ब्रह्मेंद्रस्वामी, धावडशीकर (१६४९-१७४५)-
पूर्वाश्रमीचें नांव विष्णु, राहाणें व-हाडांत दुधेवाडीचें .यानीं पोरवयांतच चतुर्थाश्रम, स्वीकारला, व हिमालयापासून रामेश्वरापर्यंत फिरून तीर्थयात्रा केली. पुढें चिपळूणजवळ पेढें गांवीं परशुरामाचें देवस्थान आहे तेथें हे राहिले (१६९८). या ठिकाणीं बाळाजी विश्वनाथाची व ब्रह्मेंद स्वामींची ओळख झालीं. हळूहळू स्वामींचें भक्तमंडळ वाढत गेलें. यानीं परशुरामाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठीं भिक्षा मागण्याचें सुरू केलें. (१७०७) याचवेळीं शाहूची सुटका झालीं. त्यावेळीं बाळाजी विश्वनाथानें शाहूचा पक्ष स्वीकारण्यांत आणि पुढें त्यास पेशवाई मिळवून देण्यांत स्वामींची अतस्थ खटपट असावी असा संभव आहे. स्वामीनीं हबशापासून पेढें व आंबडस हीं गावें परशुरामास इनाम मिळविलीं. इबशावरहि स्वामींचें थोडेंसें वजन होतें. स्वामानीं तांबें, भागवत वगैरे मंडळींस आपले व देवस्थानचे कारभारी केलें. परशुरामपंत प्रतिनिधि, कान्होजी आंग्रे, फलटणकर निंबाळकर, नागपूरकर भोंसले, अक्कलकोकर भोंसले वगैरे महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख मंडळींवर व खुद्द शाहु छत्रपतीवर स्वामींची छाप होती. वरील मंडळींशीं त्यांची पैशाची देवघेव होती. ब्याजबट्ट्यांमुळें त्यांचें वजन बरेंच वाढलें; त्यांचा स्वभाव कडक, हांवरा व तोंडाळ होता. बाळाजीपंत पेशवा झाल्यावर धावडशी (जि. सातारा) स्वामींच्या देवास इनाम मिळाली. स्वामींनीं इनामी गांवाचा व एकदंर कारखाना मोठा वाढविला. शाहूनें वीरमाडें व अनेवाडी हीं गावें स्वामींस इनाम दिलीं (१७२५). एकदंर इनामी गांवें ८ होतीं. बाळाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानातवांवरहि स्वामींची कृपादृष्टि कायम होती. ते विद्वान व लिहिणारेहि वाकब होतें. त्यांचा व्याप प्रचंड होता. सन १७२६ च्या सुमारास हत्तीच्या संबंधानें सिद्दीचा व स्वामींचा तंटा झाल्यानें सिद्दीनें परशुरामाचें देऊळ लुटलें, तेव्हां स्वामी तेथून निघून धावडशीस येऊन राहिले व येथेंहि परशुरामाचें देऊळ, तलाव, वाडा वगैरे त्यानीं बांधिलीं.
मराठी राज्याची वृद्धि होत चालली ती स्वामींच्या आशीर्वादाचें फळ होय, अशी भावना त्यावेळीं लोकांत उत्पन्न झालीं होती. १७२५ पासून १७४५ पर्यंत मराठेशाहींतील बहुतेक कारस्थानांत स्वामींचें प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अंग होतें. दिल्लीकडील कारस्थानें, निजामाचें उच्चाटन, जंजि-याची व वसईची मोहीम, अशा कित्येंक प्रसंगांशीं स्वामींचा थोडाबहुत संबंध असून, स्वामींच्या विस्तृत पत्रव्यवहारावरून त्या त्या प्रसंगांच्या हकीकती ब-याच खुलासेवार कळून येतात. बाजीराव वारल्यावर स्वामींस पराकाष्टेचें दुःख होऊन त्यानीं आपलें चित्त बहुतेक व्यवहारांतून काढिलें. स. १७४५ च्या श्रावण महिन्यांत कृष्णातीरीं स्वामींनीं नामस्मरण करीत प्राण सोडला. स्वामींची समाधि धावडशीस आहे. ( पारसनीसकृत ब्रह्मेंद्रस्वामींचें चरित्र; राजवाडे खं. ३ पेशवाई बखर.)
No comments:
Post a Comment