच्या तुकड्या सतत घिरट्या घालत असत, त्यामुळे मराठ्यांच्या तळावर छापा घालणे अवघड असे. रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या तुकड्याना छबिना म्हणत. मराठ्यांचे आघाडीचे सैन्य मजबूत असे, वेळ प्रसंगी आपल्या जवळील नको असलेले सामान टाकून देत सडे होऊन ते लढाईला तयार होते. अशा तुकड्याना चिनी किंवा जरिंद्या म्हणत. या तुकड्याबरोबर साधी राहुटी पण नसे, खाण्याचे सामान सगळे घोड्यावरच. इंग्रजांच्या फौजेला मात्र कुठं ही मुक्काम करताना आजूबाजूला खंदक खणून राहावे लगे.
मराठयांच्या लढाऊ घोडदळाबरोबर पेंढारी घोडेस्वारांच्या टोळ्या असत. या पेंढाऱ्यांना पगार, भत्ता वगैरे काही मिळत नसे. पेंढाऱ्यांचा नायक सरदाराकडून लूट करण्याचा कागद म्हणजे लेखी परवाना मिळवत असे. तो मिळाल्यावर त्या प्रदेशाची पेंढारी इतकी लुटालूट व जाळपोळ करीत की विचारु नये.पगारी शिपाई सुद्धा करणार नाहीत इतके नुकसान ते करीत. पेंढाऱ्यांचा डोळा केवळ लुटीवर असल्याने प्रत्यक्ष लढाईत त्यांचा उपयोग नसे. लष्करी तळाशेजारीच त्यांचा वेगळा तळ असे.बहुतेक पेंढारी हे मुसलमान होते पण मुसलमानांचा कट्टरपणा त्यांच्याकडे नसे. लूट नसेल तेव्हा पेंढारी भुकेकंगाल असत. या पेंढाऱ्यांच्या लुटालुटीच्या भीतीमुळे कित्यके गावांना गावकूस असे व गावाच्या मध्यभागी गढी बांधलेली असे.
मराठे शक्यतो एके ठिकाणी स्थिर न राहता गतिमान राहून लढाई करीत. अर्थात त्यांनी आपल्या फौजेत कवायती फौज आणल्यापासून त्यांची गतिमानता कमी झाली. महादजी शिंदे यांनी लढाईत मराठ्यांचे गतिशील घोडदळ व जागेवर स्थिर राहून लढणारी कवायती फौज यांचे सुरेख मिश्रण करून अनेक विजय संपादन केले होते.
इंग्रजी लष्कराचा तळ:
हे वर्णन एका युरोपिअन माणसानेच केलेले आहे. विलायती लष्करी सैन्याच्या राहुट्या ओळीने ठोकलेल्या असत. आपापल्या विभागानुसार त्यांचे रंग व आकार वेगवेगळे असत.प्रत्येक खात्याचे रंगबिरंगे झेंडे असत. इंग्लंडमधील लष्करी तळापेक्षा हिंदुस्थानातील तळ फारच देखणे व भव्य असत असे त्या युरोपातील लेखकाने लिहून ठेवले आहे. इंग्लंडमधले बेलटेन्टच्या मानाने इथले टेन्ट आकाराने मोठे होते. सहा डेरे युरोपिअन लोकांसाठी उभारलेले असत, तितकेच देशी लोकांसाठी होते. प्रत्येक गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी मोठा तंबू (पॅव्हेलियन) दिलेला असे. जितका अधिकारी उच्च दर्जाचा तेव्हढा त्याचा तंबू आकाराने मोठा व रुबाबदार असे.प्रत्येक तंबूचा कमीतकमी आकार १० फूट ते १० फूट, त्याला उंच कणाती आणि दुहेरी अस्तराचे छप्पर असे. नोकरासाठी खाजगी तंबू हे जवळच लावलेला असे. त्यामागे कप्तानाच्या पथकदारांच्या, त्याच्या ही मागे रेजिमेंटल स्टाफच्या तंबूच्या रांगा असत. ब्रिगेडिअर व त्याचा स्टाफ आपापल्या ब्रिगेडमध्ये मुक्कामाला असत. ब्रिगेडमध्ये उंच कट्टा करून त्यावर युनिअन जॅक लावलेला असे. मुख्यालयापासून काही अंतरावर पुरवठा खाते, बंजारी, बेलदार, गवंडी यांचे मुक्कामाचे ठिकाण होते. त्यांच्या मागे समांतर लष्करी बाजार असे. छावणी करायला पुरेसे व मोठे सपाट मैदान मिळे तेव्हा तळ एका सरळ रेषेत लावलेले असत. त्याच्या मध्यभागी तोफखाना त्याच्या शेजारी समांतर घोड्याच्या सरळ रेषेत पागा होत्या. लष्कारामागे बाजारबुणग्यांची पाले असत.
लष्करी हालचाल व आगेकूच करण्याची पद्धती:
कवायती फौजेच्या सेनापतीकडून कूच करण्याचा बिगुल वाजू लागला की राहुट्या पडू लागतात आणि एखादे मुंग्यांचे वारूळ खणल्यावर जशा असंख्य मुंग्या दिसू लागतात तसे शिपाई व कामगार कामात गुंतून जात, ड्रोन कॅमेराने वरून फोटो घेतला तर एखादा शिंपला उकलताना त्यातील असंख्य जीवजंतू हलताना दिसावेत तसे हे दृश्य दिसे. शिपाई आपले सामान उचलून रांगेत चालू लागत. सैन्याचे सामान सैन्याबरोबर समांतर रेषेत चालत असे. परंतु शत्रूच्या हल्ल्याचा धोका नसेल तेव्हा सामान बरोबर न जाता सावकाशीने पुढच्या तळावर पोचत असे.गोऱ्या शिपायांचे तंबू, राहुट्या, कापड इत्यादी सामान मात्र हत्तीवरून वाहून नेले जात असे. बाकीचे सामान बैलावरून नेले जाई. बऱ्याच खेपेस सामानाची वाहतूक करण्यास देशी पलटणचे जमादार ,हवालदार कंत्राटी पद्धतीचा उपयोग करीत असत. ओझी वाहणाऱ्या बैलांना चारा वेळेवर नाही मिळाला तर वाहतूक करायला बैल कुचकामी ठरत. लांब मजला मारताना बैलांचे हाल होत असत.सामानाची वाहतूक करण्यासाठी बैलासोबत उंटांचा देखील उपयोग केला जात असे. उंट बैलापेक्षा अधिक बळकट, लांब चालणारे व वाटेत झाडपाला खाऊन राहणारे असल्याने ते फार उपयोगी पडत.
कवायती फौजेतील शिपायांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना रंगबिरंगी गणवेश दिलेले असत. उदाहरणार्थ महादजींचा फ्रेंच सेनापती डी बॉयन याच्या कवायती सैनिकांच्या गणवेशाचे रंग असे होते: पायदळाचा गणवेश किरमिजी रंगाचा काळा, त्यावर कातडी सरंजाम( leather accouterments) ,घोडदळ सैनिकाचा गणवेशाचा रंग हिरवा, त्यावर लाल रंगाची पगडी व कंबरपट्टा इत्यादी. मराठ्यांच्या लष्करातील सैनिकांना ठरलेले गणवेश नसायचे. प्रत्येकजण त्याच्या मर्जीनुसार, ऐपतीनुरूप कपडे घालत असे. सामान्य शिपायामध्ये एकंदरीतच रंगबिरंगी कपडे कोणी घालत नसे.
सारांश:मराठ्यांचा लष्करी तळ कवायती सैन्यांच्या तळाबरोबर तुलना करता थोडासा अव्यवस्थित वाटला तर त्यात नवल नाही. तरी पण मराठ्यांची स्वतःची एक पद्धत होती आणि जर मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या असतील तर ती पद्धत त्यांच्या काळाला अनुसरूनच होती असे म्हणावे लागेल.मराठ्यांच्या सैनिकांच्या गरजा अत्यंत कमी असत याचे विदेशी लष्करी अधिकाऱ्यांना कौतुक वाटे. याबाबत युरोपातील सैनिकांनी मराठ्यांचे अनुकरण करावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि असे त्यांनी लिहून देखील ठेवले आहे. मराठ्यांचे सामान कमी असल्याने त्यांना वेगात हालचाली करणे सुलभ जात असे. मराठ्यांचे लष्करी तळाभोवती गस्त घालणारे सैन्य म्हणजे सरंक्षण कवच होते.त्यामुळे शत्रूला त्यांच्यावर अकस्मात हल्ला करणे अतिशय कठीण असे. युरोपिअन पद्धतीच्या सैनिकांचे गणवेश आणि त्यांची शिस्त ही हिंदुस्थानातील सामान्य जनतेच्या कुतूहलाचा विषय होती. कवायती सैनिकांची परेड व त्यांचा सराव पाहायला गावातील सारे लोक लोटत असत. डी बॉयन याने त्याच्या एका पत्रात याचा उल्लेख करून आपल्याला त्रास होतो म्हणून सरावाची जागा बदलून घेण्याची महादजीकडे परवानगी मागितली होती. कवायती फौजेतील सर्वात महत्वचे अंग म्हणजे त्यांना दरमहा वेळेवर मिळणारे वेतन होते. बहुतेक वेळेस मराठ्यांच्या (किंवा हिंदुस्थानातील इतर)पारंपारिक सैनिकांना दरमहा वेतन मिळायची मारामार असे.त्यामुळे देशी सैनिकांना कवायती सैनिकांचा नेहमी हेवा वाटत असे.
______________________________________________________________________
संदर्भ:इतिहासातील सहली: लेखक यशवंत नरसिंह केळकर, पूना रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स भाग ४
संकलन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...