विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 July 2021

सावंतवाडी संस्थान.... भाग १



 सावंतवाडी संस्थान....

भाग १
मुंबई, बेळगांव एजन्सींतील एक संस्थान. सांप्रतकाळीं आपण ज्याला सावंतवाडी संस्थान असें म्हणतों, तो प्रदेश प्राचीन काळी हल्लीं असलेल्या नांवानें प्रसिद्ध नव्हता. कोंकण सुभ्याच्या पोटीं कुडाळ व भीमगड ह्या नांवाचें दोन परगणे होते, त्यांत सावंतवाडी प्रदेशाचा समावेश होत असे. इ. स. १६९७ मध्यें सावंत भोंसले यांनीं कुडाळदेशस्थ प्रभूस जिंकून ते वरील दोन्ही परगण्यांवर स्वतंत्रपणें सत्ता चालवूं लागले, व आपल्यास 'सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय' असें म्हणवूं लागले. पुढें या सावंताकडील मुलुखांपैकीं थोडथोडा मुलूख शेजारच्या राजांनीं हस्तगत केला. कुडाळ परगण्यापैकीं तीन तर्फा, एक बंदर व दोन तर्फांपैकीं कांहीं गांव इंग्लिशांनीं घेतले. एक कर्यात कोल्हापूर संस्थानाकडे गेली. भीमगड परगण्यापैकीं तीन महाल पोर्तुगीज सरकारच्या ताब्यांत गेले. शेवटीं नऊ तर्फा, एक कर्यात व दोन महाल सावंत भोंसले यांच्या सत्तेखालीं राहिले. हा मुलूख व चंदिगडें तर्फेपैकीं मिळालेले आंबोली, चौकूळ व गेळें हीं तीन गांवें मिळून सध्याचें सावंतवाडी संस्थान झालेलें आहे.
या संस्थानच्या राजघराण्याच्या पूर्वजांची माहिती साधारणत: स. १५०० च्या सुमारापासून मिळते. या घराण्याच्या मूळ पुरुषाचें नांव मांग सावंत असें होतें, व तो उदेपूर येथील प्रसिद्ध शिसोदिया घराण्यापैकीं असून त्याचें उपनांव भोंसले असें होतें. मांग सावंत यानें या प्रांती आल्यावर कांहीं प्रांत मिळविला व होडावडें येथें आपलें राहण्याचें ठिकाण केलें. यावेळीं या प्रांतीं विजयानगरच्या हिंदु राजांचा अंमल होता. विजयानगरचा पाडाव झाल्यावर हा प्रांत आदिलाशाहीकडे गेला. आदिलशाहींतून कुडाळ परगण्याच्या देशमुखीचें काम एका कुडाळदेशस्थ प्रभु घराण्याकडे देण्यांत आलें होतें. या प्रभु देशमुखांकडे दळवी या आडनांवाचें सेनापति होते. हे दळवी मूळचे जोधपूर येहथें राहणारे असून प्रभूंची सत्ता या प्रांतांत सुरू झाली तेव्हां प्रभूंनीं त्यांस आपले सेनापति केले. या प्रांतावर मराठ्यांची सत्ता स्थापन करावी या उद्देशानें तत्कालीन सेनापति देवदळवी व मांग सावंत हे कांहीं दिवस एक होऊन देशमुखांचा पाडाव करूं लागले, परंतु या कामीं त्यांस यश न येतां ते दोघेहि इ. स. १५८० मध्यें मृत्युमुखी पडले. मांग सावंत यास सात बायका होत्या; त्यापैकीं सहा त्याच्याबरोबर सती गेल्या, आणि एक गरोदर होती, ती ओखणें येथें जाऊन राहिली. तिला पुढें मुलगा झाला, त्याचें नांव फोंड सावंत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...