विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 28 July 2021

बेगम समरू : अठराव्या शतकातील एक प्रोफेशनल मर्सिनरी

 


बेगम समरू : अठराव्या शतकातील एक प्रोफेशनल मर्सिनरी
“बेगम समरु” उर्फ “जोहाना नोबिलिस सोम्बरे” उर्फ “फरझाना झेबुनिसा” उर्फ बादशहा शहा आलमची “सबसे प्यारी शाहजादी” या इतिहासकालीन व्यक्तीला फारच कमी लोक ओळखत असतील. अठराव्या शतकातील संपूर्ण हिंदुस्थानातील ती एकमेव स्वतंत्र ख्रिश्चन स्त्री उमराव होती (only catholic & female ruler of India). सुमारे तीन ते चार हजार फौज सतत जवळ बाळगणारी ती एक व्यावसायिक स्त्री सेनापती होती. दरबारातील एक नर्तिकेपासून ते एक भाडोत्री सैनिक तेथून एक राजकीय मुत्सद्दी आणि शेवटी एका प्रदेशाची राणी असा तिचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. जशी ती एक प्रोफेशनल मर्सिनरी (पैशासाठी लढाया करणारी) होती तशीच ती एक प्रेमिका सुद्धा होती. महादजी शिंद्यांचा चरित्राचा अभ्यास करताना बेगम समरूचा उल्लेख येतो. अशा या काहीशा दुर्लक्षित व्यक्तीचे हे संक्षिप्त रोमांचकारी चरित्र !
पूर्वायुष्य: दिल्लीच्या ईशान्येस ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरठ गावाच्या एका कसब्यात बेगम समरुचा जन्म सन १७५३मध्ये झाला, जन्माच्या वेळी तिचे नाव ‘फरझाना झेबुनिसा’ होते. तिची आई ही लुतुफ अली खान नावाच्या जमीनदाराची उपपत्नी होती. वयाच्या सहाव्या वर्षी पित्याच्या मृत्यूनंतर सावत्र भावाच्या छळापासून सुटका करून घेण्यासाठी मायलेकी सन १७६०च्या सुमारास दिल्लीस गेल्या. तेथे त्यांची भेट फ्रेंच सैनिकी अधिकारी जनरल सोम्बरे बरोबर झाली. त्याच्याकडे त्या मोलकरीण म्हणून राहू लागल्या. हळूहळू फरझाना आणि सोम्बरे यांच्यातील संबंध घनिष्ठ होते गेले आणि त्याचे पर्यावसान त्यांच्या विवाहात झाले.
फ्रेंच सेनापती सोम्बरे याची लष्करी कारकीर्द: फ्रेंच सेनापती समरूचे खरे नाव वाल्टर रेनहार्ड (Walter Reinhardt ) होते. त्याचा जन्म युरोपातील लुक्झेम्बर्ग येथे झाला,तो फ्रँको जर्मन वंशाचा होता. फ्रान्समधून भारतात संपत्ती कमावण्यासाठी तो आला होता. सुरुवातीला त्याने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सार्जंट म्हणून नोकरी स्वीकारली परंतु नंतर त्याने अनेक नोकऱ्या बदलल्या. त्याचा चेहरा नेहमी गंभीर असे (इंग्रजीत सोम्बरे म्हणजे गंभीर), त्यामुळे त्याला सोम्बरे असे टोपण नाव मिळाले. त्याचेच अपभ्रंश होत नाव 'समरु' झाले. तो हिंदुस्थानातील लोकांसारखा राहत असे व ओघवती हिंदी बोलत असे.
शेवटी सन १७७२ मध्ये समरु याने आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या तयार केल्या. त्यांचा उपयोग तो कधी जाटांच्या बाजूने लढण्यास करत असे, तर कधी जयपूरच्या राण्यांकडून, तर कधी मराठ्यांचा बाजूने लढत असे. त्या काळात युरोपातून अनेक असे शिपाई संपत्तीच्या हव्यासापायी हिंदुस्थानात आलेले होते. असे भाडोत्री शिपाई (mercenary) समरुकडे नोकरीस येत असत. त्याच्या तीन हजार सैन्यात असे युरोपातून आलेले लोक शंभर तरी सहज निघतील.
समरु याची फौज म्हणजे व्यावसायिक सैनिकांची टोळी होती. त्यातील प्रत्येकाला पैशाचा हव्यास असे व यास्तव ते कुणाशी ही लढाई करायला तयार असत. ज्यावेळी अशा लढाया नसत, तेव्हा साहजिकच त्यांना पैशाची चणचण भासे. त्यावेळेस ते पैशासाठी आपल्या अधिकाऱ्याला सुद्धा बंदिवान करण्यास पुढे मागे पाहत नसत. त्यातल्या त्यात त्यांचा जनरल सोम्बरे हा थोडा जास्त हुशार व चलाख होता.
समरूची स्वतःची अशी एक आगळी युद्धनीती होती. लढाऱ्यांपैकी कोणती बाजू बरोबर वा चुकीची आहे याची त्याला पर्वा नसे. त्याची पद्धती म्हणजे कोणत्याही लढाईत आपली फौज घेऊन एका सुरक्षित स्थळी थांबत असे आणि तेथून बेछूटपणे १०-२० बंदुकीच्या गोळ्या मारत असे. त्यानंतर बराच काळ तो शांत बसे. काही वेळ त्या दोन पक्षात लढाई झाल्यावर जो पक्ष लढाईत जिंकला त्याची बाजू तो घेऊन लढाईचे फायदे उपटत असे. किंवा जिंकलेल्या बाजूने समोरच्या पक्षातील लुटीत हात धुवून घेत असे.
४ मे १७७८ रोजी आग्रा येथे फ्रेंच जनरल सोम्बरेचा मृत्यू झाला. त्यावेळेस बेगम समरु २४ वर्षाची होती. तिने आपल्या पतीची म्हणजे जनरल सोम्बरेची कबर आपल्या बागेत एका कोपऱ्यात बनवली. पुढे ७ मे १७८१ रोजी बेगम समरु हिने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यावर आग्र्याच्या चर्चच्या परिसरात तिने आपल्या नवऱ्याचे रीतसर दफन केले.
बेगम समरूची नेतृत्वपदी निवड: ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर तिचे नाव योहाना ठेवण्यात आले. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर हाताखालील फौजेतील अधिकाऱ्यांनी बेगम समरु हिला त्यांचे नेतृत्व करण्याची विनंती केली आणि तिने ती स्वीकारली. दिल्लीच्या बादशहाने त्याला लगेच मान्यता दिली. त्या आधीपासूनच मेरठ जवळील सरधाना येथे तिची सरंजामशाही चालू झालेली होती. ‘डार्क लीगसी; फॉर्चुन्स ऑफ बेगम समरु’ या पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे जनरल सोम्बरेच्या मृत्यू पश्चात त्याचा मुलाने बापाची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बेगम समरुने तो प्रयत्न हाणून पाडला व ती स्वतः फौजेचा प्रमुख बनली.
बेगम समरूचा क्रूर स्वभाव: या संबधी एक कथा सांगितली जाते, ज्याला ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. आग्र्याला बेगम समरूच्या कोठीच्या आसपास अनेक कुटुंबे आश्रयाला होती. त्यापैकी दोन गुलाम स्त्रियांनी बेगम समरु मथुरेस एका मसलतीमध्ये गुंतली असताना तिच्या घरी चोरी केली. समरूच्या घरास आग लावून देऊन समरूचे दागदागिने व पैसे घेऊन त्यांनी पोबारा केला. ही हकीकत बेगम समरुला कळल्यावर ती धावत आग्र्यास आली. तिने झालेल्या घटनेची कसून चौकशी करून त्या दोन्ही स्त्रियांना कैद केले व त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा ठोठावली. त्यांनी दोन्हीजणींना जमिनीखाली जिवंत पुरण्याची तिने आज्ञा केली आणि ती पूर्ण करून घेतली. त्या दोघींची कोणी सुटका करू नये म्हणून तिने आपला शामियाना त्या स्त्रियांना पुरलेल्या जागेवर उभारला आणि काही दिवस तेथेच मुक्काम केला. वेळ प्रसंगी समरु किती क्रूर होऊ शकते त्याचा हा नमुना होता. या घटनेतून एक गोष्ट इतरांना स्पष्ट झाली. ती म्हणजे तिच्या सैन्यातील फालतू उठसुठ बंड करून त्रास देणाऱ्यांची नाटके कायमची बंद झाली. बेगम समरु एखाद्या बादशहाला शोभेल असा आपला दरबार भरवीत असे, सिंहासनावर पगडी घालून बसत असे व दरबारात सर्वासमक्ष हुक्का देखील ओढत असे. उर्दू व फारसी भाषेवर तिचे प्रभुत्व होते.
बेगम समरूचे दुसरे लग्न: पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर सन १७९०मध्ये बेगमच्या पलटणमध्ये मोसीए ली मेसो (लेव्हासो) नावाच्या फ्रेंच अधिकाऱ्याचा प्रवेश झाला. तो एका सुसंस्कृत व घरंदाज कुळातून आलेला होता. लवकरच बेगमने त्याला सैन्याच्या प्रमुखपदी नेमले. यावेळी बेगमच्या सैन्याच्या सहा तुकड्या तयार झालेल्या होत्या. त्यापैकी निम्म्या दिल्ली शहरात बादशहाच्या बंदोबस्ताला होत्या व उरलेल्या तिच्या जहागिरीत सारधानमध्ये होत्या. दिल्लीच्या तुकड्यांचे सारथ्य तिचा शूर व कुशल आयरिश सेनापती कर्नल जॉर्ज टॉमकडे होते. १७८८ मध्ये मोंगल सरदार नजफकुलीच्या बरोबर झालेल्या गोकुलगढ़च्या लढाईत बेगम समरुकडील कर्नल टॉम याने प्रसंगावधान दाखवीत बादशाहाचे प्राण वाचवले होते. त्यामुळे बादशहा शहा आलम बेगम समरुवर अत्यंत प्रसन्न झाला. तेव्हा बादशहाने उस्फुर्तपणे "सर्वात आवडती राजकन्या " असा किताब देऊन तिचं कौतुक केले होते. पण घटनेमागे खरे कर्तृत्व कर्नल टॉम याचे होते.
पुढे बेगम ली मेसोच्या प्रेमात अडकत गेली आणि १७९३मध्ये त्यांनी लग्न केले. या घटनेमुळे बेगमकडील कर्तबगार लष्करी अधिकारी जॉर्ज टॉमस याचा हिरमोड झाला व तो राजीनामा देऊन बेगम समरूची चाकरी सोडून निघून गेला व त्याने महादजी शिंदे यांच्या लष्करात अप्पा खंडेरावकडे नोकरी धरली. महादजीच्या मृत्यूनंतर जॉर्ज टॉमसने बेगम समरु विरुद्ध कारवाया चालू केल्या. तेव्हा बेगमने इंग्रजांशी लाडीगोडी लावून त्यांच्या आश्रयार्थ पळून गेली. वाटेत बंडखोरांनी तिच्या पालखीवर हल्ला केला तेव्हा ती जखमी झाली, परंतु सोबत असलेल्या लेव्हेंसो यास ती मेल्याचे वाटून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बंडखोरांनी बेगम समरु हिला सारधाना येथे नेऊन कैदेत ठेवले. १७९५-९६मध्ये तेथे तिने जॉर्ज टॉम बरोबर बोलणी करून आपली व्यवस्था लावून घेतली.सन १८०२मध्ये जॉर्ज टॉम युरोपला परत जात असताना वाटेत बुऱ्हाणपूर येथे मरण पावला. त्यानंतर जॉर्ज टॉमच्या बायका मुलांचा बेगमने तिच्या अखेरपर्यंत चांगला सांभाळ केला.
शेवटी समरूच्या सेनेच्या प्रमुखपदी दुसऱ्या एका फ्रेंच माणसाची नियुक्ती केली गेली. त्याचे नाव होते कर्नल मशियो सेलो. याच्या नेतृत्वाखाली समरूच्या फौजेची चांगली प्रगती झाली आणि पुढे शिंद्यांच्या बाजूने लढाईत भाग घेऊन त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले. दुष्ट व कपटी गुलाम कादीरच्या विरुद्धच्या लढाईत महादजी शिंदे यांना त्याने चांगली साथ दिली होती.
समरुला कंपनी सरकारचा आश्रय: असईच्या लढाईनंतर बेगम समरु पूर्णवेळ इंगजांच्या आश्रयाला गेली व शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहिली. सारधानमध्ये राहून तेथे तिने रयतेच्या सुखासाठी अनेक सोयी केल्या. तसेच एका चर्चची निर्मिती केली. त्यासाठी स्थानिक पाद्र्याला एक लाख रुपयेचा निधी तिने पुरवला. तसेच रोम येथील पोपसाठी तिने पंधरा लाख रुपये दान केले. हिंदू व इस्लाम धार्मिक व सामाजिक संस्थांना तिने सढळ हाताने मदत केली. आयुष्याच्या शेवटी तिने साठ लाख रुपये एव्हढी प्रचंड माया जमा केलेली होती. सन १८३१ मध्ये सारधाना सरंजामचा सारा कारभार जनरल सोम्बरेचा नातू डेविड डायस याने हातात घेतला. परंतु बेगम समरूच्या २७ जानेवारी १८३६ मध्ये झालेल्या मृत्यूनंतर ईस्ट इंडिया कंपनीने समरुचे संस्थान आपल्या ताब्यात घेतले. सन १८०३ ते ३६ पर्यंत तिने सारधाना येथील जहागिरीचा निर्वेधपणे उपभोग घेतला.
बेगम समरुचा शेवट: बेगम समरु हिने आपले शेवटचे दिवस अतिशय थाटामाटात व ऐशोआरामात व्यतीत केले. सुरुवातीच्या आयुष्यात ती इतर मुस्लिम स्त्रियाप्रमाणे पडद्यात राहत असे आणि बाहेर जाताना बुरखा वापरीत असे. सन १८०३ नंतर मात्र जेव्हा ती कंपनी सरकारच्या आश्रयाने राहू लागली त्यानंतर मात्र तिने आपले राहणीमान पाश्चात्य पद्धतीप्रमाणे बदलले. पडदा व बुरखा त्यजून तिने मोठ्या मेजावर जेवण करणे, पार्ट्यात सहभागी होणे अशा गोष्टी भाग घेऊन पाश्चात्य समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवले. त्यावेळचे कंपनी सरकारचे लाटसाहेव लॉर्ड विल्यम बेंटिक हे इंग्लंडला परत जाताना बेगम समरु हिला पाठवलेल्या निरोप्याच्या १७ मार्च १८३५च्या पत्रात म्हणतात," प्रिय मित्रवर , माझ्या मनात आपल्या बद्दलचा किती आदर आहे हे सांगितल्याशिवाय हा देश मी सोडून जाऊ शकत नाही. इंग्लंडला जाण्यास मी उद्या जहाजावर पाय ठेवेन, माझ्या शुभेच्छा आपल्या पाठीशी सदैव असतील."वगैरे वगैरे.
भारताच्या राजधानीत दिल्लीमध्ये चांदणी चौक भागामध्ये आजही बेगम समरु यांनी लाखो रुपये खर्चून उभारलेली ऐसपैस वास्तू उभी आहे. आज त्या कोठीचे नामांकरण भगीरथ पॅलेस झालेले कळते. जानेवारी १८३६मध्ये बेगम समरूचा देहांत झाला. आज ही मेरठ येथील सारढाना मध्ये बेगम समरु हिने उभे केलेले चर्च तिच्या जीवनाचा एक साक्षीदार म्हणून उभे आहे. काही इंग्रजी इतिहासकारांनी बेगम समरूचा मोठेपणा दाखवत तिच्या जीवनाची तुलना फ्रान्सच्या सुप्रसिद्ध “जोन ऑफ आर्क ”च्या जीवनाशी केलेली आहे.
_______________________________________________________________________
संदर्भ: मुघल साम्राज्य की जीवनसंध्या लेखक राजेश्वरप्रसाद नारायणसिंह, मराठी रियासत भाग ७, गो. स. सरदेसाई , Dark Legacy:Fortunes of Begum Samru by Nicholas Shreeve (संकलन व लेखन: प्रमोद करजगी)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...